Embryo Transplantation Technology Agrowon
कृषी पूरक

Embryo Transplantation Technology : भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे थारपारकर कालवडीचा जन्म

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Animal Care : पुणे : पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर पहिल्यांदाच थारपारकर कालवडीचा जन्म संकरित गाईच्या माध्यमातून झाला आहे. हे तंत्रज्ञान आगामी काळात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

...अशी तयार झाली थारपारकर कालवड
या प्रयोगामध्ये थारपारकर १३३ क्रमांकाची दाता गाय निवडण्यात आली. या गाईची दूध उत्पादन क्षमता प्रति वेत ३,२९३ किलो आहे. दाता वळू म्हणून थारपारकर जातीचा ‘फेथफूल’ नावाचा वळू निवडण्यात आला. वळूच्या आईचे दूध उत्पादन प्रति वेत ३००५ किलो आहे. दुधातील स्निग्धांश ४.८ टक्के आहे. प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून सात दिवसांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामधील ‘पीटी ८०’ या संकरित गायीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आला. २२ ऑक्टोबर २०२२ मध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले. १७ जुलै २०२३ रोजी या गाईने थारपारकर कालवडीस जन्म दिला. कालवडीचे जन्मतः वजन २१ किलो आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने २०२०-२०२४ या कालावधीसाठी मंजूर केला आहे. शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान राहुरी सीमेन स्टेशन (एनडीडीबी) यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. यामुळे उच्च वंशावळीच्या देशी गोवंशाची संख्या वाढवण्यास मदत होईल.
हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. धीरज कणखरे, तांत्रिक प्रमुख, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे तसेच राहुरी सीमेन स्टेशनचे डॉ. शिवकुमार पाटील हे संशोधनात्मक काम करत आहेत. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर आणि विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी सर्व शास्त्रज्ञाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

राज्यातील गोपालकांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. देशी गोवंशाच्या दूध उत्पादन क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास या संशोधन केंद्रामध्ये होत आहे. याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी मे २०२२ मध्ये या संशोधन केंद्रावर देशी गोवंशासंबंधी “गोधन २०२२” प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशी गोवंश संशोधन आणि शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण मिळण्यासाठी निधीची घोषणा केली होती, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

विद्यापीठासाठी अभिमानास्पद :
विद्यापीठामध्ये भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गाईंचा प्रकल्प शासनाने २०२० मध्ये कार्यान्वित केला. देशी गोवंशाचे जलद गतीने संवर्धन होण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान उपयोगाचे ठरणार आहे. गावठी किंवा संकरित गाईंच्या माध्यमातून उच्च वंशावळीच्या देशी गोवंशाच्या कालवडी तयार करून बदलत्या हवामानामध्ये तग धरणाऱ्या व रोग प्रतिकारक क्षमता जास्त असणाऱ्या देशी गाईंची संख्या वाढवून महाराष्ट्रात दूध उत्पादन वाढीस तसेच सेंद्रिय शेतीस मदत होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २० गीर आणि साहिवाल गोवंशाच्या कालवडी विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार झाल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत पहिल्या थारपारकर कालवडीचा जन्म झाला आहे, ही बाब सर्वांना प्रोत्साहन देणारी आहे.
- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय?

उत्कृष्ट आनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्री बीज मिळवले जाते. या स्त्री बीजाचे प्रयोगशाळेत चांगला आनुवंशिकता असलेल्या वळूच्या विर्यासोबत फलन केले जाते. तयार झालेल्या फलितांडाची (पोटेन्शियल झायगोट) प्रयोगशाळेत सात दिवस वाढ केली जाते. अशा प्रकारे तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता (Recepient) गाईमध्ये प्रस्थापित केले जाते. तिच्या गर्भामध्ये या भ्रुणाची वाढ होऊन नियमित कालावधीमध्ये उच्च दर्जाचे वासरू मिळू शकते. या सर्व तंत्रज्ञानाला भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान असे म्हणतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT