Grape Management
Grape Management Agrowon
कृषी सल्ला

Grape Management : पाऊस, गारपीट यांचा द्राक्ष बागेतील परिणाम

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय 

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Rain Season : गेल्या तीन दिवसांपासून बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी बागेतून पाणी बाहेर निघून गेले.

द्राक्ष फळ असलेल्या बागेत फळांचे नुकसानही तितकेच झाले. या पावसाचा, गारपिटीचे परिणाम सध्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागेत कसे होतील, याचा विचार करू.

१) जुनी व फळे असलेली बाग

या बागेमध्ये फळ काढणी एकदम जवळ आलेली असताना बागेत पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी मणी क्रॅकिंग झाले, तर काही ठिकाणी अचानक साखर कमी झाल्याचे (शुगर रिव्हर्स) समजले. सध्याच्या परिस्थितीत होत असलेला पाऊस हा अवकाळी असल्यामुळे सारखा टिकून राहत नाही.

कुठेतरी जोरदार पाऊस किंवा गारांसह पाऊस पडेल. काही वेळातच पुन्हा उन्हे पडू लागतील. अशा परिस्थितीतील बागेत पाऊस किंवा गारा पडलेल्या कालावधीमध्ये जे काही नुकसान झाले, तितकेच नुकसान असेल. त्यानंतर उन्हे पडून तापमान वाढते. म्हणून अशा बागांमध्ये पुढे रोगांचा प्रादुर्भाव किंवा मणी सडण्याची समस्या दिसणार नाही.

अशा बागेमध्ये मण्यातील गोडीही कमी होणार नाही. तडकलेले किंवा खराब झालेले मणी काढून घ्यावेत. आपला घड स्वच्छ होईल, हे पाहावे. पाणी व खताचा पुरवठा पूर्ववत केल्यास पुढील अडचणी टाळता येतील. एकदा तापमान वाढायला लागून आर्द्रता कमी झाली की मण्यांत साखरेची समस्या नसेल. तसेच मणी पुन्हा सडत नसल्यामुळे रोगांची समस्या नसेल.

बागेत दुसऱ्या परिस्थितीत जर पाऊस किंवा गारपीट जास्त प्रमाणात होऊन ढगाळ वातावरणसुद्धा दोन दिवसांपर्यंत टिकून राहण्याची परिस्थिती असल्यास मात्र पावसाच्या वेळी झालेले नुकसान पुन्हा वाढताना दिसून येईल. या वेळी ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होऊन आर्द्रता वाढलेली दिसेल.

इतकेच नाही तर ही आर्द्रता जास्त काळ टिकून राहिल्यास अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल. मणी तडकून सडण्याची समस्येमुळे बागेत माश्यांचा प्रादुर्भावही दिसून येईल. एकदा या माश्यांचा प्रादुर्भाव बागेत झाला की अडचणी निर्माण होतात. या वेळी आपल्याला महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे असेल.

माश्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता वेलीवर किंवा घडावर कीडनाशकांची फवारणी टाळून केवळ जमिनीवर व्यवस्थितरीत्या फवारणी करून घ्यावी. यामुळे माश्यांचा प्रादुर्भाव संपण्यास मदत होईल. मणी सडत असलेल्या परिस्थितीमध्ये ताम्रयुक्त बुरशीनाशकाची एखादी फवारणी करून घ्यावी.

या वेळी बागेत जर मुळांच्या कक्षेत पाणी पूर्ण साचलेल्या परिस्थितीत काही दिवस पाणी बंद ठेवावे. (परिस्थितीनुसार तीन ते चार दिवस). वातावरण मोकळे होत असताना बागेत आर्द्रता जशी कमी होईल, तशा बागेतील समस्या कमी होतील. अशा वेळी घडातील खराब झालेले मणी (तडकलेले व कुजलेले मणी) काढून घ्यावेत.

ज्या बागेत अचानक मण्यातील साखर कमी झाल्याचा अनुभव आल्यास विद्राव्य खतातील पालाशची उपलब्धता (०-०-५०) दीड किलो प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे तीन ते चार दिवस या प्रमाणे करावी. त्यानंतर पाणी हळूहळू नियंत्रणात ठेवावे.

खरडछाटणी झालेली जुनी बाग

या बागेतही वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था दिसून येतील. त्यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन करावे.

१) नुकतीच खरडछाटणी होऊन सहा ते सात पाने अवस्थेत असलेली बागेत फुटींच्या विरळणीचा कालावधी होता. मात्र अचानक पाऊस झालेला असल्यास काही फुटी मोडलेल्या असतील. तर काही फुटींवर गारा व पावसामुळे जखमाही झालेल्या असतील.

या बागेत फुटीची विरळणी करतेवेळी जखम झालेल्या फुटी आधी काढून घ्याव्यात. उरलेल्या फुटींपैकी वेलीला मिळालेल्या क्षेत्रफळानुसार प्रति वर्गफूट अर्धी काडी अशा गुणोत्तर ठेवून फुटींची विरळणी करून घ्यावी.

गारांचा मार जोरात झालेल्या परिस्थितीत या वेळी विरळणीकरिता पर्याय नसेल. काही फुटी जोमदार तर काही अशक्तही ठेवाव्या लागतील. पुढील काळात सबकेन होईपर्यंत या फुटींची वाढ होऊन सर्वच फुटी एकसारख्या जोमदार करून घेता येतील.

२) फुटींची विरळणी झालेल्या बागेत गारपिटीमुळे गारांचा मारा बसून जखमा झालेल्या असल्यास मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो. किरकोळ जखम असलेल्या काडीला काही करण्याची गरज नसेल. मात्र काडीवर खोलवर जखम झालेल्या परिस्थितीत ती फूट जखमेच्या खाली एक डोळा राखून कापून घ्यावी.

पुन्हा नवीन फुटी वाढवून फलधारित काडी तयार करावी. या वेळी बागेत आर्द्रता जास्त टिकून राहिल्यास बगलफुटी जोमात निघतील. याकरिता नत्रयुक्त खतांचा वापर महत्त्वाचा असेल.

३) काही द्राक्ष विभागामध्ये (पुणे जिल्ह्यातील इंदापूर, नाशिक जिल्ह्यातील सटाणा) खरडछाटणी ही लवकर म्हणजेच फेब्रुवारी -मार्चमध्ये घेतली जाते. अशा बागेत सबकेन तयार झालेले असावेत. या बागेत मात्र पाऊस जास्त झाल्यामुळे फक्त काडीच मोडली नसेल, तर पानेही फाटलेली किंवा चिरलेली दिसून येतील.

पुढील काळात काडी चांगली तयार होऊन फलधारित डोळ्याचा आकार वाढणे तितकेच गरजेचे आहे. या करिता अन्नद्रव्याचा साठा महत्त्वाचा असतो. हा वेलीवर उपलब्ध असलेल्या पानांद्वारे प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून हे शक्य होत असल्यामुळे वेलीवर पानांचे क्षेत्रफळ तितकेच गरजेचे आहे.

साधारणतः ८ ते १० मि.मी. जाड काडीवर १६० ते १७० वर्ग सेंटिमीटर आकाराचे १६ ते १७ पाने गरजेची असतात. या गोष्टीचा विचार करता आपल्या बागेत किती प्रमाणात पानांचे नुकसान झाले, यानुसार पुन्हा पाने वाढवून घ्यावीत.

खरडछाटणी झालेली पण गारपीट, पाऊस न झालेली बाग

या बागेत गारपीट व पाऊस झालेला नसेल. मात्र बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये घट झालेली दिसून येते. याचा वेलीच्या वाढीवर पोषक परिणाम होईल. ज्या बागेत सबकेन झालेले असल्यास (४० ते ६० दिवसांचा कालावधी) नत्रयुक्त खतांचा वापर बंद करावा.

तसेच पाण्यावर बऱ्यापैकी नियंत्रण राहील, याची काळजी घ्यावी. कारण ढगाळ वातावरणात वाढविलेले पाणी व नत्राचे परिणाम वेलीचा जोम नेहमीपेक्षा जास्त राहतो. त्याचा विपरीत परिणाम सूक्ष्म घड निर्मितीवर होतो. ढगाळ वातावरण असलेल्या परिस्थिती शक्य झाल्यास स्फुरदचा वापर जास्त प्रमाणात करावा.

आपल्या बागेत वाढीची अवस्था, बागेतील तापमान व आर्द्रता याचा विचार करून पाणी व अन्नद्रव्ये यांचे व्यवस्थापन करावे. पहिला सबकेन झालेल्या बागेत तीन ते चार पानांच्या अवस्थेत सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणे गरजेचे समजावे.

चांगली घड निर्मिती होण्याच्या दृष्टीने झिंक सल्फेट २ ग्रॅम, फेरस सल्फेट २ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्वतंत्र फवारण्या करून घ्याव्यात. दोन फवारण्यांमध्ये एक दिवसाचे अंतर फायद्याचे राहील. त्याच प्रमाणे जमिनीतूनही मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो प्रति एकर या ठिबकद्वारे द्यावे.

दुसरा सबकेन झालेल्या परिस्थितीत मॅग्नेशिअम सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी शक्यतो सायंकाळी केल्यास परिणाम चांगले मिळतात.

या सोबत झिंक सल्फेट १० किलो, फेरस सल्फेट १० किलो, बोरीक अॅसिड २ किलो प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे. ही खते देताना त्यामध्ये दोन दिवसांचे अंतर ठेवावे. या वेळी पाणी व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे असेल. बदलते वातावरण व वाढीचा जोम कसा आहे, याचा विचार करून पाणी कमी अधिक करावे.

संपर्क - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये कांदा आणि टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून निषेध तर मेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

Vegetable Market Rate : कोबी वधारला; काकडी उतरली, कांदा, बटाटा, लसूण स्थिर; आंबा स्वस्त

Agriculture Water Dams : कोल्हापुरातील मोठ्या धरणांत गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठी, वळीव पावसाने दिलासा

Lok Sabha Election 2024 : राज्यात ५ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT