Water Development  Agrowon
ग्रामविकास

Watershed Development : पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध पाण्याच्या गुणवत्तेचे विश्‍लेषण

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Watershed Management : पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या पाण्याचे मूलस्थानीच संवर्धन होत असल्यामुळे पाण्याची गुणवत्ता चांगली असते. पाण्याचे वहन जितके कमी होईल, तितके प्रदूषणाची शक्यता कमी होते. या लेखामध्ये पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणी, त्याची गुणवत्ता व त्याचा उत्पादकतेवर होणारा परिणाम अभ्यासणार आहोत.

पाण्याची गुणवत्ता तपासताना उपलब्ध पाण्याचे गुणधर्म, त्यातील क्षारांचे प्रमाण आणि सामू यांचे विश्‍लेषण केले जाते. असे पाणी सिंचनासाठी वापरल्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास करणे गरजेचे असते. प्रस्तुत लेखकांनी कृष्णा व भीमा नदीच्या उप पाणलोट क्षेत्रांमध्ये (कृष्णा २२, कृष्णा २५, कृष्णा ३४ व भीमा ११४) केलेल्या अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान सिंचनासाठी आवश्यक क्षारपड व अल्कली धर्मीय रासायनिक गुणधर्मांचे मूल्यमापन करण्यात आले.

यासाठी मॉन्सूनपूर्व एकूण क्षारपड या वर्गवारीसाठी ४८ व अल्कलीधर्मीय वर्गवारीस ४८ अशा ९६ पाण्याच्या नमुन्यांचे विश्‍लेषण केले. याच पद्धतीने मॉन्सूनपश्‍चात ९६ पाण्याच्या नमुन्यांचे विश्‍लेषण केले. मॉन्सून पूर्वपरिस्थितीमध्ये क्षारपड या वर्गवारीसाठी एकूण पृथक्करण केलेल्या नमुन्यांपैकी १६ चांगले व ३१ मध्यम स्वरूपाचे, तर १ नमुना खराब मिळाला. सिंचनासाठी आवश्यक प्रमाणित निकषांबरोबर तुलना केल्यानंतर या पाणलोट क्षेत्रामध्ये उपलब्ध पाणी सिंचनासाठी चांगले असून, शेती उत्पादकता वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले.

याचप्रमाणे अल्कलीधर्मीय परिणामासाठी मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनपश्‍चात अशा दोन्ही वेळी पुन्हा ९६ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. निष्कर्षांती असे दिसून आले, मॉन्सूनपूर्व परिस्थितीमध्ये पृथक्करण केलेल्या ४८ नमुन्यांपैकी ३५ नमुने चांगल्या वर्गवारीमध्ये, तर १३ नमुने मध्यम स्वरूपाचे मिळाले. मॉन्सूनपश्‍चात सर्वच ४८ नमुने हे खूपच चांगल्या वर्गवारीमध्ये मिळाले. त्यामुळे पाणलोट क्षेत्र विकासातून मिळालेले पाणी क्षारपड व अल्कलीधर्मीय परिणामांबाबत उजवे ठरले. अशी समस्या असणाऱ्या क्षेत्रांमध्ये पाण्याचे मूलस्थानी संरक्षण केल्यामुळे या समस्या निश्‍चितपणाने कमी होऊ शकतात, हे अभ्यासात आढळले. त्याचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे. (तक्ता१)

Chart

मूलस्थानी जलसंवर्धन उपचारांचे परिणाम

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील एका शास्त्रज्ञ गटाने सन २०१४ -१५ मध्ये सीताफळ आणि हनुमानफळ बागेमध्ये सलग समतल चर खणण्याच्या उपचाराचा जमिनीतील आर्द्रता वरती व फळझाडांवरील परिणामांचा अभ्यास केला होता. या गटाच राजेश पाटोडे, नागदिवे, वानखडे आणि राममोहन रेड्डी यांचा समावेश होता. त्यांनी एक हेक्टर क्षेत्रावर खंडित सलग समतल चर घेऊन त्याचा उपरोक्त नमूद फळ बागांवरती होणाऱ्या फायद्यांचा अभ्यास केला आहे.

यासाठी एक हेक्टरचे क्षेत्र दोन भागांमध्ये विभागून त्याचे अ, ब, क आणि ड अशा प्रकारचे चार अंतर्गत क्षेत्रामध्ये रुपांतर केले. यामधील अ आणि ब या क्षेत्रात सीताफळ, तर उर्वरित क आणि ड क्षेत्रामध्ये हनुमानफळाची लागवड केली. अ आणि क या क्षेत्रामध्ये सलग समतल चर हा उपचार करण्यात आला. यास आपण उपचारीत क्षेत्र (T१) असे म्हणू. तर ब आणि ड या क्षेत्रांमध्ये सलग समतल चरांचा उपचार केली नाही.

Chart

त्याला आपण अनुपचारित क्षेत्र (T२) असे म्हणू. थोडक्यात, एक हेक्टर क्षेत्रापैकी अर्धा हेक्टर उपचारीत, तर अर्धा हेक्टर अनुपचारित ठेवण्यात आले. उपचारित व अनुपचारित क्षेत्रातील जमिनीतील आर्द्रता (Soil moisture) गॉफर प्रोफाइलरद्वारे मोजण्यात आली. या यंत्राआधारे ऑगस्ट २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या दरम्यान जमिनीमध्ये वेगवेगळ्या खोलीवर उदा. ० -१०, १०-२०, २०-३०, ३०-४०, ४०-५०, ५०-६०, ६०-७०, व ७०-८० सेंटिमीटर इतक्या खोलीवर आर्द्रता मोजण्यात आली.

हे मोजमाप आकारमानावरती आधारित (Volumetric basis Soil Moisture Content) वेगवेगळ्या महिन्यांमध्ये करण्यात आले. (तक्ता २ ) याच अभ्यासात सलग समतल उपचारांचा पर्णसंभाराच्या स्थितीवर होणारा परिणाम तपासला. जून ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये फळझाडांच्या नैसर्गिक पर्णसंभारामध्ये वाढ व पानांचा वाढलेला आकार याचा तुलनात्मक अभ्यास केला. उपचारित केलेल्या क्षेत्रांमध्ये दोन्हीही फळझाडांच्या पर्णसंभार व पानाच्या आकारांमध्ये वाढ झालेली दिसून आली. (तक्ता ३)

Chart

या दोन्हीही अभ्यासांवरून असे दिसून येते, की महाराष्ट्रामध्ये आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये फळबाग पिकांकडे वळत असताना लागवडी दरम्यान सलग समतल चरांचे उपचार केल्यास जमिनीतील नैसर्गिकरित्या आर्द्रता वाढते. त्याचा फायदा त्या फळबागेला होऊन उत्पादनातही वाढ होते. अभ्यासादरम्यान उपचारित क्षेत्रामध्ये सर्वाधिक आर्द्रता ६० ते ८० सें.मी. खोलीवर आढळली. याशिवाय वाढलेल्या जमिनीतील आर्द्रतेमुळे सीताफळाच्या पानांचा आकार ऑक्टोबर महिन्यामध्ये ०.७० मि.मी. व सप्टेंबर महिन्यामध्ये हनुमानफळाच्या पानांचा आकार १.९१ मि.मी. इतका अनुपचारित क्षेत्राच्या तुलनेमध्ये वाढल्याचे आढळले.

पानांचा आकार वाढल्यामुळे साहजिकच प्रकाशसंश्‍लेषणाची प्रक्रिया उत्तमरीत्या पार पडते. त्यामुळे एकूण फळ उत्पादकतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. सध्या पानांचा आकार वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर केला जातो. मात्र केवळ जमिनीतील आर्द्रता योग्य पातळीवर टिकवल्यासही आपल्याला ते परिणाम मिळू शकतात. त्यासाठी पाणलोट क्षेत्रातील एकूणच उपचार हे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nagar Rain Update : नगर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Crop Harvesting : खरिपातील पिकांच्या काढणीला पावसाचा अडथळा

Banana Market: नवरात्रीमुळे केळीचे भाव टिकून राहण्याचा अंदाज

Assembly Election : शेवगाव-पाथर्डी मतदार संघात आमदारकीसाठी ‘रस्सीखेच’

Palm Oil Import : भारताकडून एक लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द

SCROLL FOR NEXT