Majhi Vasundhara  Agrowon
ग्रामविकास

Majhi Vasundhara Abhiyan : पर्यावरणाचे संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियान

Article by Sumant Pande : पर्यावरणाच्या आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

Environmental Conservation : इसवी सन १७५० पासून हवामान बदलांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जगातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काही निश्‍चित मानके ठरविले. त्यांच्या निष्कर्षानुसार गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधीमध्ये हवामान बदलाच्या बदलाचे परिणाम अभ्यासले आहेत. हवामान बदलाच्या परिणामाबाबत शास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहे.

हवामान बदलाचा परिणाम होतो आहे आणि परिणाम होतच नाही असे म्हणणारे शास्त्रज्ञ देखील आहेत. त्यांच्यामध्ये टोकाचे वैचारिक अंतर आहे. परंतु वस्तुस्थिती काही वेगळंच सांगते. मागील सुमारे तीन ते चार दशकांपासून जग हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात असल्याचे स्पष्टपणे दिसते.

याचे प्रमुख कारण मानवी हस्तक्षेप. यावर जागतिक स्तरावर एकमत झालेले आहे. जीवाश्म इंधन आणि त्याचा बेसुमार वापर हे त्यापैकीच एक कारण आहे, असे बहुतांशी पूरक विचार असणारे शास्त्रज्ञांचे मत आहे.

हवामान बदलाच्या परिणामांचे गांभीर्य वाढत आहे. तापमानवाढ, सागरी पृष्टभागाच्या तापमानात होणारी वाढ, सागरी प्रवाहात बदल इ. हा सृष्टीचा नियम आहे हे सर्वश्रुत आहे. तथापि, मागील पाच ते सहा दशकांच्या कालावधीत झालेले बदल हे सुमारे आठ लक्ष वर्षांमध्ये झालेल्या बदलांइतके मोठ्या तीव्रतेचे आहेत असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

जागतिक तापमानामध्ये सरासरी एक अंश सेल्सिअसपेक्षा कमीने वाढ झाल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. हे प्रमाण अधिक नाही असे काही शास्त्रज्ञांचे मत असले तरी कार्बन डायऑक्साइड या वायूच्या उत्सर्जनामध्ये होणारी वाढ ही वातावरण बदलाचे वाढीस पोषक ठरते. यामुळे तापमान वाढीचा धोका अधिक संभवतो.

याचा मानवासह इतर जीवसृष्टीवर होणारा परिणाम चिंता करण्याजोगा आहे. म्हणजे तापमानात प्रचंड वाढ होणे, अथवा घट होणे, पावसाचे असमान वितरण, ढगफुटी, अतिवृष्टी, दुष्काळ. या बदलांचे परिणाम कृषी क्षेत्रावर, पशुधनावर आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर निश्‍चित विपरीत प्रभाव टाकणारे ठरतात. म्हणूनच याचे गांभीर्य ओळखून त्यावर कृती करणे हे गरजेचे आहे.

प्रश्‍न वैश्‍विक असला तरी त्याचे उत्तर मात्र बऱ्याच अंशी स्थानिकच आहे. भारतासारख्या विशाल देशात प्रशासकीय चौकट मजबूत आहे आणि ग्रामपंचायत ते नागरी स्थानिक संस्थाचा पाया स्थिर आहे. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था नेमकेपणाने कार्य करू शकते. म्हणून त्यांना योग्य दिशा आणि कार्यक्रम देणे गरजेचे होते.

माझी वसुंधरा अभियान :

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल या विभागाने ‘माझी वसुंधरा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्याची आपण तपशीलवार माहिती घेऊ.

माझी वसुंधरा अभियान हा राज्यातील स्थानिक संस्थांमधील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्त्वांवर (पंचमहाभूतांवर) आधारित राबवण्यात येणारा पहिला कृतिशील उपक्रम आहे. हे अभियान २ ऑक्टोबर २०२० रोजी पर्यटन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग याद्वारे सुरू करण्यात आले. आज या कार्यक्रमाचा चौथा टप्पा म्हणजेच ‘वसुंधरा ४.०’ या नावाने राज्यात राबविला जात आहे.

या अभियानांतर्गत नागरी स्थानिक संस्था आणि ग्रामपंचायती या स्थानिक संस्थांच्या पर्यावरणाचे जतन, संरक्षण आणि संवर्धनासाठी योजना प्रभावीपणे आणि मिशन मोडवर राबविण्यासाठी स्पर्धा घेतली जाते.

माझी वसुंधरा अभियान नेमके काय आहे?

निसर्गाच्या पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून त्या प्रभावीपणे आणि मिशन मोड पद्धतीने राबविण्यासाठी इंडिकेटर स्वरूपात असलेली टूलकिट तयार करून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली जाते. यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांना गुण देण्यात येतात. या टूलकिटनुसार विविध उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एप्रिल ते मार्च या एका वर्षाच्या कालावधीत राबविल्या जातात.

वस्तुतः पर्यावरणाच्या आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक जीवनशैली ही लोक चळवळ व्हावी हा या सर्व अभियानाचा पाया आहे. यामध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन, हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होणे आणि शाश्‍वत निसर्गपूरक जीवनशैलीचा अंगीकार लोकांकडून व्हावा. या तीन स्तंभावर माजी वसुंधरा अभियान उभे राहिले आहे.

अत्यंत कुशलतेने या अभियानाची रचना करण्यात आलेली आहे. हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक ठरते. या जनजागृतीसाठी अनेक विभागांकडून स्वतंत्रपणे योजना राबविण्यात येतात. अशा सर्व योजना एकत्र करून ते माजी वसुंधरा अभियानाच्या स्पर्धेमध्ये भाग घेणे आणि पर्यायाने त्या योजनांची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात होणे हा अग्रक्रम आहे.

अभियानाची कार्यपद्धती :

माझी वसुंधरा अभियानामध्ये निसर्गाच्या पंचमहाभूतांच्या तत्त्वावर काम केले जाते. यामध्ये भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या तत्त्वांचा समावेश होतो. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागृत करून पर्यावरणाच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले जातात.

एप्रिल ते मार्च या बारा महिन्यांसाठी हे अभियान राबविण्यात येते.

संगणकीय प्रणालीचा वापर करून काही इंडिकेटर्स तयार करण्यात आलेली आहेत. आणि टूलकिटही देण्यात आलेली आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर संस्थांच्या स्तरावर झालेल्या कामाच्या नोंदी अचूकपणे ‘माझी वसुंधरा’ या पोर्टलवर अपलोड करणे महत्त्वाचे ठरते.

वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा घेऊन त्यानंतरच्या वर्षामध्ये याचे अहवाल ऑनलाइन स्वरूपात एमआयएस प्रणालीत भरणे आवश्यक आहे.

मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येते. आणि गुणांकन अधिक मिळालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिसे वितरित केली जातात.

अभियानाचे टप्पे :

अ) माझी वसुंधरा १.०

माझी वसुंधरा अभियानाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर २०२० पासून कार्यान्वित करण्यात आला. पहिला टप्पा हा सुमारे साडेपाच महिन्यांचा होता. त्यामध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे याचे पुढचे टप्पे कार्यान्वित करण्यात आले.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये १) अमृत, २) नगर परिषद, ३) नगरपंचायत ,४) ग्रामपंचायत असे चार गट ठेवण्यात आले होते.

अभियानाच्या पहिल्या वर्षामध्ये राज्यातील ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी (अमृत शहरे ४३, नगर परिषद २२२, नगरपंचायती १३० व ग्रामपंचायती २९१) यांनी सहभाग घेतला होता.

ब) माझी वसुंधरा अभियान २.०

हे अभियान १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आले होते. या अभियानातील विजेत्यांचा सन्मान ५ जून, २०२२ रोजी करण्यात आला होता.

या अभियानात एकूण ११९६८ स्थानिक स्वराज्य संस्थांची नोंदणी करून सहभाग घेतला होता. यामध्ये १) अमृत, २) नगर परिषद, ३) नगरपंचायत, ४) ग्रामपंचायत एक आणि ५) ग्रामपंचायत दोन. असे पाच गट ठेवण्यात आले होते.

या अभियानात निसर्गाच्या संबंधित पंचतत्त्वावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी अमृत गटवारीसाठी ६०००, तर अमृत गट वगळून इतर गटासाठी ५५०० गुण ठेवण्यात आले होते.

क) माझी वसुंधरा अभियान ३.०

या टप्प्याची सुरुवात जून, २०२३ मध्ये झाली होती.

- या अभियानामध्ये एकूण १६८२४ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण ११ गट करण्यात आले होते.

- या अभियानात निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी अमृत गटासाठी ७६००, तर अमृत गट वगळून इतर गटासाठी ७५०० गुण ठेवण्यात आले होते.

- या अभियानाच्या कालावधी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत होता.

ड) माझी वसुंधरा अभियान ४.०

माझी वसुंधरा अभियानाच्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी टूलकिट निर्गमित करून करण्यात आली. हे अभियान २२६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ४१४ व ग्रामपंचायती २२११८) अशी करण्यात आलेली आहे.

- स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्यानिहाय गट करून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्था

१) अमृत शहरे (४३)

- १० लाख पेक्षा अधिक लोकसंख्या. (१०)

- ३ ते १० लाख लोकसंख्या (१७)

- १ लाख ते ३ लाख लोकसंख्या (१६)

२) नगर परिषद व नगर पंचायत (३७१)

- ५० हजारांपेक्षा अधिक, परंतु १ लाखापेक्षा कमी लोकसंख्या.

- २५ हजारांपेक्षा अधिक, परंतु ५० हजारांपेक्षा पेक्षा कमी लोकसंख्या.

- १५ हजारांपेक्षा अधिक परंतु २५ हजारांपेक्षा पेक्षा कमी लोकसंख्या.

- १५ हजारांपेक्षा पेक्षा कमी लोकसंख्या.

३) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था (२२२१८)

- १० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती.

- ५ हजारांपेक्षा अधिक व १० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या.

- २.५ हजारांपेक्षा अधिक व ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या.

- १.५ हजारांपेक्षा अधिक व २.५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या.

- १.५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या.

या १२ नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था गटांमधून भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंच तत्त्वांना वेगवेगळे गुण देण्यात आले आहेत. त्यात नागरी गटासाठी गुणतालिका आणि ग्रामीण गटासाठी गुणतालिका भिन्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT