Cotton  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market Rate : कापसातील मंदीची ७ कारण; कापूस बाजारात पुन्हा तेजी येईल का? अभ्यासक काय म्हणतात ?

Cotton Rate : कापूस बाजारात तेजीनंतर सर्वांनाच मोठा शाॅक दिला. आंतरराष्ट्रीय बाजार तर हंगामातील निचांकी पातळीवर पोचला. देशातही कापूस जवळपास १० टक्क्यांनी कमी झाला. पण कापूस बाजारातील या मंदीसाठी वेगवेगळी कारण दिली जात आहेत.

Anil Jadhao 

Pune News : कापूस बाजारात तेजीनंतर सर्वांनाच मोठा शाॅक दिला. आंतरराष्ट्रीय बाजार तर हंगामातील निचांकी पातळीवर पोचला. देशातही कापूस जवळपास १० टक्क्यांनी कमी झाला. पण कापूस बाजारातील या मंदीसाठी वेगवेगळी कारण दिली जात आहेत. त्यातही सट्टेबाजी आणि नफावसुली याची चर्चाही आहे. तर सध्या कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्यानंतर पुन्हा २० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावाने फेब्रुवारीत उच्चांकी टप्पा गाठल्यानंतर नफावसुली होईल आणि भावात नरमाई येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. झालंही तसंच. पण भावातील नरमाई अपेक्षेपेक्षा जास्त होती. भाव १० ते १५ टक्क्यांपर्यंत कमी होतील, असा अंदाज असताना प्रत्यक्षात भाव ७ महिन्यांतील निचांकी पातळीवर पोचले. बाजारात सट्टेबाजी झाल्याने भाव पडल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले. 

भाव हंगामातील निचांकी पातळीवर पोचल्यानंतर पुन्हा सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. पण भाव कमी झाल्यानंतर निगेटीव्ह सेंटीमेंट तयार झाले. जिनिंग, सुतगिरण्या, कापड उद्योग, व्यापारी आणि स्टाॅकीस्ट यांच्याकडून भाव पडण्याला वेगवेगळी कारणे दिली गेली. कापड आणि सूत गिरण्यांकडून पुढे मागणी नसल्याचे सांगितले जाते. जिनिंगकडून सरकी आणि रुईला उठाव नसल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या तेलाच्या किमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे पाॅलिस्टरच्या किमती कमी झाल्या आणि याचा दबाव कापसापासून तयार झालेल्या कापडाच्या भावावर आला, असेही उद्योगांकडून सांगितले जात आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावावर दबाव वाढण्याला एक कारण म्हणजे युएसडीएचा रिपोर्ट. युएसडीएने आपल्या मे महिन्याच्या अंदाजात पुढच्या हंगामात, म्हणजेच २०२४-२५ च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादनात ५ टक्के वाढ होईल असे म्हटले आहे. यात अमेरिकेच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच ब्राझील आणि टर्कीचे कापूस उत्पादनही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचाही दबाव आंतरराष्ट्रीय बाजारावर येत असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्याचा दबाव देशातील बाजारावरही आला. कारण देशात तेजीही आंतरराष्ट्रीय बाजारामुळेच आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर कापसाची निर्यातही मंदावली. निर्यातीला मागणी नसल्यानेही भावावर दाबाव आल्याचे निर्यातदार सांगत आहेत. तर व्यापारी आणि जिनिंगच्या मते, कापसाचे भाव कमी झाले तरी बाजारातील आवक गेल्या काही आठवड्यांपासून टिकून आहे. कापसाचा पुरवठा होत असल्याने मे महिन्यातही कापसावरील दबाव कायम असल्याचे सांगितले जाते. 

देशातील बाजारात सध्या रोज ३० हजार ते ४० हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. सध्याच्या भावात कापूस मिळतो आणि पुढे उठावही नसल्याने भावपातळी स्थिर आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारात जेव्हा अशी अनिश्चित परिस्थिती निर्माण होते तेव्हा बाजारातील सेंटीमेंटनुसार दरपातळी ठरत असते, असेही अभ्यासकांनी सांगितले. 

तसेच काही अभ्यासकांच्या मते, उद्योग आणि व्यापाऱ्यांकडून जी कारणं दिली जात आहेत त्याचा एवढा दबाव बाजारावर यायला नको होता. कापसाचे भाव या वेगवेगळ्या कारणांच्या नावाखाली दाबले जात आहेत, बाजारात सट्टेबाजी केली जात आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. तसेच व्यापारी आणि उद्योगांचं ऐकलं तर त्यांच्या मते, आता कापूस बाजारात तेजी येण्याची शक्यता कमीच आहे. पण अभ्यासकांच्या मते, यापुढच्या काळात एखादी तेजी येऊ शकते. पण ही तेजी जूनमध्ये येते की त्यानंतर हे आताच निश्चित सांगता येत नाही. कारण सध्या बाजार एवढा कमी होण्याला ठोस अशी कारणं दिसत नाहीत. केवळ सट्टेबाजी आणि सेंटीमेंटची बाजारावर पकड दिसते, असेही कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT