डॉ. चंदा निंबकर
Livestock Health Management : वातावरणात वाढत जाणाऱ्या हरितगृह वायूंमुळे पृथ्वीचे वाढणारे तापमान, तसेच हवामानातील वाढती अनिश्चितता, ऋतूप्रमाणे अपेक्षित हवामानाऐवजी प्रत्येक ऋतूत अनपेक्षित, विचित्र हवामान, अधिक तीव्रतेने होणारी वादळे, अतिवृष्टी वा दुष्काळ, गारपीट अशा विनाशकारी घटना आपण अनुभवत आहोत. हवामान बदलाचा शेळ्या, मेंढ्या आणि इतर उत्पादक पशूंवरही हानिकारक परिणाम होत आहे.
जास्त तापमान व घटत्या पाऊसमानामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, चारा पिकांची उत्पादकताही घटते. दुष्काळी भागातील शेळी, मेंढीपालन पद्धती ज्या पाणी आणि गवताच्या स्रोतांवर अवलंबून असतात, ते स्रोत मोठ्या प्रमाणावर कमी होऊ लागले आहेत. हवामान बदलाचा एक परिणाम वरच्यावर आणि जास्त तीव्रतेचा दुष्काळ पडणे हा असू शकतो. म्हणून हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी जनावरांशी संबंधित व्यूहरचना विकसित करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
तत्काळ मार्गदर्शनाची गरज
गोठ्यामध्ये जनावरे ठेवली तर जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीपासून त्यांचे बऱ्याच प्रमाणात संरक्षण करता येतो. त्यामुळे काही विनाशकारी घटनांमध्ये पशुपालकांना पिकांइतके नुकसान सहन करावे लागलेले नाही. अर्थात, सांगली-कोल्हापूरमधील पुरासारखी विनाशकारी घटनेची तीव्रता भयंकर आणि मोठा कालावधी असेल तर मात्र शेळ्या-मेंढ्यांसारखे पशूही त्यात भरडले जातात.
२०१९ मध्ये विक्रमी पावसाचा परिणाम असाही झाला, की जिकडेतिकडे साचलेल्या पाण्याची डबकी झाल्याने मेंढ्यांमधील नीलजिव्हा रोगाचा प्रसार करणारी चिलटे मोठ्या प्रमाणात वाढली. नीलजिव्हा रोगास कारणीभूत विषाणूच्या काही प्रकारांवर लस उपलब्ध असूनही मेंढपाळांना याची माहिती नसल्याने व त्यांना वेळेवर योग्य सल्ला दिला न गेल्याने, त्याचप्रमाणे सततच्या पावसाने मेंढ्यांना व्यवस्थित पोटभर चारा न मिळाल्याने अशक्त झालेल्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात या रोगाला बळी पडल्या.
यावरूनच दिसून येते की हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि संबंधित सरकारी यंत्रणेने मोठ्या प्रमाणात जागृत राहून शेळी, मेंढीपालकांना वेळेवर योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.
व्यवस्थापन पद्धतीचे नियोजन
शेळ्या, मेंढ्या आणि इतर पाळीव पशुपालनाच्या दोन मुख्य प्रचलित पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे त्यांना जागेवर ठेवून त्यांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन ठेवणे. दुसरी पद्धत म्हणजे त्यांना चरायला सोडणे किंवा काही प्रमाणात चारणे तसेच काही प्रमाणात पूरक खाद्य देणे. यामध्ये चरायला नेल्या जाणाऱ्या व दिवसाचे सहा, सात तास बाहेरच्या अनुकूल अथवा प्रतिकूल वातावरणात काढणाऱ्या जनावरांमध्ये ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्याची आनुवंशिक क्षमता जास्त प्रमाणात विकसित होते.
‘नारी’ संस्थेने विकसित केलेल्या ‘नारी सुवर्णा’ मेंढ्या आणि त्यांच्या कोकरांची आनुवंशिक क्षमता जास्त प्रमाणात विकसित झाल्याने कडाक्याची थंडी आणि होरपळविणाऱ्या उन्हाळ्याला ताकदीने तोंड देऊ शकतात. अर्थात, यामध्ये त्यांना दिले जाणारे पोषक खाद्य आणि सुयोग्य व्यवस्थापनाचा वाटा आहे. कुपोषित अवस्थेतील शेळ्या, मेंढ्या किंवा कोणतीच जनावरे हवामान बदलाला तोंड देण्यास सक्षम राहत नाहीत.
