provide clean and abundant amount of water to cattle's.
हवेतील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होते. त्याच्या शरीरावर परिणाम होतो.उन्हाळ्यात खनिजांची गरज वाढलेली असते, त्यासाठी उन्हाळ्यात खनिज मिश्रणाची मात्रा वाढवून द्यावी.
उन्हाळ्यातील तापमान आपल्या पशुधनाला आवश्यक असणाऱ्या तापमानापेक्षा खूप जास्त असते. जनावरांची तापमान सहन करण्याची पातळी ठरलेली असते. संकरीत व विदेशी रक्तगट असणाऱ्या गाईसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस, देशी गाईंसाठी ३३ अंश सेल्सिअस तर म्हशींसाठी ३६ अंश सेल्सिअस ही तापमानाची उच्च सहन पातळी आहे. वातावरणातील तापमान वाढू लागले की जनावरे या वाढत्या तापमानाला जुळवून घेण्यासाठी घाम व श्वासाची गती वाढवून थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक वेळ अशी येते की, जनावरे घाम व श्वासाची गतीद्वारे शरीर थंड ठेवू शकत नाहीत, त्यांच्या शरीराच्या तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. जनावरे उष्णतेच्या ताणाला (हिट स्ट्रेस) बळी पडतात. याचा जनावरांच्या आरोग्यावर, उत्पादनावर व प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. संकरीत व विदेशी रक्तगटाच्या गाई या देशी गाईपेक्षा उष्णतेच्या ताणाला जास्त बळी पडतात. आपल्याला जर अशा काळातही चांगले उत्पादन घ्यावयाचे असल्यास जनावरांच्या व्यवस्थापनात वातावरणानुसार आवश्यक बदल करणे गरजेचे असते.
वाढत्या तापमानामुळे जनावरांवर होणारे परिणाम
हवेतील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होते. त्यामुळे जी ऊर्जा उत्पादनास हवी असते ती शरीराचे तापमान संतुलित राखण्यास खर्च होते. परिणामी दूध उत्पादन कमी होते. उन्हाळ्यामध्ये दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन ५० टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते.चयापचय, रक्तप्रवाह, श्वसनाचा वेग, रक्त द्रवातील प्रथिने, प्रथिनासोबत संयोग होणारे आयोडीन व जीवनसत्व ‘अ’ च्या प्रमाणात घट होते. तसेच चेतासंस्था उत्तेजित होवून संप्रेरकाच्या उत्पादनामध्ये फेरबदल होतात. शरीरातील सर्व क्रिया मंदावतात. जनावरे सुस्त होतात.वाढत्या तापमानामध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी उर्जा खर्च झाल्यामुळे इतर शरीर क्रियांसाठी ऊर्जा कमी पडते. त्यामुळे अशा काळात प्रजनन चक्र अनियमित होवून सुप्त माजाच्या प्रमाणात वाढ होते. माजाची तीव्रता, कालावधी व गर्भधारणेचे प्रमाण कमी होवून दोन माजातील अंतर वाढते. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो. हंगामी वांझपणा येतो. जनावरांच्या लैंगिक क्षमतेत घट येते.शरीराचे तापमान वाढल्यामुळे जनावरांची भूक कमी होवून पाण्याची गरज वाढते. ती पूर्णपणे भागवली नाही तर शरीरातील पेशीमधील पाणी कमी होते. क्षारांचे शरीरातील प्रमाणही बदलते. त्यामुळे भूक मंदावते. जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होवून जनावरे इतर आजाराला बळी पडतात.लहान वासरांची वाढ खुंटते, तसेच कालवडीमध्ये प्रथम वेताचे वय वाढते. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना
व्यवस्थापनात व आहारात वातावरणानुसार बदल केल्यास जनावरांना होणारा उष्णतेचा ताण आपण कमी करू शकतो.
पाणी
उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या पाण्याची गरज वाढते. एका दुभत्या गाईला उन्हाळ्यात १०० लिटर पेक्षा जास्त पाण्याची गरज असते.वाढत्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी घामाचा वेग वाढलेला असतो, त्यासाठी पाण्याची गरज असते.उन्हाळ्यामध्ये जनावरांना ४ ते ५ वेळा पाणी पाजावे किंवा शक्य असल्यास २४ तास उपलब्ध करावे.उन्हाळ्यामध्ये जनावरांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यास उपलब्ध असावे. पाणी पिण्याची जागा सावलीत व जनावरांच्या जवळ असावी.गोठ्याची रचना ही उष्णतेचा ताण कमी करणारी असावी. गोठ्यातील तापमान १५ ते २५ अंश सेल्सिअस कसे ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे. गोठा व परिसर थंड राहील याची काळजी घ्यावी.जनावरांचे शेड पूर्व - पश्चिम लांबी असणारे असावे. अशा गोठ्यात जास्त काळ सावली राहते, गोठ्याचा पृष्ठभाग तापत नाही.चोहोबाजूने बंदिस्त गोठा उन्हाळ्यासाठी योग्य नसतो. गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. गरम हवेचा झोत जनावरांच्या अंगावर येवू नये म्हणून गोठ्याच्या रिकाम्या भागावर गोणपाटाचा पडदा बांधून तो पाण्याने ओला करत राहावे.गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी सावलीची भरपूर जागा उपलब्ध असावी (४० ते ५० वर्ग फूट). गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये. जनावरांना चारा खाण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करावी. उन्हाळ्यात गोठा थंड राहण्यासाठी गोठ्याची उंची कमीत कमी १० फूट तरी असावी.गोठ्याचे छत पत्र्याचे असतील तर त्याला बाहेरून पांढरा रंग लावावा.गोठ्याच्या छतावर गवत, पाचट किंवा उपलब्ध तत्सम सामुग्रीचे ६ इंच जाडीचे आच्छादन द्यावे त्यामुळे गोठा थंड राहण्यास मदत होते.जनावरांचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या परिसरात झाडे व हिरवळ असावी.गोठ्याच्या भिंती बाहेरून पांढऱ्या रंगाने रंगवून घ्याव्यात.जनावरांच्या आहारात भरपूर हिरव्या चाऱ्याचा समावेश असावा.जनावरांना चारा हा वातावरण थंड असताना (सकाळी, संध्याकाळी व रात्री) द्यावा. हिरवा चारा दुपारी द्यावा.जनावरे चरण्यास सोडत असाल तर सकाळी लवकर आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर सोडावे.जनावरांचा आहार उन्हाळ्यात कमी झालेला असतो. त्यामुळे कमी आहारातून जनावरांसाठी आवश्यक अन्नघटक कसे देता येतील यावर लक्ष द्यावे.उन्हाळ्यात शरीराची उर्जेची गरज मोठ्या प्रमाणात वाढते. यासाठी आहारामध्ये ऊर्जा देणारे पदार्थ (धान्य, गूळ, मळी, तेलयुक्त पेंड) तज्ञांच्या सल्ल्याने समाविष्ठ करावेत.उन्हाळ्यात खनिजांची गरज वाढलेली असते, त्यासाठी उन्हाळ्यात खनिज मिश्रणाची मात्रा वाढवून द्यावी. तसेच मीठ व खाण्याच्या सोड्याचा आहारात समावेश करावा. जनावरांना थंड ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
शेड बंदिस्त असेल तर गरम हवा बाहेर जाण्यासाठी जागा असावी. गोठ्यात मोठे पंखे बसविल्यास हवा खेळती राहील.गोठ्यातील वातावरण व जनावरे थंड राहण्यासाठी दर अर्ध्या तासाला २ ते ३ मिनिटे जनावरांच्या अंगावर पाण्याची फवारणी करावी. पाण्याची फवारणी स्वयंचलित यंत्रणा बसवून लहान फॉगर्स किंवा स्प्रिंकलर्सच्या सहाय्याने किंवा हाताने करावी. अशा गोठ्यात दमटपणा वाढू नये म्हणून पंखे चालू ठेवावेत.उष्णतेचा म्हशींना जास्त त्रास होतो (घामग्रंथी कमी असणे आणि काळी व जाड कातडी) त्यासाठी म्हशींना पाण्यात डुंबण्याची सोय करावी. २४ तास थंड पाणी मुबलक प्रमाणात पिण्यास उपलब्ध असावे संपर्क ः डॉ. शरद साळुंके, ९४०४९५७५१७
(कार्यक्रम सहाय्यक (पशुविज्ञान),मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर)