
Jalgaon News : खानदेशात पपई हंगाम (Papaya Season) अंतिम टप्प्यात आहे. उत्तर भारतासह इतरत्र उष्णता वाढत आहे. पपईची मागणी व दर (Papaya Rate) कमी झाल्याने हंगाम अंतिम स्थितीत आहे.
सध्या पपईला जागेवर प्रतिकिलो सहा ते साडेसात रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यात पपईचे काही वाणांची उत्पादन क्षमता फेब्रुवारीअखेरीस घटली. त्यांची पाने पिवळी, लाल होऊन गळून गेली.
त्यात फळांची उष्णतेत हानी सुरू झाली. परिणामी, दर कमी मिळत होते. तसेच पपईची मागणी थंडीत किंवा हिवाळ्यात अधिक असते. यंदा मार्चअखेरपर्यंत दर टिकून होते. मार्चमध्ये सरासरी साडेबारा रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर शेतकऱ्यांना मिळाला. परंतु या महिन्यात दरात मोठी घसरण झाली.
त्यामुळे पीक परवडेनासे झाले. उत्पादनक्षम वाणांतून दर्जेदार फळे येत आहेत. परंतु दर कमी मिळत आहे. मागील फेब्रुवारी व मार्चमध्ये लागवड केलेल्या पपईचे पीक काढण्यात आले आहे. दीड वर्ष सतत उत्पादन देणारे आणि सुमारे सात महिने उत्पादन देणारे वाण शेतकऱ्यांच्या पसंती उरतात.
कमाल शेतकरी सात महिने उत्पादन देणाऱ्या वाणास पसंती देतात. पुढे पपईचे क्षेत्र रिकामे करून त्यात केळीची लागवड कमाल शेतकरी करतात. कारण पपई पिकाचे बेवड केळीसाठी लाभदायी ठरते, असे शेतकरी मानतात.
पपईखालील निम्मे किंवा सुमारे पाच हजार हेक्टर एवढे क्षेत्र रिकामे झाले आहे. उर्वरित क्षेत्रही खानदेशात मेपर्यंत रिकामे केले जाईल. अनेक शेतकरी पपईचे क्षेत्र रिकामे करून त्यात मेढ्या बसवून घेत आहेत. लागलीच खोल नांगरणी करून क्षेत्र तापू देण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.
पपई लागवड स्थिती अशी...
खानदेशात सर्वाधिक चार हजार २५० हेक्टरवर लागवड शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात झाली होती. नंदुरबार जिल्ह्यात मिळून पाच हजार हेक्टरवर सर्वाधिक लागवड झाली होती. धुळ्यात सुमारे दोन हजार हेक्टर आणि जळगावात साडेतीन हजार हेक्टरवर पपई पीक होते. तापी, गिरणा, गोमाई, सुसरी, अनेर नद्यांच्या क्षेत्रात ही लागवड झाली होती. जळगावात चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व नंदुरबारात शहादा, तळोदा तालुक्यांत अधिकची लागवड करण्यात आली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.