Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : गोशाळांसाठी तंत्रज्ञान, गुणवत्ता महत्त्वाची...

टीम ॲग्रोवन

डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. बाबासाहेब नरळदकर

पूर्वार्ध

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञांनी राज्याच्या विविध भागांतील गोशाळांचे सर्वेक्षण (Goshala Survey) पूर्ण करून त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध धोरणात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यांचा अवलंब केल्यास या गोशाळा जातिवंत पैदाशीसाठी (Cow Breeding) ओळखल्या जातील. त्याचबरोबरीने त्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे.

गोशाळातील गोवंश संख्या माफक आणि क्षमतेएवढी असावी. अधिक संख्येचा गोवंश सांभाळून उपलब्ध साधनांवर भार निर्माण करू नये.

गोशाळांची नोंदणी अपेक्षित आहे. नोंदणीकृत गोशाळा अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत असल्याचे दिसून आले. देवस्थान आणि खासगी संघांच्या गोशाळेत मोठ्या सुधारणा करण्याची सुधारणा करण्याची गरज आहे.

गोशाळेतील मोठा गोवंश वय, लिंग, जात, आरोग्य, प्रजनन अवस्था आणि दूध यांसारख्या घटकावर वर्गीकृत करणे अनिवार्य असते. यातून सुयोग्य व्यवस्थापन आणि गो सांभाळ ताणरहित करता येतो.

गोशाळेत छताखाली गाईंना पुरेशी जागा असावी. छताबाहेर मोकळी दुप्पट जागा हालचाल, व्यायाम करण्यास उपयोगी ठरते. गोठ्यात तापमान आर्द्रता निर्देशांक आणि वायुविजन योग्य असल्यास ताणरहित गोपालन शक्य असते.

गोठ्यातील वातावरण सुलभ करण्यासाठी वायुविजन यंत्र, छताच्या पत्रांसाठी थोडी पोकळी, उंच छत, उष्ण हवा बाहेर पडण्यासाठी उपाय यांचा अवलंब करू शकतात. गोठ्यातील हवा बाहेर फेकणारे पंखे, १८ फुटांपेक्षा उंच छत आणि गोठ्याबाहेर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण फायदेशीर ठरते.

गोशाळेत स्वच्छ, कोरडे, निर्जंतुक वातावरण राखणे, गोठ्याबाहेर पायधुणी, जैवसुरक्षा बाबी निर्माण करून गाईंचे आरोग्य अबाधित ठेवता येते. बाह्य परजीवी आणि डास गोमाशा यांचा प्रतिबंध नेहमी अपेक्षित असतो.

प्रत्येक गोशाळा पाण्याच्या उपलब्धतेसाठी स्वयंनिर्भर असावी. म्हणजे वर्षभर भरपूर स्वच्छ पाणी गाईंना पुरवता येईल. दररोज थंड, स्वच्छ, मृदू, ताजे आणि निर्भेळ पाणी स्वच्छ पाण्याच्या भांड्यातून किंवा टाकीतून पुरवता येणे शक्य होते.

दर तिमाही नियोजनातून चारा पुरवठा शाश्‍वत करता येतो. यासाठी चारा सुरक्षा अभियान म्हणजे चारा लागवड, उत्पादन, साठवणूक करणे गोशाळेचे मुख्य कार्य असते.

गोआहार पूर्ततेसाठी गोवंशास पशुखाद्याची नितांत गरज असते. गरजे एवढा खुराक आणि क्षार पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. गोठ्यात क्षार विटा पुरविणे योग्य ठरते.

गोशाळेसाठी नेहमी प्रतिपूर्ती करणारा चारा इतर बाबीतून पुरवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. फळांच्या साली, भाज्या, हिरव्या वनस्पती, टरफले, साळी आणि अनेक धान्य बाबी पशू आहारात उपयोगी पडतात. ॲझोला निर्मिती, हायड्रोपोनिक्स चारा, कोरड्या चाऱ्यावर युरिया, मळी प्रक्रिया करावी.

मुरघास उपलब्धता गोशाळांसाठी आवश्यक असते. यातून चारा साठा सुरक्षित करता येतो. खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करून चारा साठवता येतो.

वाढीच्या वासरांची काळजी, वजन वाढीवर नियंत्रण, नियमित जंतनाशक, प्रतिबंधात्मक लसीकरण, नर वासरांचे खच्चीकरण आणि लैंगिक रोग निदान तपासण्या या बाबी गोशाळांसाठी अपेक्षित आहेत.

उपलब्ध असणाऱ्या वनस्पतिजन्य वापरातून गोवंश उपचार, बाह्य-अंतर कृमी/ परजीवींचा प्रतिबंध असे सोपे, सहज आणि अल्प खर्चिक उपाय गोशाळांनी अवलंबावेत.

गोशाळेतील किमान २५ टक्के गाई प्रजननक्षम, दुधाळ, उत्पादक असाव्यात. त्यासाठी माज निदान, माज संकलन, प्रसूती नियंत्रण असे तंत्र अवलंबावे.

गोशाळांनी पैदाशीचा नंदी म्हणून केवळ एकच वळू सर्व गाई भरवण्यासाठी वापरू नये. त्यातून निर्माण होणारी वंशरहित प्रजा निर्मिती थांबवावी. शुद्ध पैदास आणि वंशनिहाय वळू वापर अपेक्षित आहे.

राज्य शासनाच्या विविध योजना गोशाळांनी आग्रहपूर्वक स्वीकारणे अपेक्षित असते. यामध्ये इनाफ ओळख क्रमांक, पैदास धोरण, पैदासकार संघटना, गोवंश संवर्धन कार्यक्रम, अनुवंश सुधारणा इत्यादींचा समावेश असतो.

सांभाळलेल्या गोवंशाच्या प्रकृती व आरोग्य नियंत्रणासाठी गोशाळाकडून शासनाच्या पशुसंवर्धन यंत्रणेस वेळोवेळी निमंत्रित करणे अपेक्षित आहे. यातून नियमित रोग चाचण्या आणि आरोग्य संवर्धन उपाय मिळवता येतात.

गोवंश सांभाळताना मनुष्यबळ आणि मजुरीचा व्यर्थ खर्च टाळण्यासाठी यांत्रिकीकरण करता येणे शक्य आहे. गोशाळेत कडबाकुट्टी यंत्र, वाहून नेणाऱ्या ट्रॉली, वाहतूक गाड्या, गोबर गॅस संयंत्र, दूध दोहन यंत्र अशा बाबी फायदेशीर ठरतात.

नियमित नोंदवह्या आणि माहितीच्या आधारे तांत्रिक पडताळणी केल्यास गोशाळांची प्रगती मांडता येते. अभिप्राय नोंदीतून अनेक अभिनव बाबी सुचविल्या जातात. त्यांचा वापर शक्य झाल्यास गोशाळा समृद्ध होतात.

निरोगी गोवंशाच्या उत्पादनातून अनेक विक्री योग्य बाबी उपलब्ध करता येणे दूध, शेण, मूत्र, चीक, वार यातून शक्य असते. आर्थिक फायदा देणाऱ्या गोउत्पादनांची निर्मिती महिला बचत गटाकडून सुलभ होते.

गोशाळांकडून नैसर्गिक शेती, गोवंश आधारित शेती, शाश्‍वत शेती, सेंद्रिय शेती सहायक ठरते. यासाठी सेंद्रिय खते, जैव उपचार, जैविक कीटक नियंत्रक यांचा वापर पूरक ठरतो.

लोकसहभाग महत्त्वाचा...

अपेक्षित संख्येपेक्षा अधिक गोवंश शेतकरी, उद्योजक यांना वितरित करणे गोशाळेकडून अपेक्षित असते. गो शाळेतील नर गोवंश हंगामा पुरता शेती वापरासाठी शेतकऱ्यांना देता येतो. नर गोवंश विद्युत निर्मिती, वाहतूक अशा कामासाठी वापरता येतो.

समाजातील लोकांची गोशाळेची जोडणी अपेक्षित असून गो पर्यटन, गो प्रशिक्षण अशा उपक्रमातून अनेक जण गो शाळेशी जोडता येतात. ग्रंथालय, गो उत्पादन विक्री केंद्र, गो सभागृह, गो कीर्तन, गो प्रवचन असे उपक्रम राबविणे शक्य असते.

गोशाळांनी आपल्या सांभाळलेल्या गोवंशाची काळजी अधिक सक्षमपणे करून गो संवर्धन यशस्वी करताना अधिकचा गोवंश पदरात घेऊन अधिकचा ताण निर्माण करू नये. गो शाळेतील जास्तीत जास्त गोवंश संख्या याबाबत स्वतःची नियमावली काटेकोरपणे राबविणे गरजेचे असते.

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी गोशाळा नेहमी तयार असाव्यात. यामध्ये निवारा, चारा सुरक्षितता आणि आरोग्य प्रदान करणारी केंद्रे म्हणून गोशाळा उपयोगी ठरू शकतात. दुष्काळ, महापूर, चाराटंचाई, रोगप्रसार, भूकंप, आगी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इतर पशुधन सांभाळता येणे शक्य होऊ शकेल.

राज्य शासनाच्या सूचना आणि शिफारसी गोशाळांकडून स्वीकृत आणि वापर होणे अपेक्षित आहे. यातून शास्त्रीय पैदास घडून गो संवर्धन आणि गो उत्पादकता वाढीचा कार्यक्रम राबवतात येऊ शकेल.

- डॉ. नितीन मार्कंडेय,

९४२२६५७२५१ (पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT