Pest management on citrus fruits
मोसंबी व संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये पाने पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी (लेमन बटरफ्लाय) या किडीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. या किडींचे योग्य वेळीच व्यवस्थापन करावे. पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर)
ही कीड वर्षभर कार्यक्षम असून, जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.या किडीमुळे खैऱ्या रोगाचा प्रसार होतो.लहान रोपट्यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. या किडीची अळी फिकट पिवळसर असून, प्रथम अळी अवस्थेत पानात शिरते. आतील हरित द्रव्य खाते. त्यामुळे पानावर नागमोडी रेषा दिसतात. शेवटी अशी पाने वेडीवाकडी होऊन वाळलेली दिसतात.लहान झाडावरील कीडग्रस्त पाने तोडून टाकावे. ही क्रिया फक्त पावसाळ्यातच करावी. नवीन पालवी फुटतेवेळी करू नये.नत्रयुक्त खताचा जास्त प्रमाणात वापर करू नये.सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.जास्त प्रादुर्भाव असल्यास, इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) २.५ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पाने खाणारी अळी (लेमन बटरफ्लाय) ओळख
या किडीचा त्रास प्रामुख्याने रोपवाटिकेत होतो. याचे पतंग काळ्या पिवळ्या आकर्षक रंगाचे असतात.लहान अळ्या तपकिरी रंगाच्या व त्यावर पांढरे ठिपके असतात. त्यामुळे त्या पक्ष्यांची विष्ठा पडल्याप्रमाणे दिसतात.मोठ्या अळ्या हिरवट रंगाच्या असतात. या अळ्या कोवळी पाने खातात. जर जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पर्णविरहित होऊ शकते.अंडी, अळ्या व कोष हातांनी गोळा करून कीटकनाशक मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.शक्य असल्यास झाड हलवून खाली पडलेल्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.बागेतील अथवा आजूबाजूस असलेल्या बावची या खाद्यतणाचा वेळोवेळी बंदोबस्त करावा.सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.ट्रायकोग्रामा, अपेन्टेलस, कॅरोप्स या सारख्या मित्र कीटकांचे संवर्धन करावे.फवारणी प्रति लिटर पाणी क्विनाॅलफॉस (२५ ईसी) ३ मिलि.किडीचे योग्य वेळी व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टाळता येईल.- डॉ. संजोग बोकन, (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० डॉ. अनंत लाड, (सहाय्यक प्राध्यापक), ७५८८०८२०२४ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)