हरितगृह वायूंचे उत्सर्जन
जनावरांमुळे देखील हवामान बदलाला हातभार लागत असतो. रवंथ करणाऱ्या पाळीव जनावरांच्या पचनक्रियेतून त्याचप्रमाणे शेणखत, लेंडीखत साठवणे आणि शेतात टाकण्याच्या पद्धतींमधून हवामान बदलास जबाबदार असणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते.
जागतिक अन्न व कृषी संघटनेने तयार केलेल्या प्रतिरुपांवर आधारित निष्कर्ष असे आहेत, की जागतिक पातळीवर मानव अन्नासाठी वापरत असलेल्या जनावरांपासून होणाऱ्या एकूण (त्यांच्या जन्मापासून विक्रीपर्यंत) हरितगृह वायू उत्सर्जनापैकी शेळ्या, मेंढ्यांचा वाटा फक्त ७ टक्के आहे. दूध व मांसासाठी पाळल्या जाणाऱ्या गाईंचा वाटा ६५ टक्के, म्हशी ९ टक्के, कोंबड्या १० टक्के आणि वराह ९ टक्के असा वाटा आहे.
भारतामध्ये शेळ्या, मेंढ्यांचा वाटा तुलनेने कमी असण्याचे एक कारण म्हणजे अनुत्पादक शेळ्या, मेंढ्या सांभाळल्या जात नाहीत. परंतु गोवंश हत्या बंदी असल्याने अनुत्पादक गाई व बैल मात्र फार मोठ्या प्रमाणावर सांभाळले जातात किंवा मोकाट सोडले जातात आणि ही जनावरे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला हातभार लावतात.
जनावरांद्वारे केले जाणारे हरितगृह वायू उत्सर्जन मोजण्यासाठी प्रति किलो प्रथिन उत्पादनामागे उत्सर्जित केला जाणारा कार्बन डायऑक्साइड किंवा त्यासदृश वायू हे एकक जागतिक अन्न व कृषी संघटनेने वापरले आहे. परंतु भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये प्रथिन उत्पादनाशिवाय शेतीकाम, वाहतुकीसाठी तसेच एक जिवंत बँक म्हणून, अडीअडचणींतील विमा म्हणून व इतर सामाजिक-सांस्कृतिक गरजांमध्ये शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरांचे महत्त्व आहे. त्याचा मात्र विचार या मोजमापात केलेला नसतो, ही मोठी त्रुटी आहे.
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या व हरितगृह उत्सर्जन कमी करणाऱ्या शेतीच्या पद्धती प्रचलित करण्यासाठी ‘हवामान अनुकूल शेती’ ही संकल्पना कृषी विकास क्षेत्रात कार्यरत संस्थांनी स्वीकारली आहे. परंतु पशुसंवर्धन क्षेत्र मात्र अशा संकल्पना राबवण्यामध्ये अजून मागे आहे.
आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्थेतर्फे (ILRI) पशुपालकांच्या सहकार्याने आफ्रिकेतील काही देशांमध्ये हवामान अनुकूल पशुपालन पद्धती विकसित करणे आणि त्यांच्या प्रत्यक्षात चाचण्या घेण्यावर काम केले जाते. यामध्ये विशिष्ट चारा पिके घेण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा, पशुखाद्यावर प्रक्रियेत सुधारणा त्याचप्रमाणे जैविक खत व्यवस्थापन आणि कुरण व्यवस्थापन यांचा समावेश आहे. हवामान बदलाशी जुळवून घेण्यामध्ये काही पशुपालक इतरांपेक्षा जास्त यशस्वी का होतात, स्थानिक पातळीवर कोणती नवीन तंत्रे ह्यासाठी उपयुक्त ठरू शकतात ह्याचा अभ्यास या प्रक्रियेत अंतर्भूत आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये शेळी, मेंढीपालकांसमोरील पर्यावरणीय, आर्थिक व हवामान बदलाशी संबंधित आव्हानांचा विचार हा आंतरविद्याशाखीय पद्धत, एकात्मिकरीत्या करण्याची आणि त्यांवरील उपाय शोधण्याची जरुरी आहे. धोरणकर्त्यांनी नियोजनात व प्रकल्पांतील गुंतवणुकीच्या आखणीत हवामान बदलाचे पशुसंवर्धन क्षेत्रावरील अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीतील अपेक्षित परिणाम विचारात घेण्याची गरज आहे.
डॉ. चंदा निंबकर, ९९६०९४०८०५
(संचालिका, पशुसंवर्धन विभाग, निंबकर कृषी संशोधन संस्था व महाराष्ट्र शेळी-मेंढी संशोधन व विकास संस्था, फलटण, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.