
मंदार मुंडले
भारतीय फलोत्पादन आणि त्यातही द्राक्ष उद्योगाने (grape industry) युरोपासह जागतिक बाजारपेठ काबीज करून देशाची मान उंचावली. या उत्तुंग यशात विविध घटकांपैकी अमूल्य योगदान लाभले ते शास्त्रज्ञांचे. डॉ. इंदू सावंत हे त्यातील महत्त्वपूर्ण नाव.
उत्तर प्रदेशातील तराई पट्ट्यात शेतकरी कुटुंबात त्यांचे बालपण गेले. वडील सुरेश चंद्र माथूर यांच्याकडून गहू, भात, मोहरी शेतीचे धडे त्यांनी गिरवले. आजोबांमुळे निसर्गावर प्रेम जडले. आपल्या नातीने कृषी शिक्षण घ्यावे ही त्यांची इच्छा होती.
शेती-मातीचा जडलेला लळाच डॉ. इंदू यांना वनस्पतिशास्त्र पदवीपर्यंत घेऊन गेला. गाइड डॉ. ए. एन. मुखोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पंतनगर येथील जी. बी. पंत कृषी विद्यापीठातून कुटुंबातील पहिल्या ‘डॉक्टरेट’ होण्याचा मान त्यांनी मिळवला.
शास्त्रज्ञपदाचा प्रवास
सन १९८५ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली येथून शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेच्या (बंगळूर) कोडागू (कर्नाटक) येथे दशकभराचा अनुभव घेतला. तेथे कॉफी पीक अवशेषांचा वापर करून ट्रायकोडर्मा मित्रबुरशीचे तंत्रज्ञान विकसित केले.
फायटोप्थोरा रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांसाठी हे जैविक तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरले. डॉ. इंदू १९९७ मध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात (एनआरसी) (पुणे-मांजरी) रुजू झाल्या. वरिष्ठ, प्रमुख शास्त्रज्ञ आणि त्यानंतर संस्थेच्या संचालकपदी (प्रभारी) त्यांची निवड झाली.
सन २०१९ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. तब्बल ३३ वर्षांची यशस्वी, उज्वल अशी त्यांची शास्त्रज्ञपदाची कारकीर्द राहिली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून तब्बल ९० संशोधन प्रबंध प्रसिद्ध, नऊ ‘बुक चॅप्टर्स’, तांत्रिक, लोकप्रिय लेख अशी मोठी संपदा त्यांच्या नावे आहे. सहा विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’साठी गाइड म्हणून मार्गदर्शन केले आहे.
द्राक्षातील संशोधन
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून उपाय शोधणे, बुरशीनाशकांचा कमीतकमी वापर करून द्राक्षातील रोगांचे प्रभावी व्यवस्थापन हे डॉ. इंदू यांच्या संशोधनाचे केंद्रबिंदू राहिले. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी, हार न मानणे, सकारात्मकता, खडतर परिश्रम या गुणांच्या आधारे त्यांनी संशोधन क्षेत्रात वेगळी उंची गाठली.
द्राक्ष पीक रोगांना संवेदनशील असल्याने बुरशीनाशकांचा वापर अनिवार्य राहतो. त्यामुळे त्यांचे अवशेष पिकात राहण्याची आणि निर्यातीत' रिजेक्शन’ येण्याची मोठी समस्या होती. अशावेळी जैविकसह ‘रेण्वीय’ (मॉलिक्यूलर) तंत्र संशोधनावरही भर दिला.
महत्त्वपूर्ण संशोधन व निष्कर्ष
-भारतासारख्या उष्णकटीबंधीय प्रदेशातील डाऊनी, पावडरी मिल्ड्यू, ॲथ्रॅकनोज या रोगांच्या बुरशींचे जीवशास्त्र व जीवनचक्र जगातील समशितोष्ण भागापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे संशोधनाची दिशा तशी हवी.
-भारतात ‘बोट्रायटीस’ रोग आढळत नाही. मात्र काढणी पश्चात अन्य बुरशीजन्य रोग ट्रायकोडर्माच्या काढणीपूर्व दोन फवारण्यांनी नियंत्रणात येऊ शकतात.
-पावडरी मिल्ड्यूसाठी केवळ रासायनिक बुरशीनाशकांचा वापर न करता ट्रायकोडर्मा सोबत गंधक किंवा किटोसान सोबत ॲपीलोमायसिस क्विसक्वॅलीस (मित्रबुरशी) घटकांच्या फवारण्या आलटून पालटून केल्यास नियंत्रण अधिक प्रभावी मिळते.
-डाऊनी प्रादुर्भावित द्राक्षवेलींच्या पानांवर ट्रायकोडर्मा अधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये आर्द्र हवामानात गोड्या छाटणीआधी त्याची फवारणी उपयुक्त ठरते.
त्यातून उन्हाळ्यात मातीतील डाऊनीच्या बुरशीला अटकाव होऊ शकतो.
-बॅसिलस जिवाणूच्या ‘स्ट्रेन’ची द्राक्षमण्यांवर फवारणी केल्यास त्यावरील कीडनाशकांच्या अवशेषांचे जलद गतीने जैविक पद्धतीने विघटन होते.
-‘डाऊनी’, ‘पावडरी मिल्ड्यू’ रोगांच्या बुरशींमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकांविरुद्ध विकसित होणारी प्रतिकारक्षमता यावर महत्त्वाचे संशोधन केले.
-अशा सर्व संशोधनातून जैविक उपायांचा अधिकाधिक वापर असलेली रोग नियंत्रणाची प्रभावी पद्धती- रणनीती विकसित करून प्रात्यक्षिके घेतली. ‘एनआरसी’ने तांत्रिक पुस्तिकेद्वारे त्याचा प्रसार केला.
कार्याचा सन्मान
-डॉ. इंदू यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन संशोधन पोचवले. निगर्वी, नम्रता, सच्चेपणा, सर्वांमध्ये मिसळण्याची वृत्ती यातून शेतकऱ्यांच्या हृदयात आदराचे, प्रेमाचे स्थान निर्माण केले.
-महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाकडून २००६ व २०१९ मध्ये गौरव.
-इंडियन ‘फायटो पॅथॉलॉजिकल सोसायटी’कडून (नवी दिल्ली) सर्वोत्कृष्ट संशोधन प्रबंधासाठी (बेस्ट रिसर्च पेपर) ‘एम.जे. नरसिंह मेडल’द्वारे सन्मान. (२०२३)
-अन्य संस्थांकडून प्रबंध, परिषदांमधून ‘पोस्टर प्रेझेंटेशन’साठी गौरव.
-शारदा लेले स्मरणार्थ पुरस्कार (२०१७)
जीवनातील कसरत
कर्नाटकातील संशोधन केंद्रात कार्यरत असताना मुलगा लहान होता. छोटं गाव असल्यानं ‘डे केअर’ची सुविधा नव्हती. तिथली दाक्षिणात्य भाषा समजत नसे. मात्र परिस्थितीशी जुळवून घेत
मुलाचं पालनपोषण, घर, स्वयंपाक आणि संशोधन या सर्व कसरती डॉ. इंदू यांनी हिमतीने लीलया पार पाडल्या. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचं सुरुवातीचं स्वरूप छोटं होते.
त्यामुळे वरिष्ठ शास्त्रज्ञपदासह केंद्रविकास उपक्रमांचीही जबाबदारी होती. प्रसंगी रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं. पती आणि दापोली कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत तसेच घरातील वडीलधाऱ्यांची अखंड साथ, प्रेरणा लाभली. मुलगा ओंकार, सून सायली व नातू आराध्य यांच्या संगतीत आज आज्जीच्या भूमिकेत समाधानी जीवन अनुभवताना आजपर्यंत केलेले कष्ट हलके होऊन जातात.
आरोग्यदायी अन्नाबाबत डॉ. इंदू अत्यंत आग्रही आहेत. सध्या त्यांचे दापोलीत वास्तव्य आहे. सेवानिवृत्तीनंतरही न थांबता डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, दापोली कृषी विद्यापीठ यांच्यासोबत त्या कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या सेवेचे व्रत अखंड सुरू आहे. द्राक्ष बागांमधून डाऊनीला हद्दपार करून भुरीही सहज आटोक्यात येईल असं कार्य करण्याचं स्वप्न बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे.
संपर्क - डॉ. इंदू सावंत, ८६०५०१७६१८, ८२६५०४३३१८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.