Animal Care Management :
शेतकरी नियोजन
पशुपालन
शेतकरी : कुलदीप भिवाजी सोनार
गाव : कात्रड, ता. राहुरी, जि. नगर
शेती : चार एकर
एकूण गाई : १२ गाई, सहा मोठ्या कालवडी.
राहुरी तालुक्यातील कात्रड येथील कुलदीप भिवाजी पवार यांनी बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले. एका गाईपासून पशुपालनास सुरुवात केली. त्यानंतर दहा लहान कालवडी विकत घेत व्यवसायात वाढ केली. सध्या त्यांच्याकडे १२ गाई आणि ६ कालवडी आहेत. मागील काही दिवसांपूर्वी गाईंसाठी मुक्तसंचार गोठा उभारला आहे. सध्या प्रतिदिन १०० ते ११० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते.
कुलदीप यांच्याकडे वडिलोपार्जीत चार एकर शेती असून, त्यात चारा पिकांची लागवड आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरला आहे. त्यातून कुटुंबाच्या प्रगतीला मोठा आधार मिळाला आहे. दुग्ध व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यांची कुलदीप यांना मदत मिळते. तसेच पशुपालनामध्ये सुयोग बेहळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, असे कुलदीप सांगतात.
नवजात वासरांची काळजी
नवजात वासरांना थेट गाईला दूध पिऊ दिले जात नाही. त्याऐवजी तीन महिन्यांपर्यंत वासरांना बाटलीने दूध पाजले जाते. सुरुवातीच्या काळात दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दीड लिटर असे महिनाभर दूध पाजले जाते. त्यानंतर २ महिन्यांपर्यंत सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन लिटर दूध पाजले जाते. त्यानंतर २ ते ३ महिन्यांनी एक लिटर दूध व गरजेनुसार खाद्य देण्यास सुरुवात केली जाते. दूध पाजणे अचानक बंद केले जात नाही. त्याऐवजी हळूहळू कमी करून खाद्य खाण्याची सवय लावली जाते. त्यामुळे वासरांच्या निकोप वाढीस चालना मिळते.
आरोग्य, खाद्य व्यवस्थापन
लम्पी, लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी दर सहा महिन्यांनी लसीकरण केले जाते.
गाई व कालवडींना चार महिन्यांतून एकदा जंताच्या गोळ्या दिल्या जातात.
गोचीड निर्मूलनासाठी दर तीन महिन्यांनी लसीकरण केले जाते.
चाराटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी घरच्या शेतामध्ये मका लागवड केली जाते. त्यापासून ५० ते ६० टन मुरघास तयार केला जातो. त्यासाठी मक्याच्या सुधारित वाणांची पेरणी केली जाते. मुरघासामुळे चारा टंचाईच्या काळात दर्जेदार चारा गाईंना उपलब्ध होतो. त्यामुळे चाराटंचाईवर मात करणे शक्य होते. असे कुलदीप सांगतात.
शेणखताची विक्री
मुक्तसंचार गोठ्यातील शेणाची दररोज उचल केली जाते. दरवर्षी पशुपालनातून २२ ते २५ ट्राॅली शेणखत उपलब्ध होते. त्यातील पंधरा ट्रॉली शेणखत स्वतःच्या शेतामध्ये वापरले जाते. तर उर्वरित शेणखताची पाच हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री केली जाते. मुक्त गोठ्यातील शेणखताचा दर्जा चांगला असल्याने शेतकऱ्यांकडूनही फळबागांमध्ये वापर करण्यासाठी शेणखताला विशेष मागणी असते. घरच्या शेतीमध्ये शेणखताचा वापर वाढविल्यामुळे दर्जेदार चारा पिकांचे उत्पादन मिळत असल्याचे, कुलदीप सोनार यांनी सांगितले.
व्यवस्थापनातील बाबी
गोसंगोपनासाठी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. त्यामुळे गाईंचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.
दैनंदिन कामांना दररोज सकाळी पाच वाजता सुरुवात होते. प्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला बांधल्या जातात. दूध काढणी मशिनच्या मदतीने दूध काढणी केली जाते. त्यानंतर चारा व खुराक दिला जातो.
गाईंना सकाळच्या वेळी गिन्नी गवत, ऊस, मका आणि मुरघास याप्रमाणे चारा दिला जातो. त्यासाठी रात्रीच कुट्टी करून ठेवली जाते.
मुक्तसंचार गोठ्यात गाईंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
दुभत्या गाईंना दुध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी मिळून साधारणपणे साडेतीन ते चार किलोपर्यंत पशुखाद्य दिले जाते. त्यात प्रामुख्याने गोळीपेंड, सरकी पेंडीचा समावेश असतो. त्यासोबत कॅल्शिअम आणि प्रथिनयुक्त खाद्य तसेच खनिज मिश्रण दिले जाते. दूध उत्पादन वाढीसह शारीरिक वाढीसाठी खनिज मिश्रणे फायदेशीर ठरतात.
दररोज संध्याकाळी चार वाजता पुन्हा दूध काढणी करून चारा दिला जातो. सकाळप्रमाणेच सायंकाळी देखील चारा व खुराक दिला जातो.
कुलदीप सोनार ७७७५०२७७७४
(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.