Economy Agrowon
ॲग्रोमनी

Indian Economy : नौशाद सलूनवाला आणि अर्थव्यवस्थेची इकॉलॉजी

Ecology of Economy : ही आहे अर्थव्यवस्थेची इकॉलॉजी. ही काही नौशाद सलूनवाल्याची स्टोरी नाहीये. तर ही देशातील कोट्यवधी छोट्या / मध्यम व्यावसायिकांची स्टोरी आहे.

Team Agrowon

Indian Agriculture : परवा सलूनमध्ये केस कापायला गेलो होतो. हे सलून नौशाद आणि मोहम्मद हे दोन जुळे मुस्लीम भाऊ चालवतात. ते मूळचे उत्तर प्रदेशचे. वडील मुंबईत सत्तरीच्या दशकात आलेले. या दोघांचा जन्म मुंबईतलाच. वडील, आजोबा सर्व याच व्यवसायात होते. या दोन भावांखेरीज त्यांच्या गावाकडून आलेला विशीतील तरुण त्यांनी मदतनीस म्हणून ठेवला होता. गिऱ्हाइकाचे केस कापताना त्याला बाजूला उभा करून समजावणे / ट्रेनिंग देखील सुरू होते.

हे एक छोटे पण एसी वगैरे लावलेले आटोपशीर सलून आहे. मराठी मालक असणाऱ्या बैठ्या चाळीत, रस्त्याला लागूनचा गाळा या भावांनी भाड्याने घेतला होता. म्हणजे वडिलांपासून तोच होता, गेली ४० वर्षे. माझा नंबर यायचा होता म्हणून बेंचवर बसलो होतो. आमच्याच आजूबाजूच्या सोसायट्यांमधले तिघे जण आपला नंबर यायची वाट बघत बसलेले. त्यापैकी दोन मराठी आणि एक सिंधी. सलूनमध्ये स्मार्ट फोनवर नौशाद संगीतकाराची छान जुनी गाणी लावली होती, माझे नाव नौशाद म्हणून तरुणपणापासून मी पण नौशाद सरांचा फॅन आहे, असे सलूनवाला म्हणाला. तेवढ्यात एक पोरसवदा तरुण पाठीला मोठी सॅक घेऊन आला. बाजूला एका टेबलवर निरनिराळ्या वस्तू मांडत होता आणि नौशादला सांगत होता, कोणत्या वस्तू किती आणल्यात ते. त्यात टोपाझ, गार्नियर अशा मोठ्या ब्रँडच्या ब्लेड्स, वस्तरे, शाम्पू, हेअर डाय, फेशियल वगैरे पाच / दहा/ पंधरा अशा प्रमाणात होत्या. जाताना नौशादने थोडे बाजूला होऊन त्या मुलाला १८०० रुपये दिले. मी शेजारीच बसलो होतो म्हणून सर्व पाहत होतो आणि त्या मुलाशी बोलत होतो. तो विदर्भातून आलेला मराठी मुलगा.

सकाळी कॉलेज करतो आणि दुपारनंतर त्या दहा किलोमीटरच्या वर्तुळातील ६०-७० छोट्या, मोठ्या सलून्सना हा सगळा माल विकतो.
तुझा स्वतःचा धंदा आहे का? तर ‘नाही’ म्हणाला. एक पंजाबी डिस्ट्रिब्यूटर आहे त्याच्याकडे काम करतो. सलूनवाले त्या डिस्ट्रिब्यूटरकडे व्हॉट्सअॅपवरून काय पाहिजे ते नोंदवतात आणि एक-दोन दिवसांत हा मुलगा त्याची डिलिव्हरी करतो, त्याचवेळी पैसे घेतो. तो डिस्ट्रिब्यूटर या मुलाला पगार वगैरे नाही देत, दररोज कितीचा माल डिलिव्हर केला त्याच्याशी निगडित पैसे देतो. नौशादला विचारले, की तू डायरेक्ट कंपनीकडून का नाही मागवत, स्वस्तात पडेल ना. त्यावर तो म्हणाला, की त्यांच्याकडे कमीत कमी एक लाख रुपयांची ऑर्डर द्यावी लागते. आमची तेवढी गरज नाही. ना वर्किंग कॅपिटल. आणि खप होईल तसा माल मागवता येतो, भांडवल अडकून पडत नाही. वर शोकेसमध्ये अनेक ब्रँडचे खोके, डबे, बाटल्या ठेवल्या होत्या. मी विचारले की हे तर एवढे स्टॉक करून ठेवले आहेस? ‘‘सर्व खोके / बाटल्या रिकाम्या आहेत, तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी ठेवतो,’’ पानाने लाल झालेले तोंड उघडत, हसत हसत नौशाद म्हणाला.

हे वर लिहिलेले सगळे एकत्र करून उजळणी केली तर काय दिसते? मुंबईतील मूळचे मराठी चाळमालक, भाड्यावर जागा, नव्या ट्रेण्डप्रमाणे भांडवली खर्च करत नव्या खुर्च्या, आरसे, एसी लावत आधुनिक केलेले दुकान, हिंदी सिनेमाची भारतीयांच्या नसातून वाहणारी गाणी, उत्तर प्रदेशमधून काही दशकांपूर्वी आलेले मुस्लिम कुटुंब, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित झालेले कौशल्य, गावाहून आलेल्या तरुणाला कौशल्य शिकवणे, कॉस्मोपॉलिटन गिऱ्हाइके, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी, बहुराष्ट्रीय / राष्ट्रीय कॉर्पोरेट भांडवल घालून ऑटोमेटेड प्लान्टमध्ये बनवलेली आधुनिक प्रॉडक्ट्स, एकाच वेळी लाखाची ऑर्डर देऊ शकणारा, बँकांकडे क्रेडिट लाइन असणारा पंजाबी डिस्ट्रिब्यूटर, विदर्भातून स्वप्ने घेऊन आलेला, कॉलेज शिकताना स्वतः कमावून आईवडिलांना चार पैसे देणारा, भारतीय भांडवलाने तयार केलेल्या सेकंड हॅन्ड का होईना बजाज स्कूटरवर दिवसभर फिरणारा तरुण, कॅशमध्ये होणारे व्यवहार आणि देशातील विविध धर्म / भाषा / प्रांत यातून आलेली माणसे…. ही अशी निरीक्षणांची यादी लांबतच जाईल. आणि हे सगळे दुवे जैविकपणे एकमेकांशी जोडलेले आहेत. एवढे की त्यातील एक कडी निखळली किंवा तोडली तर अख्खी साखळी तुटून पडेल.

ही आहे अर्थव्यवस्थेची इकॉलॉजी. ही काही नौशाद सलूनवाल्याची स्टोरी नाहीये. तर ही देशातील कोट्यवधी छोट्या / मध्यम व्यावसायिकांची स्टोरी आहे. कोणताही धंदा / व्यवसाय घ्या; कमी-जास्त फरकाने, स्थलकालाप्रमाणे वरील यादी दिसेलच. आणि ही त्यांची व्यक्तिगत स्टोरीदेखील नाही. ते ज्या सामाजिक/ आर्थिक इकॉलॉजीमध्ये राहतात त्याची ही स्टोरी आहे.
चिंता वाटत राहते या इकॉलॉजीची. इकॉलॉजी म्हणजे साखळ्या. या साखळ्यांची स्वतःची ताकद नसते. तर साखळीची ताकद म्हणजे त्या साखळीतील सर्वात कमकुवत कडीची ताकद. आणि आजघडीला ठरवून त्या कमकुवत कडीवर हल्ला केला जात आहे. उजव्या विचारसरणीच्या सत्ताधाऱ्यांकडून. त्यामुळे संपूर्ण इकॉलॉजीलाच धोका निर्माण झाला आहे.  
संजीव चांदोरकर
(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT