सजीव कुंपणासाठी काटेरी झुडपे व पाला खाण्यास योग्य नसलेल्या वृक्षांच्या प्रजातींचा वापर करावा 
 स्थानिक गरजेनुसार सजीव कुंपणासाठी वृक्षांची निवड करावी. सजीव कुंपणासाठी निवडलेल्या वनस्पती या बहुउपयोगी असाव्यात. यामुळे पीक संरक्षणासोबतच त्यापासून मिळणाऱ्या अन्य उत्पादनातून आर्थिकदृष्ट्या फायदा होईल.       सामान्यपणे कुंपण करण्यासाठी दगड, माती, विटा, लोखंडी खांब, बांबू किंवा लाकडाचे खांब वापरले जातात. परंतु या प्रकारच्या कुंपण उभारणीसाठी जास्त खर्च येतो. दोन शेतांची विभागणी, बांधावरील रिकामी जागा यावर वृक्षांची किंवा झुडूपांची लागवड करून कुंपण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. यालाच सजीव कुंपण असे म्हणतात. यामुळे बांध बंदिस्तीबरोबरच वेगाने वाहणारे वारे, मोकाट जनावरे आणि वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण होऊ शकते.       सजीव कुंपणासाठी उपयुक्त वनस्पती     करवंद, सागरगोटे, सुबाभूळ, निवडुंग, घायपात, घाणेरी, निर्गुडी, विलायती चिंच, विलायती बाभूळ, तुती, शेवरी, बेशरम, मेहंदी, बोर, चिलाटी, हिंगनबेट, जट्रोफा, सावर, शेवगा, हेटा, बांबू व सीताफळ इ.       असे असावे सजीव कुंपण  
 लागवड पद्धती     महाराष्ट्रामध्ये विभागवार स्थानिक गरजेनुसार सजीव कुंपणासाठी वृक्षांची निवड केली जाते. कोकणामध्ये चिऱ्याच्या भिंती (३ x३ फूट) उभारून त्यावरती माती टाकून यूफोर्बियाच्या (त्रिधारा) फांद्या लावल्या जातात. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये घायपात, निर्गुडी, ग्लिरिसिडीया किंवा करवंदांची रोपे एक ओळींमध्ये लावतात. विदर्भामध्ये त्रिधारा, करवंद, जट्रोफा, चिळती, केतकी, मेहंदी, सीताफळ किंवा बांबू इत्यादी वृक्ष कुंपणासाठी वापरल्या जातात.
 संपर्क ः संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७   (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)