Buffalo Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Buffalo Breeding : हिवाळा हा म्हशींच्या प्रजननासाठी सर्वांत अनुकूल ऋतू मानला जातो. राज्यातील हवामान, हिवाळ्यातील सौम्य तापमान आणि उष्णतेचा अभाव हे घटक प्रजननासाठी पोषक ठरतात.

Team Agrowon

डॉ. सुहास अमृतकर, डॉ. चैतन्य पावशे

हिवाळा हा म्हशींच्या प्रजननासाठी सर्वांत अनुकूल ऋतू मानला जातो. राज्यातील हवामान, हिवाळ्यातील सौम्य तापमान आणि उष्णतेचा अभाव हे घटक प्रजननासाठी पोषक ठरतात. पशुपालकांनी या ऋतूचा योग्य फायदा घेण्यासाठी ठराविक योजना आखून काम करणे आवश्यक आहे.

सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे हिवाळा म्हशींच्या आरोग्य व प्रजननास हितावह ठरतो. हिवाळ्याच्या ३ ते ४ महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक म्हशीचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूक असावे.

हिवाळ्यात प्रजनन क्रिया योग्य प्रकारे घडल्यास पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासारख्या कडक व प्रतिकूल ऋतूचा म्हशींना विशेष अपाय होत नाही. हिवाळ्यात म्हशी माजावर येऊन गाभण ठरण्याकडे लक्ष दिल्यास म्हशींकडून दूध व वेत मिळण्याची निश्चिती करता येते.

हिवाळ्यात गाभण म्हशींची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. याउलट हिवाळ्यात प्रजनन बंद असलेल्या म्हशी पुढे उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या अभावामुळे अशक्त होतात. त्यामुळे त्यांना पुढे पावसाळा संपेपर्यंत शरीर, आरोग्य राखणे शक्य होत नाही. हिवाळा संपला, तर पुढे वर्षभर म्हैस भाकड राहू शकते.

हिवाळ्यातील पोषक हवामानाचे महत्त्व

  • हिवाळ्यातील कमी उष्णता आणि सौम्य थंड हवामानामुळे म्हशींच्या शरीरातील उष्णता नियमन सुरळीत होते. हे प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण करते.

  • हिवाळ्यात उष्णतेमुळे होणारा तणाव टाळला जातो. त्यामुळे म्हशींच्या प्रजनन क्षमतेत वाढ होते.

  • हिवाळ्यातील भरपूर चारा व पोषणमूल्ये युक्त आहारामुळे जनावरांची आरोग्यस्थिती सुधारते.

  • प्रजननानंतर गाभण म्हशींच्या शरीरात हार्मोन्सची वाढ होते. त्यामुळे अधिक दूध उत्पादन शक्य होते.

हिवाळ्यात प्रजनन यशस्वी करण्याचे उपाय

  • योग्य आहार व्यवस्थापन

  • चारा व पौष्टिक आहाराचा पुरवठा नियमित करावा.

  • हिवाळ्यात ऊर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहार द्यावा.

  • म्हशींच्या आहारात खनिज मिश्रणाचा समावेश करणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि प्रजनन क्षमतेसाठी अत्यावश्यक आहे. हिवाळ्यात याचा योग्य वापर केल्यास म्हशींच्या प्रजननावर सकारात्मक परिणाम होतो.

  • जनावरांना सुलभ प्रजननासाठी चांगले आरोग्य व सुदृढ प्रकृतिमानाची गरज असते. पोषक वातावरण, तसेच हिरवा व वाळलेला चारा मिळत असल्यामुळे म्हशी हिवाळ्यात धष्ट-पुष्ट होतात. खरीप पिकांचा चारा, हिरवे गवत, संतुलित आहार यामुळे म्हशीचे शारीरिक वजन वाढते.

आरोग्य तपासणी व काळजी

  • म्हशींची नियमितपणे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

  • औषधांचा वापर करून म्हशींच्या शरीरावर बाह्य आणि अंतर्गत परजीवींपासून संरक्षण करावे.

  • हिवाळ्यातील थंडीचा म्हशींना अपाय होत नाही. थंडीमुळे आरोग्यास अपाय होत नसला, तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हशी रात्री व पहाटे गोठ्यात ठेवाव्यात.

  • चांगल्या प्रकृतिमानामुळेच म्हशींच्या प्रजननाची क्रिया हिवाळ्यात सुरू राहते. हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक म्हशीचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूकता ठेवावी.

माज निरीक्षण

  • म्हैस माजावर येणे ही प्रजननाची पहिली पायरी असल्यामुळे आपल्या म्हशी माजावर येतात का याकडे लक्ष द्यावे.

  • हिवाळ्यात म्हशींच्या माज चक्राची व्यवस्थित नोंद ठेवा.

  • म्हशींचा माज ओळखण्यासाठी सकाळी म्हशी गोठ्यात उभी राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेल्या म्हशी बसल्यानंतर बळस, सोट टाकतात काय याचे दैनंदिन प्रत्येक म्हशीचे निरीक्षण करावे. माजावर आलेली म्हैस लक्षात आल्यास त्यांना योग्य वेळी कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक पद्धतीने प्रजनन करून घेणे महत्त्वाचे आहे.

पाणी व निवाऱ्याची सोय

  • हिवाळ्यात पुरेसे स्वच्छ उपलब्ध करून द्यावे. म्हशींना उबदार निवारा पुरवावा. विशेषतः रात्रीच्या वेळी थंडीपासून संरक्षण करावे.

  • धानाचे तनीस, गव्हाच्या भुसा, गवत, किंवा चटई (मॅट) आच्छादन म्हणून वापरावे.

  • निवाऱ्यात योग्य खेळती हवा ठेवावी. मात्र थंड वारे थेट जनावरांच्या शरिरावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

हिवाळ्यात म्हशींच्या प्रजननासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यातील अनुकूल हवामान, पोषणमूल्ययुक्त आहार आणि व्यवस्थित देखभाल यामुळे प्रजनन दर वाढतो. योग्य नियोजन आणि काळजी यामुळे म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा खऱ्या अर्थाने ‘सुवर्णकाळ’ ठरतो.

त्यामुळे येणाऱ्या वेतात दूध उत्पादनाची नियमितता येऊन आर्थिक फायदा होतो. हिवाळ्यात प्रजनन यशस्वी झाल्यास वासरांचे आरोग्य सुधारते. त्याचा दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय, वासरांची विक्री व चांगल्या दर्जाच्या दूध उत्पादनामुळे आर्थिक फायदा होतो.

- डॉ. सुहास अमृतकर, ७७५६८४५६११

(पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT