जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. त्यामुळे आजार टाळणे शक्य होते. 
महिला

गॅस्ट्रोपासून सावधान !

डॉ. क्षितिजा कुलकर्णी

गॅस्ट्रो आजारामध्ये जुलाब, उलट्या व पोटात दुखणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. गॅस्ट्रोचा प्रसार प्रामुख्याने पिण्याचे पाणी दूषित झाल्यामुळे होतो.गॅस्ट्रो टाळण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाआधी स्वच्छ हात धुवावेत.  

उन्हाळ्यात गॅस्ट्रोची साथ दिसतेच. गॅस्ट्रो आजाराचे पूर्ण नाव गॅस्ट्रो एनटेरायटीस. म्हणजे आतडे व जठराचा दाह. यामध्ये जुलाब, उलट्या व पोटात दुखणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणेसुद्धा काहीवेळा दिसतात.

आजाराची कारणे 

  •  विषाणू, जीवाणू व परजीवी सूक्ष्मजीव हे या आजाराला कारणीभूत असतात. त्यातही मुख्य कारण विषाणू हेच आहे. 
  •  रोटा व्हायरस हे लहान मुलांना जुलाब होण्याचे अगदी नेहमीचे कारण. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा प्रतिजैविकांची गरज पडत नाही. तसेच याकरिता लससुद्धा उपलब्ध आहे. मोठ्या माणसांमध्ये मात्र जीवाणूंचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. 
  •  गॅस्ट्रोचा प्रसार प्रामुख्याने पिण्याचे पाणी दूषित झाल्यामुळे होतो. पाण्याचा कुठेही मलमूत्राशी संबंध आला की ते दूषित होते. 
  •  संसर्ग झालेल्या व्यक्तीचा स्पर्श झालेले अन्न किंवा स्पर्श झालेली कोणतीही वस्तू तोंडात गेल्यानेसुद्धा गॅस्ट्रो होतो. अन्न दूषित होण्याचे कारण म्हणजे अन्न शिळे होणे, त्यावर माशा बसणे ही आहेत.
  • उपाय

  •  गॅस्ट्रो टाळण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाआधी स्वच्छ हात धुवावेत. जेवणाआधी, जेवणानंतर, संडास केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. ही एवढी साधी गोष्ट केवळ कंटाळा केल्यामुळे टाळली जाते व नंतर मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रवासात सॅनिटायझर वापरू शकतो. 
  •  गावपातळीवर तसेच घराजवळही मलमूत्राचे नियोजन व्यवस्थित हवे. त्याचा कुठेही पिण्याच्या पाण्याशी संबंध यायला नको. 
  •    संडासचा खड्डा विहीर व पाणी साठवण्याच्या जागेपासून लांब असावा. जेणेकरून जमिनीखाली दोन्ही बाजूचे पाणी एकत्र  येणार नाही. पावसाळ्यात बऱ्याचदा गटारीचे व ड्रेनेजचे पाणी पसरते व पिण्याच्या पाण्याला दूषित करते. यासाठी काळजी घ्यावी.
  •  गॅस्ट्रोच्या उपचारामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राखणे. बहुतेक वेळा साधे पाणी भरपूर प्रमाणात पिऊन हे जमते. ओआरएस (ओरल रेहायड्रेशन सोल्युशन) याचीसुद्धा फार महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये पाणी, मीठ आणि साखर असते. हे पावडर आणि आता द्रव स्वरूपातदेखील मिळते. पावडरपासून द्रावण बनवणे अतिशय सोपे आहे. जागतिक अन्न संघटनेच्या अतिमहत्त्वाच्या औषधांच्या यादीत याचे नाव आहे. सर्वांत जास्त जीव वाचवलेले औषध असा मानसुद्धा ‘ओआरएस`लाच आहे.
  •  साधे घरगुती ‘ओआरएस`आपण सहजपणे करू शकतो. यासाठी सहा चमचे साखर, अर्धा चमचा मीठ व एक लिटर पाणी असे प्रमाण घ्यावे. पाणी जास्त झाल्यास काही हरकत नाही, पण मीठ, साखर मात्र जास्त व्हायला नको. 
  •  जुलाब जास्त होत असतील तर अन्न व पाणी कमी घेतल्यास ते थांबतील हा मोठा गैरसमज आहे. त्यामुळे उलट शरीरातील पाणी कमी होऊन गंभीर दुष्परिणाम होतात.
  •  जुलाब जास्त होत असल्यास पाणी जास्त प्यावे. साधा आहार घेण्यास हरकत नसते. उदा. ताकभात, पेज, ज्यूस, सरबत, ताक. दुधाचे इतर पदार्थ मात्र टाळावेत. जुलाबामध्ये ते पचण्यास जड जातात. 
  •  जुलाबाबरोबर उलट्या व ताप असेल तर मात्र बऱ्याचदा रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडते. सलाईन व शिरेवाटे प्रतिजैविके द्यावी लागतात.
  • साधा वाटणारा हा आजार त्रासदायक ठरू शकतो. चक्कर येणे, किडनी काम करणे कमी होणे, शुद्ध हरपणे आणि अगदी मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या आजारात गांभिर्याने काळजी घेतलेली कधीही चांगली!
  • (लेखिका दौंड, जि. पुणे येथे आयसीयू तज्ज्ञ आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

    Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

    Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

    Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

    SCROLL FOR NEXT