Crop Advice Agrowon
कृषी सल्ला

Crop Advice : आंबा, काजू, सुपारी, नारळ पीक सल्ला

Crop Cultivation News : रब्बी पीक काढणीनंतर जमिनीतील कीड व रोगकारक बुरशीच्या सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी. जमीन १५ ते २० दिवस उन्हात चांगली तापू द्यावी.

Team Agrowon

उन्हाळी व्यवस्थापन

रब्बी पीक काढणीनंतर जमिनीतील कीड व रोगकारक बुरशीच्या सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी. जमीन १५ ते २० दिवस उन्हात चांगली तापू द्यावी.

सर्वसाधारणपणे माती परीक्षण दर तीन ते चार वर्षातून एकदा खरीप पीक काढणीनंतर लगेच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये करणे आवश्यक आहे. मात्र जे शेतकरी वर्षातून दोन ते तीन वेळा पिके घेत असतात, त्यांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण दरवर्षी करणे जरुरी आहे.

हंगामी पिके भात, नागली, भुईमूग पिकांकरिता २० ते २५ सें.मी. आणि फळबाग पिके आंबा, काजू, नारळ, सुपारीकरिता ६० सें.मी. खोलीवरचे मातीचे नमुने घ्यावेत.

उन्हाळी भात

-फुलोरा ते दाणे भरणे अवस्था

-सध्या तापमानात वाढ संभवते. उन्हाळी भात फुलोरा ते दाणे अवस्थेत असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी.

काजू

-फळधारणा

-नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी.

-झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

- रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता रोपांना वरून सावली करावी.

-काजूच्या नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी.

आंबा, काजू

-वाढीची अवस्था

- आंबा आणि काजू झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्यता असते. यासाठी किडीच्या प्रादुर्भावाचा शोध घेण्यासाठी खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिडीची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते.

खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी, खोडाची प्रादुर्भावग्रस्त साल काढून तारेच्या हुकाने कीड बाहेर काढून मारून टाकावी.

क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि. लि. प्रति लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झालेली असल्यास त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. गवत काढून बागेची नियमित साफसफाई करावी.

नारळ

-फळधारणा

-नारळावर गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव शेंड्यामध्ये येणाऱ्या नवीन कोंबावर दिसून येतो. अशा किडग्रस्त माडांच्या शेंड्याजवळ छिद्रे पडलेली दिसतात. नवीन येणारी पाने त्रिकोणी कापल्यासारखी दिसतात. या भुंग्याची पैदास ही शेणखताच्या खड्ड्यात होत असल्याने बागेजवळ शेणखताचे खड्डे असल्यास अशा खड्ड्यात दर दोन महिन्यांनी क्लोरपायरीफॉस* (१.५ टक्के भुकटी) मिसळावी.

-उपद्रव झालेल्या माडांच्या नवीन छिद्रामधून तारेच्या हुकाने भुंगे बाहेर काढून नष्ट करावेत. या छिद्रामध्ये सुमारे क्लोरपायरीफॉस* (१.५ टक्के भुकटी) २५ ग्रॅम आणि बारीक वाळू यांचे १ : १ या प्रमाणात केलेले मिश्रण भरावे.

किंवा क्लोरॲण्ट्रानीलीपोल (दाणेदार कीटकनाशक) याची ६ ग्रॅम वजनाची पूड कापडी पिशवीत भरून, त्या पिशव्या माडाच्या सूर व लगतच्या पानांच्या बेचक्यात ठेवाव्यात. किंवा माडाच्या सुरामध्ये दोन डांबर गोळ्या प्रति महिन्याला ठेवाव्यात.

-नारळ बागेतील सुकलेल्या झावळ्या, पालापाचोळा, गवत काढून बागेत स्वच्छता ठेवावी. त्यामुळे नारळावरील गेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणास मदत होईल. गेंडा भुंग्याला आकर्षित करून मारण्यासाठी बागेत गंध सापळ्याचा वापर करावा.

-नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडांना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

- पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

-नारळाच्या मोठ्या झाडास सूक्ष्मसिंचन पद्धतीने (मायक्रो जेट किंवा ड्रीप) पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे. -आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे १५ सें.मी. जाडीचे आच्छादन किंवा नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.

-नारळ नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी.

सुपारी

-फळधारणा

-सुपारी बागेस ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

-तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या सुपारीच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

-दक्षिण व पश्चिम दिशेकडील खोडावर सतत पडणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांमुळे ठराविक भागातील खोड भाजून निघते. खोड खोलगट व काळे पडते. उन्हापासून सुपारीच्या खोडांचे संरक्षण करण्यासाठी भाजणाऱ्या खोडावर गवताचा पेंढा किंवा सुपारीची झावळी बांधावी.

-सुपारी नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी.

नवीन रोपांसाठी नोंदणी

नवीन फळबाग लागवडीसाठी रोपे, कलमे, भात बियाणे यांची उपलब्धता करण्यासाठी आणि आगावू नोंदणीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील बियाणे विभागाशी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. (संपर्क क्र. ८२७५०१३३९६)

आंबा

-फळधारणा अवस्था

-तयार आंबा फळांची काढणी देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला उन्हाची तीव्रता कमी असताना करावी.

-उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी काढणी चालू असताना काढणी झालेले आंबे लगेचच झाडाच्या सावलीमध्ये ठेवावीत.

-फळकूज या काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांच्या संरक्षणासाठी फळांची काढणी देठासह करावी. काढणीनंतर फळे पोटॅशिअम मेटा बायसल्फाईट ०.०५ टक्के म्हणजेच ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या रसायनाच्या ५० अंश सेल्सिअस इतक्या उष्ण असलेल्या द्रावणात फळे १० मिनिटे बुडवून ठेवावीत. ही फळे पिकविण्यासाठी ठेवावीत.

-डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरुगेटेड फायबर बॉक्समध्ये फळे पॅकिंग करावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वळी करावी.

-तापमानात वाढ संभवत असल्याने वाढीच्या अवस्थेतील आंबा फळांची गळ होऊ शकते. ही फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड द्यावे. मात्र फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देणे बंद करावे.

-ढगाळ वातावरण राहून काही भागामध्ये पाऊसही झाला आहे. अशा ठिकाणी वाढीच्या अवस्थेतील आंबा फळांवर करपा रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे किंवा तशी शक्यता आहे.

पाऊस झालेल्या भागामध्ये रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी करावी.

-फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी वादळी वाऱ्यामुळे बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक फळमाशी सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावेत.

-तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी.

पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून दोनदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

-आंबा नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी.

डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१- ८१४९४६७४०१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

(टीप - लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT