Poultry  Farming By Self Help Group
Poultry Farming By Self Help Group Agrowon
कृषी पूरक

Poultry Farming : कोंबडीपालनाने दिली बचत गटाला साथ

राजेश कळंबटे

कोळंबे (ता.जि. रत्नागिरी) गावातील वीस महिलांनी एकत्र येत श्रमिक उत्पादक गटाची स्थापना केली. परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन गटातील महिलांनी कोंबडीपालन (Poultry Farming) सुरू केले. योग्य नियोजनामुळे कोंबडी, अंडी विक्रीतून अपेक्षित आर्थिक नफा मिळू लागला. याचबरोबरीने भाजीपाला लागवड, प्रक्रिया उद्योगातूनही महिलांनी कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.

कोकणात सणासुदीच्या काळात चिकनची मागणी वाढते. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गट कुक्कुटपालनावर भर देत आहेत. गावठी कोंबड्यांना मागणी अधिक असल्याने सण येण्यापूर्वी तीन महिने अगोदर कोंबडी पिले आणण्याचे नियोजन केले जाते. तीन महिने कोंबडीचे पालनपोषण केल्यानंतर त्या विक्रीतून महिला बचत गटांना चांगले उत्पन्न मिळते. हीच पद्धत अवलंबत कोळंबे (ता.जि. रत्नागिरी) येथील श्रमिक उत्पादक गटातील वीस महिलांना वर्षभर रोजगाराचे साधन मिळाले आहे.

गटाची सुरुवात ः
कोळंबे गावातील अनेक कुटुंबांमध्ये गावठी कोंबड्यांच्या विक्रीमधून घरखर्च चालवण्याचा फंडा अनेक वर्षे राबवला जात आहे. या व्यवसायात वृद्धी करण्यासाठी गावातील महिला बचत गटांनी पावले उचलली. कुक्कुटपालनामधून चांगले पैसे मिळत असल्याने वीस महिलांनी एकत्र येत २०२० मध्ये श्रमिक उत्पादक गटाची स्थापना केली. या गटामध्ये दीपाली पाटील (अध्यक्ष), आरती पाटील (सचिव), मनाली तोडणकर, प्रांजल फडणीस, संपदा पवार, प्रतीक्षा पाटील, सोनाली कदम, रोशनी फडणीस, प्रवीणा पाटील, सिमल पाटील, समृद्धी नागवेकर, प्रणिता पवार, कल्पना आयरे, सुहानी हातिसकर, श्रद्धा नागवेकर, समीक्षा हातिसकर, सावरी पाटील या महिला सदस्या कार्यरत आहेत.
सध्या या गटात वीस महिला कार्यरत आहे. पहिल्या टप्यात गटातील सदस्यांना वैयक्तिक खर्चासाठी १५ हजार रुपये मिळाले. पुढील टप्यात प्रत्येक महिलेने आपापल्या बचत गटातून कुक्कुटपालनासाठी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज उचलले. बचत गटाने कोरोनातील टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी दोन महिने आधी रत्नागिरीतून एक दिवसांची गिरिराजा जातीची ५०० पिले आणली होती. त्या वेळी एक पिलू २५ रुपयांना मिळाले. प्रत्येक महिलेची व्यवसाय करण्याची क्षमता, घरगुती पोल्ट्रीसाठी जागेचे मूल्यमापन करून कोंबडीची पिले देण्यात आली. या पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायाला आरंभ झाला.

कोंबड्यांचे व्यवस्थापन ः
कोंबड्यांची चांगली वाढ होण्यासाठी खाद्य व्यवस्थापन आणि लसीकरणाकडे काटेकोर लक्ष दिले जाते.
गटातील सदस्या प्रतिक्षा उपेंद्र पाटील यांनी पहिल्या टप्यात १०० पिले घेतली होती. यांच्या व्यवस्थापनाबाबत त्या म्हणाल्या, की पहिल्या महिन्यात पिलांच्या संगोपनावर सर्वाधिक लक्ष ठेवावे लागते. पिल्ले लहान असल्याने त्यांना कडक धान्य खाता येत नाही. त्यामुळे सुरुवातीला गव्हाचा भरडा शिजवून दिला. पिलांची वाढ होत जाते तसे खाण्याचे प्रमाण वाढवावे लागते. त्यानुसार खाद्याच्या पिशव्यांची खरेदी करावी लागते. पिलांना भूक लागली की त्यांचा चिवचिवाट वाढतो. यावरही विशेष लक्ष दिले जाते. आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी लसीकरण करावे लागते. त्याचे प्रशिक्षण गटातील महिलांना दिले आहे. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कोंबड्यांना लसीकरण केले जाते.

टाळेबंदीत उत्पन्नाचे साधन ः
कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक उलाढाल थांबली होती. या कालावधीत कोळंबे गावातील श्रमिक गटाच्या महिलांना मोठा आधार झाला. गटाने टाळेबंदीपूर्वी जानेवारी २०२० मध्ये कोंबडीची पिले आणली होती. ती मार्च महिन्यात विक्री योग्य झाली. कोरोनातील टाळेबंदीमुळे या कोंबड्यांना गावातच चांगली मागणी मिळाली. एक कोंबडी साडेतीनशे रुपयांपर्यंत विक्रीस गेली. प्रतीक्षा पाटील यांना व्यवस्थापन खर्च वगळता दहा हजार रुपये नफा
मिळाला. काही कोंबड्या अंडी घालण्यासाठी ठेवल्या होत्या. त्यामधून दिवसाला साधारण पाच ते दहा अंडी मिळतात. सरासरी गावामध्ये दहा रुपयाला एक अंडे याप्रमाणे विक्री केली जाते. गटातील अन्य महिलांनाही या कालावधीत कोंबडी विक्रीमधून पाच हजारांपासून पुढे फायदा मिळाला.

वर्षातून तीन वेळा नियोजन ः
कोकणात शिमगोत्सव, गौरी-गणपतीच्या काळात कोंबड्यांना मोठी मागणी असते. गिरिराजा ही जात गावठी कोंबड्यांप्रमाणे दिसत असल्यामुळे ग्रामीण भागात सर्वाधिक मागणी आहे. सण लक्षात घेऊन गटातील महिला वर्षातून तीन वेळा कोंबडीची पिले खरेदी करून त्यांचे चांगले संगोपन करतात. गौरी-गणपती सणापूर्वी तीन महिने अगोदर महिलांनी पाचशे पिल्लांची खरेदी केली होती. त्यांचे योग्य व्यवस्थापन ठेवले. योग्य वाढ होताच गावामध्येच या सर्व कोंबड्यांची विक्री झाली. त्यामुळे गटातील महिलांना विक्रीसाठी दुकानदारांकडे जावे लागले नाही.


भाजीपाला, प्रक्रिया उद्योगाची जोड ः
गटातील प्रत्येक महिलेची पाच गुंठ्यांपासून ते अर्धा एकरापर्यंत पारंपरिक भातशेती आहे. भातशेती झाल्यानंतर त्यामध्ये कुळीथ, पावटे, भाजीपाला लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने पालेभाजी, मुळा, वाली, भेंडी, वांगी यांसारख्या भाज्यांची लागवड केली जाते. गटातील प्रत्येक महिला भाजीपाला विक्रीचा वैयक्तिक व्यवसाय करतात. लागवडीसाठी लागणारे बियाणे, खतांचा खर्च यासाठी बचत गटातून आर्थिक मदत मिळते.
साधारणपणे भाजीपाला विक्रीतून एका महिलेला प्रति महिना २ ते ३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. दोन महिलांकडे गांडूळ खताचे चार बेड आहेत. वर्षातून दोन वेळा गांडूळ खत तयार होते. गावातील शेतकऱ्यांना १५ रुपये प्रति किलो दराने गांडूळ खताची विक्री केली जाते. घरची भात शेती, भाजीपाला लागवडीसाठी गांडूळ खताचा वापर केला जातो. याचबरोबरीने गटातील काही महिला तळलेले गरे, कुळीथ, पावटे विक्री तसेच शिवणकामामधून आर्थिक उत्पन्न वाढवीत आहेत. यामुळे महिलांच्या वार्षिक उत्पन्नात भर पडत आहे.


‘‘कुक्कुटपालन व्यवसायामधून महिला गटाला आर्थिक आधार मिळाला आहे. येत्या काळात गटातर्फे एक हजार कोंबड्यांची पोल्ट्री सुरू करणार आहोत. त्यासाठी नियोजन सुरू केले आहे. गटातील महिलांनी कुक्कुटपालनाबरोबरच अन्य जोड व्यवसाय सुरू केले आहेत.
- प्रतिक्षा उपेंद्र पाटील, ८२०८८८६१८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT