Cotton, Soybean Market
Cotton, Soybean Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीनबद्दल ॲग्रोवनचे अंदाज चुकले का?

Team Agrowon

देशात सध्या सोयाबीन (Soybean) आणि कापसाचे (Cotton) भाव दबावात आहेत. अनेक शेतकरी याला अॅग्रोवन जबाबदार असल्याचा आरोप करत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत कापसाचे भाव जास्तच घसरले. त्यामुळे शेतकरी पॅनिक सेलिंग म्हणजे घाबरून विक्री करताना दिसत आहेत.

शेतकऱ्यांनी एवढे दिवस कापूस आणि सोयाबीन ठेवले तरी दर दबावातच का आहेत? उद्योगांनी दर का वाढवले नाहीत? या सगळ्यात ॲग्रोवनची भूमिका काय आहे? खरंच ॲग्रोवनचे अंदाज चुकले का? पुढच्या काळात कापूस, सोयाबीनचे दर (Cotton Soybean Rate) वाढणार की आणखी घटणार? 

ॲग्रोवन हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतीमाल बाजाराची सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे. अॅग्रोवनने चालू हंगामात कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये राहील, असं सांगितलं होतं.

तसेच सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहील, असं सांगितलं होतं. पण हंगामाच्या सुरूवातीला इतर युट्यूब चॅनल्स मात्र यंदा कापसाला १० ते १२ हजार रुपये भाव मिळेल आणि सोयाबीन ७ ते ८ हजार रुपयांपर्यंत विकले जाईल, असे सांगत होते. ही दरपातळी फसवी होती. परंतु शेतकऱ्यांनाही गेल्या वर्षीचा अनुभव बघता यंदा जादा भाव मिळेल, असं वाटत होतं.

यात एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या की, ॲग्रोवनने ही दरपातळी कधीच सांगितली नाही. पण काही जण अॅग्रोवननेच कापसाची १० ते १२ हजार रुपयांची दरपातळी सांगितल्याचा खोटा प्रचार सोशल मिडियातून करत आहेत. सोयाबीनच्या बाबतीतही तेच आहे. जे ॲग्रोवनने कधी सांगितलं नाही, ते त्याच्या नावावर खपवत आहेत.  

ॲग्रोवनने विविध जाणकारांशी बोलून, तसेच बाजारातील मागणी- पुरवठा, उत्पादनाचे अंदाज, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कल, प्रमुख उत्पादक देशांमधील स्थिती अशा अनेक घटकांचा आधार घेऊनच कापूस आणि सोयाबीनची सरासरी दरपातळी काय असू शकेल, याचा अंदाज दिला होता.

मागणी आणि पुरवठ्याव्यतिरिक्त बाजारावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते  सरकारचे धोरण. त्याशिवाय व्यापारी आणि उद्योगांतील घटकांनी संगनमत करून भाव पाडणे, इतर देशांतील उत्पादन वाढ किंवा घट, आंतराष्ट्रीय पातळीवर अचानक होणाऱ्या घडामोडी, शेतकऱ्यांकडून होणारे पॅनिक सेलिंग, आयातदार किंवा निर्यातदार देशांतील आर्थिक स्थिती, त्या शेतीमालापासून तयार होणाऱ्या पदार्थांना असणारी मागणी आणि हवामानात अचानक होणारे बदल या सगळ्यांचा परिणाम बाजारावर होत असतो. 

यापैकी एक किंवा अनेक घटकांमुळे बाजारभावात चढ-उतार होत असतात. तसेच अनेकदा एखाद्या पिकाचे भाव वाढण्यासाठी देशातील आणि जागतिक बाजारातली स्थिती अनुकूल असतानाही व्यापारी आणि उद्योगाच्या एकीतून, संगनमतातून दर पाडले जातात किंवा एका पातळीच्या पलीकडे वाढू दिले जात नाहीत.

सध्या कापूस आणि सोयाबीन बाजारात याचाच अनुभव येत आहे. मुलभूत घटक म्हणजे फंडामेन्टल्स मजबुत असतानाही शेतकऱ्यांची कोंडी करून त्यांच्याकडून स्वस्तात माल काढण्यासाठी भाव जाणूनबुजून वाढू दिले जात नाहीत.

मार्च महिन्यात बाजारातील कापूस आणि सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. कारण शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे. शेतकऱ्यांना पैशांची चणचण असते. ते माल जास्त दिवस ठेऊ शकत नाहीत, याची कल्पना उद्योगांना आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आवक वाढल्यामुळे उद्योगांना सध्या गरजेपुरता माल मिळतोय. त्यामुळे त्यांनी ताणून धरलंय. त्यांच्याकडून आक्रमक खरेदी होताना दिसत नाही. म्हणजेच बाजारात स्पर्धाच ठेवली गेली नाही. शेतीमाल खेरदीत स्पर्धा नसल्याने आपसूकच दरावर दबाव आलाय.  

अनेक शेतकरी अॅग्रोवनने भाव पाडल्याचे सांगत आहेत. पण अॅग्रोवन शेतकऱ्यांसाठी काम करते. पुढील काळात शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे येत्या काही दिवसांतला आणि दीर्घकालिन दराचा कल काय राहील, याचा अंदाज तज्ज्ञांच्या हवाल्याने देण्याचं काम अॅग्रोवन करत असतं. त्या-त्या वेळच्या परिस्थितीवर तो आधारित असतो. आणि हा अंदाज असतो.

आपण बाजाराचा केवळ अंदाज देऊ शकतो. एखाद्या आठवड्यात किंवा महिन्यात अमुक इतकाच भाव राहील, हे ठामपणे व्यापारी, प्रक्रियादार किंवा उद्योगांनाही सांगता येत नाही. जगात असं कुणीच सांगू शकत नाही.  असं सांगता आलं असतं तर बाजारभावाचा प्रश्न कधीच निर्माण झाला नसता. 

आपल्याला जसं वाटतं की शेतकऱ्यांना चांगला दर मिळायला हवा. तसं व्यापारी, जिनिंग, सुतगिरण्या, प्रक्रियादार, निर्यातदार यांचा प्रयत्न जास्त नफा काढण्याचा असतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल कसा पदरात पाडून घेता येईल, त्यासाठी हे घटक निरनिराळ्या खेळ्या करत असतात.  

शेतकरी सोडता बाकी सर्व घटक संघटित आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या टप्प्यावरील दर नियंत्रित करणं सोपं जातं. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जातात. 

यंदा शेतकऱ्यांनी सुरूवातीपासूनच कापूस आणि सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकले.  त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामात म्हणजेच ऑक्टोबर ते जानेवारी या काळात दर टिकून राहीले. कापसाला सरासरी ८ हजार ५०० रुपयांच्या होते.

तर सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहिले. मध्येमध्ये दरात काहीशी तेजीही आली होती. 

ॲग्रोवनने ऑक्टोबरपासूनच चालू हंगामात कापसाचे सरासरी दर ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विकावा, असे सांगितले होते.

नोव्हेंबर महिन्यात कापूस दर ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान गेले होते. यावेळी ॲग्रोवनने शेतकऱ्यांनी या दरपातळीला कापूस विकावा, असे जाणकारांच्या हवाल्याने सांगितले होते. मात्र याच काळात अनेक युट्यूब चॅनल्स शेतकऱ्यांनी १२ हजार रुपयांच्या खाली कापूस विकू नये, असे सांगत होते.

अनेक शेतकरी या अफवांना बळी पडले. आता मात्र काही जण त्याचा दोष ॲग्रोवनला देताना दिसत आहेत. 


काही जण तर ``आमच्या भागात नोव्हेंबरमध्ये कापूस भाव ९ हजार २०० ते ९ हजार ५०० रुपये होते. पण तुम्ही सांगितलं भाव १२ हजार होतील, म्हणून आम्ही कापूस विकला नाही, अशा कमेंट्स करत आहेत. पण अॅग्रोवनने ना १२ हजार दर होतील, असे कधीही सांगितले नाही.

उलट सुरूवातीपासूनच यंदा कापसाचे दर गेल्या वर्षीइतके तेजीत राहणार नाहीत, हीच वस्तुस्थिती ॲग्रोवनने वारंवार सांगितलेली आहे. जे शेतकरी सुरुवातीपासून सातत्याने ॲग्रोवनचे व्हिडिओ पाहतात, त्यांना याची कल्पना आहे. ते ॲग्रोवनच्या वार्तांकनाबद्दल समाधानी आहेत.  

राहीला प्रश्न आता दर नरमल्याचा. तर आधी म्हटल्याप्रमाणं शेतकरी मार्च महिन्यात जास्तीत जास्त कापूस आणि सोयाबीन विकतील, याचा अंदाज उद्योगांना आधीच होता. त्यामुळे त्यांनी संगनमत करून दर वाढू दिले नाहीत.

अनेक शेतकऱ्यांची आर्थिक क्षमताही जास्त काळ थांबण्याची नसते. त्यामुळे सध्या अनेक शेतकरी कापूस आणि सोयाबीन विकत आहेत. त्यामुळं दरावर दबाव आहे. 

यंदा कापूस उत्पादन घटले आहे. त्यामुळं दर वाढणे अपेक्षित आहे. पुढील काळात दर वाढतीलही. पण तोपर्यंत जास्तीत जास्त कापूस शेतकऱ्यांच्या हातून गेला असेल.  

शेतकऱ्यांनी सुरूवातीच्या टप्प्यात कापूस रोखून उद्योगांना शह दिला होता. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यातच दर पाडण्याचा खरेदीदारांचा डाव उधळून लावला गेला. शेतकऱ्यांनी त्यावेळी उद्योगांना धडा शिकवला, त्याचा कढता आता उद्योगाकडून काढला जात आहे. व्यापारी आणि उद्योगांनी आता ताणून धरलंय. त्यामुळे दर दबावात आहेत.

आम्ही अनेक शेतकऱ्यांशी याबाबतीत बोललो. यात अनेक शेतकरी नाईलाजाने आणि पुढे आणखी भाव पडतील की काय या भीतीने सध्या कमी दरात माल विकत आहेत. पंरतु अनेक शेतकऱ्यांनी मात्र दर आगामी काळात वाढतील, या अंदाजावर विश्वास ठेऊन आताच माल विकणार नाही, असं आम्हाला सांगितलं. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT