Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : वाढत्या उन्हाळ्यात जनावरांना जपा

Animal Feed : उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई, उष्णतेचा त्रास आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्न तयार होत आहेत. अशा परिस्थितीत जनावरांना आजार होण्याची शक्यता असते.

Team Agrowon

टी.डी.साबळे, डॉ.डी.आर.तांबे

Animal Management : वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. कोरडा चारा खात नाहीत. जनावरांच्या हालचाली मंदावतात. जनावरे सावलीकडे धाव घेऊन सावलीत स्थिरावतात. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, अशी लक्षणे दिसू लागतात.

रक्तस्राव

अति उष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होत असतो. नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते.

उपाय

जनावरांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे. भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. हिरवा चारा द्यावा. जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत.

रक्तस्राव थांबत नसेल, तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारातून जीवनसत्त्व क किंवा औषधाच्या माध्यमातून द्यावे.

विषबाधा

हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खातात. यामुळे विषारी वनस्पती घाणेरी, गुंज, धोतरा खाण्यात येऊन विषबाधा होते.

जनावरे गुंगल्यासारखी करतात, खात नाहीत, खाली बसतात, उठत नाहीत. पाय सोडून ताबडतोब मरतात.

विषबाधेची लक्षणे दिसताच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावेत.

उष्माघात

आजार अतिप्रखर सूर्य किरणे, पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो.

शरीराची कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भूक मंदावते, दूध देणे कमी होते.

उपाय

जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे. ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे. त्यावर वारंवार पाणी मारावे.

जनावरांना झाडाखाली, गोठ्यात बांधावे. भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी, चारा द्यावा.

कडव्या

अति प्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला आजार होतो.

ज्या जनावरांच्या चामडीचा रंग पांढरा असतो, त्यांना हा आजार होतो. कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो.

चाऱ्याच्या अभावामुळे भुकेपोटी जनावर गाजर गवत खाते. असे जनावर सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिल्यास हा आजार होतो. या गवतातील विषारी घटक आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसतो.

उपाय

जनावरांना सावलीत बांधावे. भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे.

उपचारासाठी पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे.

कॅल्शिअम कमतरता

हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांना उसाचे वाढे दिले जाते. जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढ्यामधील ऑक्झेलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम एकत्र होऊन लघवीवाटे निघून जाते, त्यामुळे कॅल्शिअमची पातळी कमी होते.

जनावरांना मिल्क फिव्हर आजार होतो. जनावरे थकून खाली बसतात. शरीराचे तापमान कमी होते, रवंथ बंद होते, जनावरे खात नाहीत, दूध देणे कमी होते, शरीर थंड पडते, जनावरे मान टाकून बसतात.

उपाय

तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

जनावरांचे व्यवस्थापन

शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे.

दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे. त्यावर वारंवार पाणी मारावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल.

शक्य असल्यास गोठ्यामध्ये स्प्रिंकलर किंवा फॉगरचा वापर करावा.

गोठ्याचे छप्पर गवत, भाताचा पेंढा, नारळाच्या झावळ्यांनी झाकून घ्यावे. उन्हाच्यावेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी.

वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजविलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. काही काळानंतर त्यावर हलके पाणी शिंपडावे.

जनावरांना सकाळी किंवा सायंकाळी चरावयास न्यावे. दुपारच्या वेळी जनावरांना चरावयाला नेणे टाळावे. शक्य तिथे सावलीत जनावरे बांधावीत.

जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी न देता, विभागणी करून तीन ते चार वेळा द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चाऱ्याचे मिश्रण करावे.

वाळलेले गवत, कडब्यावर मीठ किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.

चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, ऊस वाढ्याचा गरजेनुसार वापर करावा.

अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे पशुतज्ज्ञांकडून लाळ्या-खुरकूत, घटसर्प, फऱ्या नियंत्रणासाठी लस टोचावी.

पशूतज्ज्ञांच्या सल्याने जंतुनाशक पाजावे.

उन्हाळ्यात गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जन्माला येणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याची गर्भाशयातील पोषणावर अवलंबून असते. संकरित आणि विदेशी जनावरांवर उष्णतेचा जास्त परिणाम दिसून येतो. शक्य तिथे सावलीत जनावरे बांधावीत.

टी.डी.साबळे, ९९२१४९३७६४ (सहाय्यक प्राध्यापक,पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय,लोणी,जि.नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT