पुणेः देशातील बाजारात सोयाबीनची आवक (Soybean Market) सध्या वाढलेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनमधील ओलावा आता कमी येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात (International Soybean Market) दर वाढललेले असतनाही देशातील दर काहीसे कमीच आहेत. पण आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळेल, असे जाणकार सांगत आहेत.
देशात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने ८ ऑक्टोबर २०२१ मध्ये स्टाॅक लिमिट लावले होते आणि राज्यांना स्टाॅक लिमिट ठरविण्याचे अधिकार दिले होते. मात्र अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे केंद्राने लिमिट ठरवून ३० जून आणि नंतर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत स्टाॅक लिमिट लावले होते.
मात्र स्टाॅक लिमिटमुळे मोठी किरकोळ विक्री साखळी आणि घाऊक व्यापाऱ्यांना व्यवहार करणे अवघड होत आहे. तसेच सध्या स्टाॅक लिमिट २००८ मध्ये ठरवले गेले. त्यावेळी मोठ्या किरकोळ विक्री साखळ्या नव्हत्या. त्यामुळे या उद्योगांना सध्याच्या स्टाॅक लिमिटमध्ये काम करताना अडचणी येत होत्या. त्यातच सध्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं स्टाॅक लिमिट काढण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयानं म्हटले आहे.
स्टाॅक लिमिट काढल्याचा फायदा सोयाबीनला होऊ शकतो, असे शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री यांनी सांगितले. सध्या देशातील बाजारांमध्ये सोयाबनची आवक वाढली आहे. त्यामुळे सोयाबीन दर काहीसे दबावात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील काही दिवसांमध्ये वाढले.
मात्र देशातील सोयापेंडला निर्यातीसाठी कमी मागणी, स्टाॅक लिमिट आणि वायदेबंदीमुळे देशातील दर त्याप्रमाणात वाढले नव्हते. आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळे व्यापारी आणि संस्थांना तेलबिया आणि खाद्यतेलाचा साठा करता येईल.
स्टाॅक लिमिट काढल्याने बाजाराला आधार मिळू शकतो, असे शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनीही सांगितले. सरकारने स्टाॅक लिमिट काढल्याने सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो. सरकारच्या निर्णयानंतर आज सोयाबनच्या दरात काहीशी सुधारणा झाली. सोयाबीनचा सरासरी दर आता ४ हजार ९५० रुपयांवर पोचला आहे. तर बऱ्याच बाजारांमध्ये सोयाबीनचे दर ५ हजार १०० रुपयांपर्यंत पोचले होते. बाजारात सध्या सोयाबीनची आवक जास्त असली तरी दर किमान ५ हजारांपर्यंत असू शकतात तर पुढील काही दिवस दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली. त्यामुळं दर दबावात आहेत. आता सरकारनं स्टाॅक लिमिट काढल्यानं सोयाबीन बाजाराला फायदा होऊ शकतो. व्यापारी आणि स्टाॅकिस्ट सोयाबीनची जास्त खरेदी करू शकतात.
- सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार अभ्यासक
स्टाॅक लिमिट काढल्याने स्टाॅकिस्ट बाजारात उतरतील. त्यामुळे दराला आधार मिळेल. मात्र खाद्यतेलाची आयातही वाढण्याचा धोका आहे. मात्र शेतकऱ्यांना किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी ५ ते ६ हजार रुपयांची दरपातळी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल.
- राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.