शोभिवंत मत्स्यपालनासाठी पाण्याची गुणवत्ता
पा ण्याच्या रसायनशास्त्रातील मूलभूत गोष्टींवर प्रभुत्व मिळविण्यापर्यंत आणि पाणी देखभाल तंत्र अवगत केल्याशिवाय टाकी किंवा तलावातील माशांसाठी निरोगी आणि सुरक्षित वातावरण राखणे कठीण आहे. पाण्याची गुणवत्ता ही माशांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. शोभिवंत मत्स्यपालनामधील पाण्याची गुणवत्ता चांगल्या प्रकारे ठेवावी. मत्स्य टाकी आणि मत्स्यतलावाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील पाण्याची गुणवत्ता. हे पाणी कोणत्या स्रोतांतून उपलब्ध होते यावर गुणवत्ता अवलंबून असते. माशांसाठी योग्य पाणी बनविण्यासाठी प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर हे पाणी माशांच्या टाकीत किंवा तलावात पुरेशा प्रमाणात वितरित करण्यात येते. या पाण्याचा वापर झाल्यानंतर त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मत्स्यालय आणि तलावाला पुरवठा करण्यात येणारे पाणी हे पूर्णपणे शुद्ध नसते. कारण त्यात विरघळलेले घटक आणि सूक्ष्म कणांचा समावेश असतो. त्यातील काही घटक माशांसाठी उपयोगी तर काही हानिकारक असतात. स्रोत किंवा पाण्यातील जलचर यांच्यामुळे पाणी दूषित होते असे नाही, परंतु हे मत्स्यालयामध्येही होऊ शकते. उदा. मत्स्यालयासाठी वापरण्यात आलेल्या घटकांमुळे पाणी दूषित होते.शोभिवंत मत्स्यालयामध्ये पुरवठा करण्यात आलेल्या पाण्याच्या प्रमाणावर त्यामध्ये साठविण्यात येणाऱ्या माशांची संख्या अवलंबून असते. हे पहिल्या दृष्टिक्षेपात वाटते, परंतु माशांची पाण्यात साठविण्यात येणारी संख्या ही पाण्यात विरघळलेल्या प्राणवायू आणि विषारी चयापचय उत्पादनाच्या संचयनानुसार ठरविण्यात येते.
पाण्याचे महत्त्वाचे घटक आणि मात्रा
तापमान
शोभिवंत माशांच्या जाती २१ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यानच्या तापमानात योग्यरितीने प्रजनन करू शकतात. पाण्याची तापमान पातळी २१ अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा ३० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास ते माशांना हानिकारक असते. पाण्याचे तापमान आवश्यक पातळीपेक्षा कमी होत असेल तर तापमान वाढविण्यासाठी थर्मोस्टेटिक हीटरचा वापर करावा. पाण्याचे तापमान गरजेपेक्षा जास्त असल्यास पृष्ठभागावर सावली करावी. पाणी हवेच्या बुडबुड्यांद्वारे सतत खेळते ठेवावे किंवा पाण्यात बर्फ टाकून पाण्याचे तापमान कमी करावे. पाण्याचे तापमान मोजण्यासाठी तापमापकाचा (थर्मामीटर) वापर करावा. काही वेळा मत्स्यपालकाला सामू नियंत्रित करण्याचे महत्त्व समजत नाही. सामू म्हणजे पाण्यातील आम्लता आणि अल्कली गुणधर्म दर्शविणारा निर्देशांक. सामूचा निर्देशांक ० ते १४ पर्यंत असतो. पाण्याचा सामू ७ असल्यास तटस्थ, ७ पेक्षा कमी असल्यास आम्लयुक्त आणि ७ पेक्षा जास्त असल्यास अल्कलीयुक्त समजला जातो. सामू एक महत्त्वाचा भौतिक गुणधर्म आहे. सामू हा एक लॉगरिथमिक स्केल आहे. याचा अर्थ असा आहे, की प्रत्येक संख्येदरम्यान दहा पट पातळीवर सामू बदलतो. उदाहरणार्थ, ५ सामू हा दहा पटीने ६ सामू पेक्षा जास्त आम्लीय आहे आणि ४ सामू हा शंभर पटीने ६ सामू पेक्षा आम्लीय आहे. माशासाठी पाण्याचा सामू ७ असावा. पण ८ सामूमध्ये असेल, तर मासा दहा पटीने अल्कलीयुक्त पाण्यात आहे असे समजावे. जर मासे ९ सामूमध्ये असतील तर ते मासे गरजेपेक्षा १०० पट जास्त अल्कलीयुक्त पाण्यात आहे असे समजावे. म्हणूनच सामूमध्ये लहान बदल करणे देखील माशांसाठी तणावपूर्ण स्थिती निर्माण करते. त्यामुळे ६ सामूची आवश्यकता असलेल्या माशांना ८ सामू असलेल्या माशांसोबत ठेवणे ही कल्पना योग्य नाही. पाण्याचा सामू बदलण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्यामध्ये वेगवेगळे रासायनिक घटक आहेत. ज्यामुळे पाण्याचा सामू कमी किंवा वाढवता येतो. पाण्याचा सामू कमी किंवा जास्त करण्यासाठी अनेक नैसर्गिक घटकांचा वापर करू शकतो. उदा. पीटचा वापर मत्स्यालयात किंवा फिल्टरमध्ये (गाळणी यंत्र) वापरल्यास पाण्याचा सामू आम्लयुक्त होईल. खनिज क्षार उदा. कॅल्शिअम. चुनखडी किंवा जलचरांच्या कवचामध्ये आढळतो. त्याचा उपयोग करून पाण्याचा सामू वाढविता येतो. जेव्हा आपण सामू वाढविण्यासाठी खनिजे क्षारांचा उपयोग करतो त्या वेळी पाण्याची जडता वाढते. मासे पाण्याचा सामू बदलांना खूप संवेदनशील असतात. सामूमध्ये वेगवान बदल झाल्यास मासे तणावाखाली येतात. त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. माशांच्या पाण्यातील सामू २४ तासांत ०.३ पेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास नळाचे पाणी हे साधारणत: अल्कली गुणधर्माचे असते. मत्स्यालयाचे पाणी बदलण्यापूर्वी नळाच्या पाण्याचा सामू तपासावा. आवश्यकतेनुसार समायोजन करावे. सागरी मत्स्यालयातील पाण्याचा सामू ८.२ ते ८.४ दरम्यान असावा. पाण्याचा सामू ९ पेक्षा जास्त झाल्यास पाण्यातील अमोनियाचा प्रभाव वाढून माशांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी जिप्समचा वापर सामू कमी करण्यासाठी करावा. पाण्याचा सामू मोजण्याकरिता पीएच मापक यंत्राचा उपयोग करावा. बहुतेक जलचरांना जगण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते. ते त्यांच्या अवतीभोवती असलेल्या वातावरण किंवा पाण्यातील प्राणवायू घेत असतात. शोभिवंत मत्स्यपालनामध्ये विद्राव्य प्राणवायूचा सतत पुरवठा ही एक महत्त्वपूर्ण आणि मूलभूत गरज आहे. विद्राव्य प्राणवायूचा पुरवठा ही मत्स्यालयामधील माशांची पाण्यामधील साठवणुकीची मर्यादा ठरवत असते. पाण्यात विरघळलेला प्राणवायू दोन प्रमुख स्रोतांमधून येतो. हवा आणि हिरव्या वनस्पती प्लवंगापासून पाण्यात विरघळलेल्या प्राणवायू हा पाण्याचे तापमान, क्षारता आणि वातावरणीय दाब यावर अवलंबून असतो. पाण्यात कमी क्षारता, कमी तापमान आणि उच्च वातावरणीय दाब असल्यास प्राणवायू मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळतो. माशांचे प्रजनन, संगोपन आणि संवर्धनाकरिता प्राणवायूचे प्रमाण ४ ते ८ पीपीएम असावे. प्राणवायूचे पाण्यात प्रमाण वाढविण्याकरिता पाणी घुसळणे, पृष्ठभागावरील पाणी खेळवणे, पाण्यात हवेचे बुडबुडे सोडणे इत्यादी उपाय करावेत. पाण्यात उरलेले खाद्य, माशांची विष्ठा काढून तळ स्वच्छ ठेवावा. पाण्यात पाणवनस्पतींची योग्य प्रमाणात लागवड करावी. सतत टाकीमध्ये हवेचा पुरवठा केल्यास माशांना विरघळलेला प्राणवायू मिळतो, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होते. संपूर्ण टाकीमध्ये स्थिर तापमान राखले जाते. गोड्या पाण्यातील मत्स्यालयात सततचा हवेचा पुरवठा करण्यासाठी स्वस्त एअर पंपाचा वापर करतात. हा पंप बरेचदा मोठा आवाज करतो, त्याला मर्यादित विद्युतपुरवठा लागतो. तसेच बरेचदा ते निकामी होत असतात. एक किंवा दोन एअर पंप मत्स्यालयासाठी पुरेशे आहेत. त्यात वायब्रेटरी डायफ्राम असते. परंतु स्पेअरमध्ये एक पंप ठेवणे किंवा डायफ्राम ठेवणे गरजेचे आहे. हा पंप पाण्याच्या पातळीपेक्षा वर ठेवावा. तसेच नॉन रिटर्न व्हॉल्व्हसह एअरलाइन बसवावी, जेणेकरून बॅक सायफोनिंग होणार नाही. जेव्हा पंप बंद असेल किंवा तांत्रिक कारणाने पंप बंद पडेल त्या वेळी एअरेशन पंप प्लॅस्टिक नळ्याद्वारे एअरस्टोन सोबत जोडण्यात येतो. त्यातून हवेचे बारीक बुडबुडे तयार होतात. त्यामुळे हवेतील प्राणवायू मत्स्यालयामध्ये मिसळण्यास मदत होते. सूक्ष्म बारीक छिद्र असलेले एअर स्टोन शक्यतो मत्स्यालयात वापरावेत. जेणेकरून पाण्यात मुबलक प्रमाणात प्राणवायू मिसळण्यास मदत होईल. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण तपासण्यासाठी विंक्लर पद्धत किंवा डीओ मीटरचा वापर करावा.