विनोद इंगोले
यवतमाळ ः शेतीमालाचे भाव (Agril Commoditirs Rate) ठरविताना आजही सोयाबीनचा दाणा दाताखाली चावून त्याआधारे त्यातील ओलावा निश्चित करून ठरविले जातात. येथूनच शेतकऱ्यांच्या शोषणाची सुरुवात होते, हे लक्षात आलेल्या एका शेतकरी पुत्राने ही व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला. गावस्तरावरील शेतकरी उत्पादक कंपन्यांची ( Farmer Producer Companies) मदत या कामी घेत त्यांच्या माध्यमातून गावस्तरावरील गोदामांचा वापर केला.
शेतकऱ्यांना ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतीमालातील गुणवैशिष्ट्ये कळतात आणि नेमका इतकाच दर कसा मिळाला हे कळत असल्याने त्यांचे शोषण थांबले आहे. या अभिनव संकल्पनेची दखल जागतिक स्तरावरील फोर्ब्स या मासिकाकडून घेण्यात आली.
शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील वरुड हे शेवटचे गाव. त्यानंतर आदिलाबादची सीमा सुरू होते. याच गावातील रहिवासी असलेल्या पंकज महल्ले याने प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर यवतमाळला सामाजिक कार्य महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. याच दरम्यान त्याला शेती व्यवस्थेतील शोषणाविरोधात लढण्याचे बळ मिळाले.
यवतमाळ जिल्ह्यात कास्तकार या संकल्पनेच्या माध्यमातून शेती व्यवस्थेतील शोषणाविरोधात अभियान राबविले जात होते. २००९ ते २०१३ या कालावधीत पंकज याचा भाग झाला आणि तेथूनच त्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
पत्नी श्वेताही झाली अभियानाचा भाग
यवतमाळ जिल्ह्याच्याच वरझडी (ता. आर्णी) येथील रहिवासी असलेल्या श्वेता ठाकरे हिने इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. श्वेताच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम. तीन एकर शेती असल्याने त्यातून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते, त्यामुळे ठाकरे कुटुंबीय आर्वीला स्थलांतरित झाले. शैक्षणिक कर्ज घेऊन तीने हे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात नोकरीही केली. यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. घनश्याम दरणे यांची ती भाची.
श्वेतावर त्यांच्या विचाराचा प्रभाव असल्याने तिनेही शेतीविषयक चळवळीत सहभागाचा निर्णय घेतला. २०१० मध्ये पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिनेही गावी परतण्याचा निर्णय घेत २०१३ कास्तकार अभियानात सहभाग घेतला. याच अभियानात पंकज आणि श्वेताची भेट झाली व त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेत २५ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांचे लग्न पार पडले.
...अशी आहे संकल्पना
शेतकऱ्याने आपला तारण ठेवण्यासाठीचा किंवा विकायचा शेतीमाल संबंधित केंद्रापर्यंत घेऊन जावा. त्या ठिकाणी शेतीमालाचे सायंटिफिक नमुने काढून त्याचे पृथ्थकरण केले जाते. डिजिटल ॲपवर या नोंदी भरल्या जातात. त्याआधारे ॲपवर त्याला कळते, की या दर्जाच्या सोयाबीनला किती दर मिळणार आहे. सोयाबीन करीता १० टक्के आर्द्रता, २ टक्के काडीकचरा, २ टक्के डॅमेज मटेरिअल इतके प्रमाण ठरलेले आहे. ॲपमधील नोंदींनंतर दर कमी किंवा जास्त का मिळाला, काय झाले याचे सविस्तर विवेचन ॲपवर तत्काळ शेतकऱ्यांना कळते, अशा प्रकारची पद्धती विकसित करण्यात आली आहे.
तारण शेतीमालाची विक्री घरबसल्या मोबाईलवरील ॲपच्या माध्यमातून करण्याची सुलभता यात आहे. शेतीमाल विकायचे असेल त्या वेळी त्याने मोबाईलवर सेल या ऑप्शनवर क्लिक केले की मोबाईलवर ओटीपी मिळतो आणि तो भरताच काही सेकंदात विक्रीची प्रक्रिया होते. शेतीमाल विक्रीसाठी व्यापाऱ्यांऐवजी थेट प्रक्रिया उद्योजकांशी करार करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार दराच्या तुलनेत अधिक दर मिळण्यास मदत होते. शेतीमाल तारण असल्यास १० रुपये प्रति क्विंटल प्रति महिना असे भाडे आणि १२ टक्के व्याजाची आकारणी होती. शेतकऱ्याने तारण घेतलेल्या रक्कमेच्या व्याज व भाड्याची वसुली शेतकऱ्याला ज्या दिवशी शेतीमालाची विक्री करायची त्या दिवशी बॅंकेला हा परतावा मिळतो आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते.
चार हजारांवर शेतकरी लाभान्वित
पंकज आणि श्वेता महल्ले या दांपत्याने विकसित केलेल्या या विक्री व्यवस्थेचा लाभ चार हजार शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांच्या उत्पन्नात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. एका शेतकऱ्याकडून सरासरी २५ क्विंटल शेतीमाल तारण ठेवला जातो. त्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा या शेतीमालाचा समावेश आहे.
पंकज महल्ले
मो. ९३७०७१६९७५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.