Cow Rearing Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Rearing : लालकंधारी गोपालनातून सक्षम पर्याय

Article by Krushna Jomegaonkar : नांदेड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या सगरोळी येथील केदार शिंदे यांना जिरायती प्रदेशात लाल कंधारी गायींच्या संगोपनातून शेतीला भक्कम आर्थिक सक्षम पर्याय प्राप्त झाला आहे.

कृष्णा जोमेगावकर

Animal Management : लाल कंधारी देशी गाय मराठवाडा किंवा नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे शेवटचे टोक आणि तेलंगणाच्या सीमेवर सगरोळी (ता. बिलोली) गाव आहे. येथील पदवीधर युवा शेतकरी केदार शिंदे यांची ३५ एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यात ते सोयाबीन, हरभरा, तूर , मिरची आदी पिके घेतात. त्यांचे वडील खासगी संस्थेतून शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. पूर्वी त्यांच्याकडे जनावरे होती.

मात्र २०१० नंतर केदार यांनी केवळ लाल कंधारी गायींच्या संगोपनावरच लक्ष केंद्रित केले. कंधार-लोहा भागातून जातिवंत गायी व वळू खरेदी केला. काटक, रोग प्रतिकारक गाय म्हणून लाल कंधारीची ओळख आहेच. शिवाय बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. साहजिकच त्यांना बाजारात मागणीही चांगली असते. कमी पर्जन्यमान असलेल्या इथल्या या प्रदेशात शेतीला पूरक व्यवसायांनी साथ दिली आहे.

पशुधनाचे व्यवस्थापन

सन २०१५ मध्ये केदार यांच्याकडे सुमारे २५ पर्यंत तर आज लहान-मोठे मिळून सुमारे ३५ पर्यंत लालकंधारी पशुधन आहे. प्रति गाय दररोज ७ ते ८ लिटर दूध देते. गायीच्या दुधाची विक्री न करता ते घरगुती कारणासाठीच वापरले जाते. तूपही तयार केले जाते. गावालगत असलेल्या शेतात ६० बाय ५५ फूट आकाराचा गोठा उभारला आहे.

प्लॅस्टिक टाक्या मधोमध कापून गव्हाण तयार केली आहे. पावसाळ्याच्या काळात जनावरांना गावलगतच्या डोंगरावर नेले जाते. दिवसभर चरून आल्यानंतर गोठ्यात बांधले जाते. दिवसभर मुक्तसंचार पद्धतीने जनावरांना गोठ्याच्या बाहेर मोकळे सोडले जाते. त्यामुळे त्यांची प्रकृती निरोगी राहण्यास मदत होते. हौदामध्ये चोवीस तास शुद्ध पाणी राहील अशी व्यवस्था केली जाते.

चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात सुपर नेपियर व दीड एकरांत कडवळ घेतले आहे. रब्बी ज्वारीचा कडबा, हरभऱ्याचे कुटार, सरकी ढेप, तांदळाचा कोंडा, शिल्लक सोयाबीनचे मिश्रण आदींचा खुराकही देण्यात येतो. सगरोळी येथे कृषी विज्ञान केंद्र असल्याचा मोठा फायदा केदार यांना झाला आहे. तेथील पशुसंवर्धन विभागाचे तज्ज्ञ डॉ. निहाल अहमद मुल्ला यांचे मार्गदर्शन होते. चारा पिकांबाबत केंद्रातील कपिल इंगळे यांचे मार्गदर्शन होते.

शेणखतामुळे रासायनिक खत वापरात बचत

सुमारे ३५ जनावरांपासून दरवर्षी १५ ते ते २० ट्रॉली शेणखत मिळते. गोमूत्र वेगळे धरले जात नाही. गोमूत्र मिसळून तयार झालेल्या शेणखताचा वापर पूर्णपणे घरच्या शेतीसाठी होतो. हे सेंद्रिय खत चांगल्या प्रकारे कुजण्यासाठी त्याच जिवाणू कल्चरचा वापर होतो.

खत शेतात वापरण्यापूर्वी त्यात ट्रायकोडर्माचाही वापर होतो. या खतामुळे रासायनिक खताच्या वापरात तसेच खर्चातहीमोट्या प्रमाणात बचत झाली आहे. जमिनीच सुपीकता वाढली आहे.

व्यवसायातील उत्पन्न

केदार सांगतात की दूधविक्री हा उद्देश ठेवला की दररोज त्याचे संकलन, डेअरीला त्याचा पुरवठा या गोष्टी कराव्या लागतात. शेतीत मी व पत्नी स्मिता असे दोघे कष्ट करतो. ३५ एकर शेती व तीन पूरक व्यवसाय असा भार आहे.

त्यामुळे शेतीतील कष्ट कमी किंवा सुकर व्हावेत व मजुरांवरील खर्चही नियंत्रित राहावा यासाठी गोऱ्हे संगोपन, विक्री व त्यातून उत्पन्न या बाबीवर अधिक भर दिला. दरवर्षी आठ ते दहा गोऱ्हे तर काही कालवडी उपलब्ध होतात. सरासरी पंचवीस ते तीस हजार रुपये दराने गोऱ्ह्यंची विक्री होते. शेतीकामांसाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यास मोठी मागणी असते असे केदार सांगतात.

शेळी व कोंबडीपालनाचा आधार

उत्पन्नवाढीचे स्रोत वाढवण्यासाठी लालकंधारी गायींसोबतच दहा उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपनही केले आहे. गायीच्या गोठ्याशेजारी त्यासाठी शेड तयार केले आहे. बंदिस्त स्वरूपातच चारा-पाणी दिले जाते. नर व मादी अशा दोघांचीही विक्री केली जाते. शेळीपालनापासून वर्षाला साठ ते सत्तर हजारांचे उत्पन्न मिळते. या दोन्ही पूरक व्यवसायांना अतिरिक्त साथ म्हणून शंभर देशी कोंबड्या पाळल्या आहेत.

त्यांच्या अंगावरील गोचीड निर्मूलनाचे काम त्या करतात. शेण बारीक होण्याचे कामही त्या करतात. सगरोळी हे सुमारे चारहजार लोकसंख्येचे गाव असून येथे कोंबड्या व अंड्यांना चांगली मागणी असते असे केदार म्हणाले. अंडी प्रति नग दहा रुपये तर जिवंत कोंबडी साडेतीनशे रुपये प्रति किलो या दराने विक्री होते. कोंबडीपालनातून वर्षाला पस्तीस ते चाळीस हजारांपर्यंत उत्पन्न मिळते.

पूरक व्यवसायातून शेण उपलब्ध होत असल्याने त्या आधारे शेतात बायोगॅस निर्मिती युनिट उभारले आहे. त्यासाठी पंचायत समितीकडून मदत झाली आहे. त्यातून तयार होणाऱ्या इंधनापासून घरातील स्वयंपाकासाठी मदत होत असल्याचे केदार म्हणाले. आई मधुमती, वडील खंडेराव यांचे मार्गदर्शन होते. सई व गार्गी या मुली शालेय शिक्षण घेत आहेत.

केदार शिंदे - ८६६८८२८४८५, ९०६९९७४४००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT