Animal Fertility Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Fertility : जनावरांच्या प्रजनन क्षमतेसाठी खनिजे महत्त्वाची

Animal Care : यशस्वी दूध व्यवसायात जनावरांची उत्पादन आणि प्रजनन क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी जनावरांना योग्य प्रमाणात खनिजांचा पुरवठा महत्त्वाचा आहे. शरीरक्रियेत वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी खनिज पदार्थांची गरज असते.

Team Agrowon

डॉ. व्ही. एम. सरदार, डॉ. व्ही. आर. पाटोदकर, डॉ. एस. एम. भालेराव

Animal Health : खनिज पदार्थ आणि जनावरांची प्रजनन क्षमता यांचा फार जवळचा संबंध आहे. योग्य प्रमाणात खनिज पदार्थ जनावरांना खाद्यातून पुरविल्यास जनावरांच्या प्रजनन क्षमतेसोबत उत्पादन क्षमता वाढते. मात्र भरपूर प्रमाणात खनिज पदार्थ दिल्यास वजन वाढणे, वयात येण्याचा कालावधी वाढणे, बीज फलनाचा दर कमी होणे, गाभण राहण्याचा दर कमी होणे असे अनेक विपरीत परिणाम जनावरांमध्ये दिसून येतात.

खनिज पदार्थाचे वर्गीकरण

दीर्घ खनिज पदार्थ : कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, क्लोराइड, आणि मॅग्नेशियम.

ट्रेस खनिज पदार्थ : कॉपर, कोबाल्ट, सेलेनियम, मॅंगेनीज, आयोडीन, झिंक, लोह, मोलिब्डेनम, क्रोमियम. ट्रेस खनिज पदार्थ नैसर्गिकरीत्या वातावरणात आढळतात. त्यांची फार कमी प्रमाणात आवश्यकता असते. यांचा नेहमीच्या आहारात असणे अनिवार्य असते. प्रजनन संस्थेचा विकास, प्रजनन संस्थेच्या संप्रेरकाच्या संयुगासाठी आणि बीजांड, ऋतुचक्राच्या क्रियेसाठी या घटकांची नितांत गरज असते. यांच्या कमतरतेमुळे थायरॉइड आणि स्टेरॉइड संप्रेरकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. मात्र अशा खनिज पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन झाल्यास विपरीत परिणाम देखील दिसून येतो.

दीर्घ खनिज पदार्थ

कॅल्शिअम

हा खनिज पदार्थापासून शरीरातील सर्व हाडे बनलेली असतात.

प्रसूतीदरम्यान गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसारणासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी झाल्यास प्रसूतीस बाधा निर्माण होते, गर्भपिशवी, अंग बाहेर येते. गर्भपिशवीचे पुनर्स्थापनेत उशीर होतो.

कमतरतेमुळे तोंडातील स्नायू आकुंचन पावल्याने खाणे कमी होऊन रवंथ प्रक्रिया कमी होते. जनावरांची शारीरिक ऊर्जा मंदावल्याने स्निग्ध पदार्थांची साठवण होऊन फॅटी लिव्हर सिंड्रोम आणि केटोसिस आजार होतो.

प्रमाण जास्त झाल्यास गाभण राहण्याचा दर कमी होतो. जनावरांमध्ये दररोज ०.७५ ते ०.८५ टक्का कॅल्शिअमची गरज असते.

फॉस्फरस

हाडांमधील महत्त्वाचे खनिज आहे.

कमतरतेमुळे भूक मंदावते, वाढ खुंटते, दूध उत्पादन घटते. प्रजोत्पादन क्षमता कमी होऊन बीजांडे फलण्याची प्रक्रिया कमी होते.

माजावर येण्याचा दर आणि गाभण राहण्याचा दर वाढविण्यास फॉस्फरसचा प्रमाणशीर पुरवठा आवश्यक आहे.

जनावरांना दररोज किमान ०.४५ ते ०.५० टक्का फॉस्फरसची गरज असते.

पोटॅशिअम

प्रमाण जास्त झाल्यास माजावर येण्याचा काळ वाढतो, बीज फलण्याचा दर मंदावतो, वंध्यत्व येते.

मीठ

मिठामध्ये सोडिअम आणि क्लोराइडचा समावेश असतो. सोडिअम हे शरीरातील द्रव्यभिसरण प्रक्रियेत संतुलन ठेवण्यासाठी शर्करा आणि अमिनो आम्लाचे पेशीनिहाय ग्रहण करण्यासाठी उपयोगी.

कमतरतेमुळे पचनसंस्थेत बिघाड निर्माण होतो. याचा नकळत परिणाम प्रजोत्पादनातील प्रजनन संस्थेवर होतो. जनावरांना दररोज एक टक्के मिठाची गरज असते.

मॅग्नेशिअम

हाडे मजबुतीसाठी, शरीरात निर्माण होणाऱ्या विविध द्रव्यांसाठी आणि मेंदूतील चेतापेशी चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी फायदेशीर.

सुरुवातीच्या दूध देण्याचा काळात अत्यंत आवश्‍यक असते. कारण यामुळे दूध उत्पादन वाढते.

मॅग्नेशिअम कमतरता झाल्यास प्रजनन संस्थेत बाधा निर्माण होते.

ट्रेस खनिज पदार्थ

कॉपर

लोहाच्या शोषणासाठी आवश्‍यक. यामुळे हिमोग्लोबिनचे उत्पादन होते.

पातळी कमी झाल्यास सुरुवातीच्या काळातील गर्भपात होतो. गर्भपिशवी आकुंचन पावते.

कमतरतेमुळे माजावर येण्याचा काळ लांबतो, बीजांडाची कार्यक्षमता कमी होणे, नपुंसकता येते. कॉपर आणि झिंक यांच्या एकत्रित समावेशाने सुपर ऑक्सिडडीसमोटेस यांच्या मदतीने लुटीअल पेशी प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाची निर्मिती करतात.

दुधाळ जनावरांमध्ये कॉपरचे प्रमाण १० पीपीएम असावे.

कोबाल्ट

जीवनसत्त्व बी-१२ च्या उत्पादनासाठी गरजेचे. जीवनसत्त्व बी- १२ चे प्रमाण हे दूध आणि कोलेस्ट्रॉलमध्ये अधिक असते.

कमतरतेमुळे गाभण राहण्याचा दर कमी होतो, गर्भाची वाढ कमी होते. नवजात वासराचा मृत्यू होतो.

दुधाळ जनावरांना कोबाल्टची गरज ०.११ पीपीएम एवढी असते.

सेलेनियम

गाभण जनावरांमध्ये किरकोळ कमतरतेमुळे गर्भपात होऊ शकतो, कमजोर वासरू जन्मास येऊन उभे राहण्यास असमर्थ ठरते.

सेलेनियमच्या पुरवठ्याने कासदाह, गर्भपिशवीचा दाह आणि बीजांडावर येणारी सूज याचे प्रमाण कमी होते.

वयात येणाऱ्या कालवडींना सेलीनियमचा प्रमाणात पुरवठा केल्यास गाभण राहण्याचा दर वाढतो.

जनावरांमध्ये प्रसूतीच्या आधी सेलेनियमचे इंजेक्शन दिल्याने गर्भपिशवी धरून ठेवण्याचा दर कमी होतो.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या खाद्यात ०.१ पीपीएम सेलेनियम असावे.

मॅंगेनीज

अन्नाचे पोषक द्रव्यात रूपांतर करण्यासाठी मँगेनीजची गरज असते (कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि नुक्लिक आम्ल).

स्टेरॉइड संप्रेरकाच्या (इस्ट्रोजन प्रोजेक्ट, टेस्टिस्टेरॉन) उत्पादनासाठी गरज असते.

आहारात वापर केल्याने गाभण राहण्याचा दर वाढतो.

कमतरतेमुळे माजावर न येणे, नवजात वासरू लंगडते, नवजात वासराचा मृत्यू होतो, बीजांड फलन आणि अंडमोचन दर कमी होतो.

झिंक

प्रसूती झाल्यानंतर गर्भपिशवीचे नव्याने पुनर्गठन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे.

कमतरतेमुळे माजावर येण्याचा काळ लांबतो, गाभण राहण्याचा दर कमी होणे, गर्भाची वाढ होत नाही.

लोह

हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिनच्या उत्पादनासाठी आवश्यक.

शरीरातील ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत वाहून नेण्यासाठी उपयुक्त.

कमतरतेमुळे रक्तक्षय होतो, भूक मंदावते, शारीरिक स्थिती बिघडल्याने प्रजनन संस्थेवर परिणाम दिसून येतो.

आयोडीन

याचा उपयोग थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी होतो. नकळत याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर दिसून येतो.

गर्भाची वाढ आणि बेसल मेटाबोलिझम दराच्या देखभालीसाठी उपयुक्त.

आयोडीनच्या परिणामाने थायरॉइड ग्रंथीच्या मदतीने गोनॅडोट्रोपी संप्रेरक, अँटेरिअर पिट्युटरी ग्रंथीच्या द्वारे ऋतुचक्रावर परिणाम होतो. कमतरतेमुळे गाभण न राहणे, गर्भपात होणे, गर्भ पिशवी धरून राहणे, गाभण काळ वाढतो.

प्रजनन क्षमता टिकून ठेवण्यासाठी दररोज १५ ते २० मिलि ग्रॅम आयोडीनची मात्रा आवश्यक आहे.

क्रोमियम

अन्नाचे पोषक द्रव्यात रूपांतर करण्यासाठी उपयोगी.

बीजांड वाढीसाठी, ऋतुचक्र सुरळीत कार्यक्षम राहाणे आणि गर्भपात टाळण्यासाठी वापर.

कमतरतेमुळे दुधाळ जनावरात केटोसिस होऊन दूध देण्याचे प्रमाण कमी होते.

मोलिब्डेनम

मोलिब्डेनम आणि कॉपर यांच्या संयुगामुळे शरीराचे यांचे कार्य व्यवस्थित होते.

कमतरतेमुळे जनावर माजावर न येणे, गाभण राहण्याचा दर कमी होतो. जनावरांत वंधत्व येते.

डॉ. व्ही. एम. सरदार, ९९२२५११३४४, (सहायक प्राध्यापक, पशुशरीरक्रिया शास्त्र, विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशू वैद्यक महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT