Animal Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Health : थंडीच्या काळात दुभत्या गाई, म्हशींकडे लक्ष द्या...

Animal Care : हिवाळ्यामधील तापमान मानवणारे असले तरीदेखील दुभत्या संकरित गायी आणि म्हशींची काळजी घ्यावी लागते. वातावरणातील बदलाचा जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे हिवाळ्यात पशुपालकांनी सतर्क राहावे.

Team Agrowon

प्रशांत कुलकर्णी, डॉ. पराग घोगळे

Animal Husbandry Management : थंड वातावरणामुळे जनावरांच्या नाक व डोळ्यांतून पाणी येणे, भूक कमी होते. जनावरे कापतात. हे लक्षात घेऊन संध्याकाळ होताच जनावरांना गोठ्याच्या आत बांधावे. थंड वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांना बैठकीच्या ठिकाणी कोरडा चारा किंवा पेंडा पसरावा. जास्त थंडी असल्यास, गोठ्यामध्ये सावधानता बाळगून शेकोटी करावी. शेकोटी केल्यास धूर व्यवस्थित बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी.

थंड वातावरणात शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी ऊर्जा गरजेची आहे. जास्त थंड वातावरणात जनावरांच्या शरीराची ऊर्जेची गरज वाढते, त्यामुळे जनावरांचे शरीर काही वेळा थंडीने थरथरताना दिसते. अशा वेळेस जर शरीरावरील केस ओले असतील तर ऊर्जेची गरज अजून वाढते.

कमी होत जाणाऱ्या तापमानाप्रमाणे खाद्यात ऊर्जेचा स्रोत वाढवावा. थंड वातावरणात जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढते. हे वाढलेले प्रमाण जनावरे शरीर स्वास्थासाठी लागणारी अतिरिक्त ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत हे दर्शवते. किण्वनपोट (रुमेन) पूर्ण भरलेली जनावरे जास्त ऊर्जा उत्पन्न करून थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात.

थंड वातावरणात असणारी ऊर्जेची कमतरता लगेच भरून येत नाही, त्यामुळे खाद्यातील कुठलेही बदल हे अतिशय हळू करावे लागतात. ऊर्जायुक्त खाद्य घटक जनावरांना दुपार नंतर किंवा संध्याकाळच्या वेळी द्यावेत. जेणेकरून त्यांना पचवून निर्माण होणारी ऊर्जा रात्रीच्या वेळेस उपयोगी येऊ शकेल. त्यामुळे तापमान कमी होण्याआधी आंबवण किंवा पशुखाद्याव्यतिरिक्त ऊर्जायुक्त घटक जसे मका एक किलो, बायपास फॅट १०० ग्रॅम हे पशुखाद्यासोबत द्यावेत.

गोठा व्यवस्थापन

वारा, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गायी, म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण ठेवावे.

गोठा हवेशीर असावा. पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि ऊन हे आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मदत करते. गोठ्याचा भूभाग निसरडा नसावा आणि स्वच्छ करण्यास सोपा असावा. रात्रेच्या वेळी शेडनेट किंवा बारदानाने गोठा बंद करावा जेणेकरून गार वारे रोखण्यास मदत होईल. रात्री गोठ्यातील बल्ब चालू ठेवावा. जेणेकरून तापमान नियंत्रित ठेवता येते.

आजारी जनावरांस पुरेसा चारा खाण्यास मदत मिळेल अशी व्यवस्था करावी. बैठकीची जागा कोरडी असावी, ज्यामुळे ओलावा आणि थंडीचा गाईंवर परिणाम होण्यापासून संरक्षण होते. बैठकीची जागा जितकी कोरडी तितकी जमीन उबदार राहते. थंडीपासून जनावरांचे संरक्षण होते.

दिवसा गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवणे महत्त्वाचे आहे. गोठ्यातील आर्द्रता, अमोनिया बाहेर जाईल याची काळजी घ्यावी.

आहार आणि पाणी नियोजन

शरीरस्वास्थ आणि दूध उत्पादनासाठी जनावरांना ऊर्जा लागते. जर शरीरस्वास्थासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर दूध उत्पादनासाठीची ऊर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात किंवा फॅट आणि ‘एसएनएफ’मध्ये घट दिसून येते. कारण या काळात ऊर्जेची गरज वाढलेली असते.

थंड हवामानात वाढलेल्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी गायींचा आहाराचे नियोजन करावे. शरीराचे तापमान राखण्यासाठी गायींना जास्त ऊर्जा लागते. जनावरांना उच्च-गुणवत्तेचा चारा द्यावा. आहारात चांगल्या दर्जाचे गवत, कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.

हिवाळ्यात गाई, म्हशींच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाद्य नियोजन करावे. हिवाळ्यात जास्त प्रथिनयुक्त आहार दिला गेल्यास उच्च दर्जाच्या प्रथिनांचा अधिक वापराने अॅसिडोसिस होण्याची शक्यता असते.

त्यामुळे आम्ल शोषले जात नसल्याने किण्वन पोटाचा (रुमेन) सामू कमी होतो. या अॅसिडोसिसचा परिणाम होऊन दूध आणि दुधातील एसएनएफचे प्रमाण कमी होते. त्यासाठी गव्हाणीमध्ये पुरेसा चारा उपलब्ध आहे याची खात्री करावी. कोरडा चारा जितका जास्त तितकी शरीरातील ऊर्जा जास्त असते.

हिवाळ्यात थंडीमुळे गाई, म्हशींना तहान कमी लागते. कमी पाणी पिल्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध असल्याची खात्री करावी. हिवाळ्यामध्ये युरोपातील देशांत गायींना कोमट पाणी पिण्यास दिले जाते, याचा पाणी पिण्यावर व दूध उत्पादनात अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

पाण्याची टाकी नियमित स्वछ ठेवावी. पाण्याचा टाकीचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. गायींना भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी आहारात कोरड्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. खाद्यात मिठाचे प्रमाण योग्य आहे याची खात्री करावी.

हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे जनावरांच्या शरीरातील ऊर्जा वापरली जाऊन वजन, प्रकृतिअंक (बॉडी स्कोअर) खालावतो. अशा वेळी खाद्यात उर्जेचे प्रमाण अतिरिक्त वाढवून दिले पाहिजे.

थंडीच्या ताणामुळे जनावराच्या शरीराची प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व इत्यादींच्या गरजा बदलत नाहीत. एका अभ्यासानुसार घटत जाणाऱ्या एक अंश फॅरनहाइट तापमानाप्रमाणे एक टक्का जास्त ऊर्जेची पूर्तता पशू आहारातून केली पाहिजे. हिवाळ्यात ऊर्जेची गरज साधारणतः १० ते २५ टक्के इतकी जास्त असते.

आरोग्य व्यवस्थापन

हिवाळ्यात जनावरांचे जंत निर्मूलन करावे. जास्त थंड वातावरणात जनावरांच्या हृदयाची आणि श्‍वासोच्छ्वासाची गती वाढलेली असते. वाढलेल्या रक्ताभिसरणाद्वारे जनावरे स्वतःचा थंडीपासून बचाव करतात. गोठ्यामध्ये वेळोवेळी स्वच्छता करावी. शक्य झाल्यास जिवाणू व विषाणूनाशकाने गोठ्यामध्ये फवारणी करावी.

थंड वातावरणामुळे गाई, म्हशींचे शरीर, सड किंवा इतर भागांना लहान तडे जातात. त्यामुळे जखमा होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. जखमा होऊ नयेत व झाल्यास लवकर बऱ्या होण्यासाठी खाद्यामध्ये चिलेटेड जस्त (झिंक) आणि बायोटीनयुक्त खनिज मिश्रणाचा समावेश करावा. ग्लिसरीन, प्रोविडॉन आयोडीन आणि पाणी यांचे समप्रमाणात मिश्रण करून त्यात दूध काढल्यानंतर सड बुडवावेत. दूध काढण्याअगोदर थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने कास धुवावी.

हिवाळ्यात वासरांची विशेष काळजी घ्यावी. वासरांना पाजणाऱ्या दुधाचे तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे. वासरांना थंड दूध पिण्यासाठी देऊ नये. त्यामुळे त्यांना डायरिया होण्याची शक्यता असते. वासरांचे लसीकरण करून घ्यावे. वासरांना बसण्यासाठी गवत किंवा बारदान अंथरावा. रात्रीच्या वेळी वासरांना बंदिस्त जागेत ठेवावे. वासरांना आहारात ऊर्जेची गरज असल्याने काल्फ स्टार्टरचा वापर करावा.

गाई, म्हशींमध्ये आजारपणा किंवा अवस्थपणा दिसतो का याकडे लक्ष ठेवावे. नियमित आरोग्य तपासणी करावी. शरीर तापमानाचे निरीक्षण करावे. गायींच्या शरीराचा प्रकृतिअंकाकडे लक्ष द्यावे. आवश्यकतेनुसार आहारातील बदल करावेत.

गोठ्यात ओलेपण, चिखल असल्यास खुरांच्या समस्या दिसतात. गोठ्याची जमीन जास्त निसरडी असल्यास खुरे निसटू शकतात, त्यामुळे इजा होते. ओल्याव्यामुळे खुरांचा दोन नख्यांमधील जागेत जखम होते. त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे खुरांकडे लक्ष द्यावे.

प्रशांत कुलकर्णी, ९१६८३९३६३६

(लेखक पशू व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT