Pure culture of Trichoderma.
Pure culture of Trichoderma. 
कृषी सल्ला

ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धती

डॉ. विक्रम घोळवे, मयूर नवले, डॉ. के. आर. कांबळे

ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते. ती रोपांच्या मुळांवर पातळ थरांमध्ये वाढताना रोपाच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते. मुळांची लांबी व संख्या वाढून रोपांची वाढ जोमदार होते. मुळांवर पातळ थरामुळे रोगकारक बुरशींना मुळांपर्यंत पोचता येत नाही. म्हणजेच रोपांचे रोगांपासून रक्षण होते. सामान्यतः बुरशी हा शब्द येताच पिकावरील रोगांचे व त्यामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. मातीमध्ये असंख्य प्रकारच्या बुरशी आहेत. त्यातील काही बुरशी पिकांसाठी रोगकारक असतात. तर काही बुरशी पिकांचे रोगांपासून संरक्षण करतात. त्यांना मित्र बुरशी असे म्हणतात. त्यातील ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते. ती रोपांच्या मुळांवर पातळ थरांमध्ये वाढताना रोपाच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते. मुळांची लांबी व संख्या वाढून रोपांची वाढ जोमदार होते. मुळांवर पातळ थरामुळे रोगकारक बुरशींना मुळांपर्यंत पोचता येत नाही. म्हणजेच रोपांचे रोगांपासून रक्षण होते. म्हणून मातीतून येणाऱ्या रोगांसंदर्भात एकात्मिक व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी महत्त्वाची ठरते. ट्रायकोडर्माच्या अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन महत्त्वाच्या प्रजाती मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. त्या शेती व पिकाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि महत्त्वाच्या आहेत. शेतीमध्ये त्याचा वापर केल्याने निसर्गात कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.  ट्रायकोडर्माची पिकांतील कार्यपद्धती 

  • पिकातील अँटिऑक्सिडेंट क्रियांचे प्रमाण वाढवते. 
  • ट्रायकोडर्मा ही जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. 
  • ट्रायकोडर्मा हे ग्लायटॉक्झिन व व्हिरिडीन नावाचे प्रतिजैविक मातीमध्ये निर्माण करतात. त्यामुळे रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी होते. 
  • वापरण्याच्या पद्धती बीजप्रक्रिया बीज प्रक्रियेकरिता ट्रायकोडर्मा १० ग्रॅम किंवा मिलि प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बियाणास वापरावे. गुळाचे पाणी करून त्यात ट्रायकोडर्मा मिसळावा. त्याचे द्रावण १ किलो बियाण्यांवर शिंपडावे. नंतर सर्व बियाणे एकत्र करून हलक्या हाताने चोळावे. नंतर ते बियाणे सावलीमध्ये प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून ठेवावे. बियाणे काही वेळाने वाळल्यावर पेरणीसाठी वापरावे.  कंद प्रक्रिया  ट्रायकोडर्मा २०० ग्रॅम किंवा मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे. लागवडीसाठी निवडलेले कंद या द्रावणात ३० ते ६० मिनिटे बुडवून ठेवावेत. त्यानंतर ते बाहेर काढून सावलीमध्ये वाळवावेत. नंतर लागवडीसाठी वापरावेत. तसेच कंद प्रक्रियेसाठी ‘बायोप्रायमिंग’ या पद्धतीचा वापर करू शकतो. या पद्धतीमध्ये तयार केलेल्या द्रावणामध्ये कंद रात्रभर भिजण्यास ठेवून द्यावेत.  दुसऱ्या दिवशी भिजलेल्या कंदाचा लागवडीस वापरावेत. या पद्धतीमुळे कंदाला लवकर फुटवा येण्यास मदत मिळते. कंदांचा बुरशीजन्य रोगांपासून बचाव होतो.  मातीमध्ये मिसळणे ट्रायकोडर्मा भुकटी ५ किलो प्रति २५० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी शेतामध्ये पेरणीपूर्वी मशागतीच्या वेळी टाकावी. जमिनीतून पसरणाऱ्या रोगकारक बुरशींना आळा बसतो.  फवारणी फवारणीकरिता ट्रायकोडर्मा १० मि.लि. किंवा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पिकांवर फवारणी करता येते. आळवणी   ट्रायकोडर्मा २० १० मिलि किंवा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे झाडाच्या मुळांजवळ पारंपरिक पद्धतीने किंवा फवारणी पंपाचे नोझल काढून आळवणी करता येते. ठिबकद्वारेही सोडता येते. शेतीमध्ये ट्रायकोडर्मा वापरण्याचे फायदे 

  •  ट्रायकोडर्मा या बुरशीची बीजपक्रिया केल्याने उगवणशक्ती वाढते. 
  • वनस्पतीच्या जैवरासायनिक प्रक्रियेत बदल करून वनस्पतीची प्रतिकारकशक्ती वाढवते. 
  • रोपांच्या मुळांच्या संख्येत आणि लांबीमध्ये वाढ होते. पिकाची वाढ जोमात होते. 
  • रोपांच्या मुळांवर ट्रायकोडर्माची वाढ झाल्याने रोगकारक बुरशीचा प्रवेश मुळांपर्यंत होऊ शकत नाही. त्यामुळे रोप कुजणे, मूळकूज, कंठीकूज, कोळशी दाणेबुरशी, बोट्रायटिस, मर इ. रोगांपासून संरक्षण मिळते. 
  • ट्रायकोडर्मा ही बुरशी मातीमध्ये सेंद्रिय पदार्थावरही वाढते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ व्यवस्थित असलेल्या जमिनीमध्ये तिचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहते.
  • ही काळजी जरूर घ्यावी.

  • कोरड्या जमिनीत ट्रायकोडर्माचा वापर करू नये.
  • ट्रायकोडर्मा वाढीसाठी जमिनीमध्ये योग्य आर्द्रता आवश्यक आहे. 
  • ट्रायकोडर्माद्वारे प्रक्रिया केलेले बियाणे थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये.  
  • पुढील पीक आणि बुरशीजन्य रोगांवर ट्रायकोडर्मा उपयुक्त ठरते    ज्वारी. .............................काणी, कोळशी, दाणेबुरशी    हळद ..............................कंदकूज   आले  (अद्रक) ...................कंदकूज   तूर ...................................फायटोप्थोरा, मर    हरभरा .............................मर, मूळकूज   सोयाबीन ..........................मर, मूळकूज   मिरची ...............................मर, मूळकूज   भुईमूग ..............................कंठीकूज, मूळकूज   टरबूज ................................मर   मोसंबी ................................मर   केळी ...................................मर

    - डॉ. विक्रम घोळवे,  ७५८८०८२९१२ (वनस्पती रोगशास्त्र विभाग, ज्वारी संशोधन केंद्र व बीज प्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT