Arra Grapes  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Arra Grape Variety : ‘आरा’ द्राक्षाला प्रतिकिलो २६० रुपये दर

मुकूंद पिंगळे

Nashik News : राज्यातील शेती उद्योगात उत्सुकतेचा विषय बनलेल्या नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा प्रारंभ सोमवारी (ता. २२) करण्यात आला. ‘सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकारातून आयात करण्यात आलेल्या या नव्या वाणांच्या द्राक्षांची पहिले खुडे करण्यात आले. या द्राक्षांची थेट शेतातच विक्री व ऑनलाइन लिलाव करण्यात आला.

यात २ टनाहून अधिक द्राक्षांची विक्री झाली. थेट शेतात झालेल्या लिलावाचा हा देशातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे. लिलावात प्रथमच शिवार खरेदीत २०० रुपये किलो शिवार खरेदीत दर मिळाला. हंगामाच्या प्रारंभी गुणवत्तापूर्ण उत्पादन व वाण बदलाने हे उदाहरण प्रस्तावित केले आहे.

राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधत सोमवारी (ता. २२) सह्याद्री आळंदी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक कैलास माळोदे यांच्या रवळगाव (ता.जि. नाशिक) येथे ‘आरा’रंगीत द्राक्ष वाण पाहणी व विक्री दिवसाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक व खरेदीदार व्यापाऱ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक केदुनाना बोरगुडे यांच्या हस्ते द्राक्ष खुडणी करुन हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक सदाशिव शेळके, सुरेश कळमकर, राजाराम बस्ते, रवींद्र बोराडे, मधुकर क्षीरसागर, राजेंद्र बोरस्ते, बाळु पाटील कसबे, राजाराम सांगळे, अनंत मोरे, प्रभाकर मोरे, अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कॉन्फरन्स कॉलद्वारे ऑनलाइन लिलावाचा उपक्रम

पेटंट द्राक्ष वाणांची चव, टिकवणक्षमता सरस असल्यामुळे देशभरातील व्यापारी खरेदीसाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. या वाणांची खरेदी करण्यासाठी तयार असलेल्या देशातील लुधियाना, मुंबई, काठमांडू, सिलिगुडी, गुवाहाटी, कोलकाता, अहमदाबाद येथील खरेदीदार व्यापाऱ्यांना या वाणांची व लिलावाची पूर्वकल्पना देण्यात आली होती.

त्यानुसार देशाच्या विविध भागातील खरेदीदारांनी यावेळी कॉन्फरन्स कॉलद्वारे लिलावात सहभाग नोंदवला. या वेळी द्राक्षाच्या ४.८ किलोच्या पेटीला १२५० रुपये दर मिळाला. या लिलावात २ टन द्राक्ष माल विकला गेला.

याशिवाय ग्राहकांनी अवघ्या २ तासांत ३३६ किलो द्राक्षांची खरेदी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापुढील काळात ही ऑनलाइन लिलाव व खरेदी विक्री प्रक्रिया अधिक गतिशील व पारदर्शक करण्यात येणार असल्याचे विलास शिंदे यांनी या वेळी सांगितले.

द्राक्षांना प्रथमच २०० चा दर

ऑनलाइन द्राक्ष लिलावात कैलास माळोदे यांच्या ‘आरा’ रंगीत द्राक्षांना बॉक्सला १, २५० रुपये म्हणजे प्रती किलोस २६० रुपये दर मिळाला. द्राक्ष शेतीच्या आता पर्यंतच्या इतिहासात थेट शिवारखरेदीत शेतकऱ्याला मिळालेला सर्वाधिक उच्चांकी दर आहे. नव्या आरा रंगीत द्राक्ष वाणामधील गोड चव, कुरकुरीतपणा या गुण वैशिष्ट्यांमुळे या द्राक्षांना बाजारातून मोठी मागणी असल्याचे सांगितले जात आहे.

‘गोड, रसाळ चवीचे उत्तम द्राक्षवाण आणि सरस मार्केटिंग या दोन गोष्टींच्या जोरावर शेतीत क्रांती घडताना दिसत आहे. तरुण ध्येयवादी शेतकऱ्यांनी हे काम गतीने पुढे न्यावे.
- अशोक गायकवाड, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे
पेटंट वाणांमुळे दर्जेदार द्राक्ष वाणांचा शेतकऱ्यांचा वनवास संपला आहे असे आता नक्कीच म्हणता येईल. खरी समस्या मार्केटची होती. त्यावरही ‘ऑनलाइन लिलावा’चा पर्याय उभा राहत आहे. ही आशादायी बाब आहे. सह्याद्रीचा हा उपक्रम राज्यातील फळशेतीसाठीही पथदर्शी ठरणार आहे.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT