शेतकरी : सचिन गजानन कोरडे
गाव : हिंगणी बुद्रुक, ता. तेल्हारा, जि. अकोला
एकूण शेती : ५० एकर
पपई लागवड : ४ एकर
मागील अनेक वर्षांपासून कोरडे कुटुंबीय पपई पिकाची लागवड करीत आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चार एकरांवर पपई लागवड केली आहे. सध्या या बागेतून पपई फळांचे उत्पादन सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात सुमारे १० टन पपईची जागेवरूनच व्यापाऱ्याला विक्री केली आहे. त्यास सर्वाधिक २२ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे दर मिळाला आहे.
उशिरा लागवडीचा फायदा
अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुद्रुक या भागांत उष्णतामान अधिक राहते. त्यामुळे सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात होणारी पपईची लागवड कोरडे कुटुंबीयांनी जाणीवपूर्वक महिनाभर लांबवली. लागवड साधारण १ एप्रिल २०२२ मध्ये केली. त्याचा चांगला फायदा झाला.
प्रखर उन्हाच्या झळांमुळे लागवडीनंतर रोप मरण्याची शक्यता अधिक असते लागवड उशिरा केल्यामुळे उन्हापासून रोपांचे संरक्षण तसेच फुलोरा वाचविणे शक्य झाले. त्यामुळे बाग चांगली बहरून आली. आतापर्यंत या बागेतून ५० टनांवर माल निघाला असून, सरासरी ८ ते २२ रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला आहे.
सिंचन नियोजन
पपई बागेत सिंचनासाठी प्रामुख्याने ठिबकने सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. तसेच १५ दिवसांतून एक वेळ पाटपाणी दिले जाते. पाटपाणी देण्याआधी नुकतेच एकरी ५० किलो पोटॅश व ५० किलो डीएपी याप्रमाणे रासायनिक खतमात्रा दिली आहे.
पाटपाणी दिल्यामुळे झाडाच्या मुळांना पाणी मिळते. सध्या उष्णतामान जास्त असल्याने पिकाची पाण्याची गरज ही वाढलेली असते. त्यामुळे या काळात पाटपाणी देणे फायदेशीर ठरते. शिवाय बागेत ओलावाही टिकून राहत असल्याचे सचिन कोरडे सांगतात.
खत व्यवस्थापन
पपई बागेत रासायनिक खतमात्रेसह जैविक निविष्ठांचा वापरदेखील केला जातो. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांच्या मात्रा नियमितपणे दिल्या जातात. एकरी मायकोरायझा १०० ग्रॅम, पीएसबी १ किलो व केएसपी १ किलो प्रमाणे मात्रा ठिबकद्वारे दिली आहे. मागील १५ दिवसांपूर्वी सूक्ष्म अन्नद्रव्यांसह १३ः०ः४५ एकरी ५ किलो प्रमाणे दिले.
कीड नियंत्रण
पपईमध्ये १५ दिवसांपूर्वी लाल कोळी तसेच पांढरी माशी, तुडतुड्यांचा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घेतली.
आगामी नियोजन
- पुढील १५ ते २० दिवसांत बागेत फळ तोडणीचे काम सुरू होईल. या तोडणीवेळी किमान २० टन पपई उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.
- काढणी पूर्ण झाल्यानंतर बागेस पोटॅश ५० किलो, डीएपी ५० किलो प्रति एकर प्रमाणे देण्याचे नियोजन आहे.
जागेवरूनच मार्केटिंग
- बागेतील पपई फळांच्या व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. त्यामळे फळांचा दर्जा उत्तम राखण्यास मदत होते. दर्जा चांगला असल्याने व्यापारी बागेवर येतात. त्यामुळे जागेवरून थेट विक्री केली जाते. त्यामुळे कोरडे कुटुंबीयांना फळांच्या विक्रीसाठी बाजारपेठेचा शोध घेण्याची आवश्यकता भासत नाही
- व्यापारी मजुरांच्या मदतीने थेट शेतामध्येच फळ तोडणी, प्रतवारी आणि पॅकिंगची कामे करतात.
- पपईची कलकत्ता, दिल्ली, जम्मू-काश्मीर अशा देशातील विविध बाजारपेठेत विक्री होते.
संपर्क - सचिन गजानन कोरडे, ९९२२५७८१६७
(शब्दांकन - गोपाल हागे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.