Animal Care Agrowon
ॲनिमल केअर

Animal Care : जनावरांतील सर्पदंशावरील प्राथमिक उपचार

सध्या पावसाळी वातावरणामुळे बेडकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्या सोबतच उंदीर, घूस अशा भक्ष्यांपाठी येणाऱ्या सापांचा वावरही शेत परिसरामध्ये अधिक दिसतो. दिसणारा प्रत्येक साप हा विषारी असतोच असे नाही.

डॉ.प्रविण पतंगे

सरिसृप प्राण्यांमध्ये साप आणि नाग हे उंदीर भक्षक असल्यामुळे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात. मात्र विषारी आणि बिनविषारी सापाविषयी नेमकी माहिती शेतकऱ्यांना नसल्यामुळे सर्व सापांविषयी त्यांच्या मनामध्ये मोठी भीती असते. सध्या पावसाळी वातावरणामुळे बेडकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्या सोबतच उंदीर, घूस अशा भक्ष्यांपाठी येणाऱ्या सापांचा वावरही शेत परिसरामध्ये अधिक दिसतो. दिसणारा प्रत्येक साप हा विषारी असतोच असे नाही.

वास्तविक जगभरात सापांच्या एकूण ३५०० प्रजाती आहेत. त्यापैकी ६०० प्रजाती या विषारी आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यातील केवळ ४ विषारी प्रजाती आढळतात.

विषारी सापांच्या महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजाती : नाग, मण्यार, घोणस, फुरसे.

त्यांचेही विषारीपणा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो, यानुसार दोन गट पडतात.

अ) Elapines- या गटातील सापांच्या विषाचा परिणाम माणसांच्या आणि जनावरांच्या मेंदू आणि चेता संस्थेवर होतो.

उदा. नाग (Cobra), मण्यार (Krait)

ब) Viperines - या गटातील सापांच्या विषांचा परिणाम माणसांच्या आणि जनावरांच्या हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेवर करतात.

उदा. फुरसे (Saw Scaled Viper), घोणस(Russell Viper)

पाळीव प्राण्यांमध्ये सर्पदंश हा प्रामुख्याने जनावरे चरताना पायांना, सडांना, कासेला, तोंडाला होण्याची शक्यता असते.

दंश झाल्यानंतर सापाने सोडलेले विष जनावरांच्या शरीरात जाते. त्यानंतर ते रक्तामध्ये मिसळते. त्याचे विषारी परिणाम दिसू लागतात. विषाचा परिणाम हा जनावरांचे आकारमान, दंश केलेली जागा (मेंदू आणि हृदयापासून किती अंतरावर आहे), त्या सर्पाने सोडलेली विषाची मात्रा अशा अनेक घटकांवर अवलंबून असतो.

सर्पदंश कसा ओळखाल?

-सापाच्या दातांच्या खुणा शरीरावर दिसतात का, ते पाहावे. दंशाची जागा काळी-निळी होते. त्या जागेतून रक्त आणि पिवळसर रंगाचा चिकट स्राव येतो.

-दंश झालेले जनावर बेचैन होते.

-सतत ओरडते, नाका-तोंडाद्वारे फेस गळू लागतो.

- जनावर लंगडते.

-त्याची भूक मंदावते.

- वेळीच उपचार न झाल्यास जनावर दगावते.

सर्पदंशाची लक्षणे :-

अ) नाग व मण्यार चावल्यास दिसणारी लक्षणे:-

- प्रामुख्याने मेंदू व चेता संस्थेवर परिणाम होतो.

- दंशाची जागा सुजून वेदनादायक बनते.

- स्नायू कमजोर होऊन जनावर उभे राहू शकत नाही.

- चारा खाण्यास त्रास होतो किंवा खाल्लेला चारा तोंडातच राहतो.

- पोटातील वेदनेमुळे जनावर विव्हळते.

- बुब्बुळांचा आकार वाढतो.

- अंग थरथरते व जनावर जास्त प्रमाणात लाळ गाळते.

- श्‍वसन संस्थेच्या अर्धांगवायूमुळे जनावर दगावते.

ब) घोणस व फुरसे चावल्यास दिसणारी लक्षणे :-

- प्रामुख्याने हृदय व रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.

- दंशाची जागा चिघळून वेदनादायक बनते.

- दंशाची जागा काळी निळी पडते.

- जखमेतून रक्तासारखा चिकट द्रव पडू लागतो.

- कातडी थंड पडून जनावर प्रतिसाद देत नाही.

- अतिसार, उलट्या, फुफ्फुसाचा दाह होतो.

- रक्ताभिसरण बंद पडून जनावर दगावते.

- जनावर वाचल्यास दंशाची जखम चिघळून जंतू संसर्ग होऊन धनुर्वात होण्याची शक्यता असते.

प्राथमिक उपचार :

१) सर्पदंश झाल्यास उपचारासाठी तत्काळ पशुवैद्यकास बोलवावे.

२) ज्या सापाने दंश केला आहे, तो विषारी की बिनविषारी याची माहिती मिळवावी. सापाच्या तोंडाच्या रचनेवरून ते समजणे व उपचार करणे सोपे जाते.

३) जनावरास शांत व स्वच्छ ठिकाणी बांधावे.

४) दंशाची जागा स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशकाने धुवावी.

५) दंशाच्या जागेची हालचाल कमी करावी. त्यामुळे विष शरीरात पसरण्याची गती कमी राहते.

६) विषाचा शरीरातील प्रसार कमी करण्यासाठी जखमेच्या वर काही अंतरावर दोरी किंवा कापड बांधावे. हे बांधलेले कापड १० मिनिटाच्या अंतराने काही सेकंदासाठी सैल करावे. पुन्हा बांधावे.

या गोष्टी टाळाव्यात :-

१) दंशाची जागा चाकू किंवा धारदार शस्त्राने पसरवू नये, त्यामुळे जंतुसंसर्ग आणि धनुर्वात होण्याची शक्यता असते.

२) जखमेवर दारू किंवा तंबाखू लावू नये. अशा घटकांमुळे धमन्यांची तोंडे मोठी होतात आणि विष अधिकच भिनत जाते.

सर्पदंश कसा टाळावा :-

१) गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा.

२) गोठ्याभोवती अडगळ साचू देऊ नये.

३) धान्याचे कोठार आणि गोठा यामध्ये अंतर असावे.

४) गोठा परिसरातील उंदीर, घूस यांचे प्रमाण विषारी आमिष, सापळे यांच्या साह्याने कमीत कमी राहील, याची काळजी घ्यावी.

-डॉ. प्रवीण पतंगे, ९८९०७४९४२९

(पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१, ताकविकी, ता. जि. उस्मानाबाद)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी

Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची

Farmer Support: अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

SCROLL FOR NEXT