………….
अनिल जाधव
पुणेः यंदा कापूस उत्पादक (Cotton producer) काही महत्वाच्या देशांमध्ये उत्पादन घटण्याची शक्यता, अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने (USDA) व्यक्त केली. मात्र चीन, भारत आणि ब्राझीलमध्ये उत्पादन वाढल्याचे म्हटले आहे.
युएसडीएने यंदा महत्वाच्या कापूस उत्पादक काही देशांमधील कापूस उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला. त्यात चीन, भारत आणि ब्राझीलचा समावेश आहे. चीनमध्ये मागील हंगामात कापसाचा मोठा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे येथील बाजारात कापसाला चांगला दर मिळाला होता. परिणामी यंदा चीनमधील शेतकऱ्यांनी कापसाची लागवड वाढवली. त्यामुळे यंदा चीनचे कापूस उत्पादन अधिक राहील, असा अंदाज व्यक्त केला.
तसेच भारतातही यंदा कापूस लागवड वाढली होती. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावही यंदा कमी प्रमाणात जाणवला. त्यामुळे यंदा युएसडीएने भारतातील कापूस उत्पादन वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र युएसडीएच्या भारतातील उत्पादनाविषयीचा अंदाज चुकीचा ठरणार आहे. कारण यंदा भारतातील उत्पादन कमीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
………….
अमेरिकेतील उत्पादनाला फटका
युएसडीएने यंदा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादन कमी राहील्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. अमेरिकेत मागील हंगामात २२२ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. ते यंदा १८० लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियातील उत्पादन मागील हंगामातील ७३ लाख गाठींवरून ६३ लाख गाठींपर्यंत कमी होईल, असेही युएसडीएने म्हटले आहे.
…………
पाकिस्तानमध्ये मोठी घट
तर पाकिस्तानमध्ये यंदा पुराचा फटका महत्वाच्या पंजाब आणि बलुचिस्तान या राज्यांना बसला. त्यामुळे यंदा पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २९ लाख गाठींनी घटणार आहे. मागील हंगामात पाकिस्तानमध्ये ७६ लाख गाठी कापूस उत्पादन हाती आले होते. ते यंदा ४७ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाजही युएसडीएने व्यक्त केला.
……………
कापूस वापरही कमी होणार
अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा चीन वगळता महत्वाच्या कापूस वापरकर्त्या देशांचा वापर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चीनचा कापूस वापर यंदाही वाढून मागीलवर्षीच्या ४४४ लाख गाठींवरून ४५० लाख गाठींवर पोचण्याची शक्यता आहे. तर भारतातील कापूस उत्पादन ३१७ लाख गाठींवरून २९२ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. यासोबतच यंदा पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम आणि टर्की या देशांमधील कापूस वापरही कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
--
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.