Goat Farmगलु
Goat Farmगलु Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेळीपालनातून कशी साधली प्रगती?

Team Agrowon

सां गली जिल्ह्यातील पलूस तालुका प्रामुख्याने द्राक्ष उत्पादनासाठी (Grape production) प्रसिद्ध आहे. येथील आनंदराव तुकाराम सिसाळ यांची २५ एकरावर द्राक्ष बाग आहे. सिसाळ कुटुंबाचा शेळी-मेंढीपालन हा पारंपारिक व्यवसाय (Goat Farming) आहे. त्यामुळे आनंदराव यांना व्यवसायातील बारकावे, व्यवस्थापनातील बाबी आणि विक्री नियोजनाची पुरेशी माहिती होतीच.

या पारंपारिक व्यवसायाला मोठे स्वरूप देण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार २००० रोजी व्यावसायिकदृष्ट्या शेळीपालनास सुरुवात केली. सुरुवातीला उस्मानाबादी जातीच्या १० शेळ्या व १ बोकड आणले. दोन वर्षे या व्यवसायावर उत्तम जम बसला. स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणी शेळ्यांची विक्री होऊ लागली. परंतु, अपेक्षित वजन मिळत नसल्याने आणि अन्य कारणांमुळे त्यांनी या जातीच्या शेळ्या कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इतर जातीच्या शेळ्यांविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली.

२००२ मध्ये आफ्रिकन बोअर या जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार फलटण येथून ५ शेळ्या आणि १ बोकड विकत आणले. या जातीच्या शेळ्या कमी कालावधीत जास्त वाढ, चांगली रोगप्रतिकारक शक्ती असल्याने या व्यवसायास गती मिळाली. आजपर्यंत त्यांनी शेडवरून सुमारे २ ते ३ हजार लहान-मोठ्या शेळ्यांची विक्री केली आहे. शेळीपालन व्यवसायात त्यांचे चिरंजीव संग्राम यांची त्यांना मोलाची मदत होते असे आनंदराव सांगतात.

शेडची उभारणी ः

शेळ्यांच्या संगोपनासाठी २००५ मध्ये अर्धबंदिस्त पद्धतीच्या शेडची उभारणी केली. साधारणपणे २७० फूट लांब तर ७० फूट रुंद आकाराचे शेड उभारले आहे. त्यामध्ये शेळ्यांसाठी वयोमानानुसार वेगवेगळे कप्पे तयार केले. शेळ्या व कोकरांसाठी वेगळे आणि बोकडांसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. शेळी फार्मला ‘सिसाळ गोटफार्म’ असे नामकरण केले आहे. सध्या शेडमध्ये लहान मोठ्या मिळून सुमारे १५० शेळ्या आहेत. शेडमध्येच शेळ्यांना पिण्यासाठी २ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे.

खाद्य नियोजन ः

साधारण अडीच एकर क्षेत्रावर विविध चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात मका, हत्तीघास, कडवळ, शेवरी तसेच सुबाभूळ यांची लागवड आहे. अपेक्षित वाढीसाठी संतुलित खाद्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यानुसार हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी शेडमध्येच शेळ्यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी पुरेसा चारा उपलब्ध केला जातो. उपलब्धतेनुसार ओला आणि सुका असा एकत्रित चारा दिला जातो.

सुक्या चाऱ्यामध्ये तूर, हरभऱ्यांचा भुसा तर ओल्या चाऱ्यामध्ये हत्ती घास, शेवरी, कडवळचा वापर केला जातो. वयोमानानुसार एका शेळीला साधारण २५० ग्रॅम मका, २५० ग्रॅम सरकी पेंड आणि खनिज मिश्रण खाद्य म्हणून दिले जाते. यामुळे शेळीच्या वजनात अपेक्षित वाढ होण्यास मदत होते.

आरोग्य व्यवस्थापन ः

शेडमधील सर्व शेळ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते.

पावसाळ्यापूर्वी शेडमधील सर्व शेळ्यांना लसीकरण केले जाते.

आजारी शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. आजारी शेळ्यांचे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जातात.

शेडमधील शेळ्यांना वर्षभर वेगवेगळे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. सर्व लसीकरण हे पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

सर्व शेळ्यांना इअर टॅगिंग केलेले आहे. त्यानुसार प्रत्येक शेळीच्या माहितीची नोंद ठेवली जाते.

दर तीन महिन्याने जंतनाशक औषध दिले जाते.

गाभण काळातील व्यवस्थापन ः

गाभण काळात शेळ्यांची विशेष काळजी घेतली जाते. शेळ्यांचे आहार, आरोग्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. आवश्यकतेनुसार शेळ्यांची सोनोग्राफी केली जाते. नवजात पिल्लांची सुरुवातीचे १५ दिवस विशेष काळजी घेतली जाते. गाभण काळात योग्य काळजी घेतल्याने अपेक्षित वजनाची पिल्ले मिळत असल्याचे आनंदराव सांगतात.

विक्री नियोजन ः

खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनावर विशेष भर दिल्याने विक्रीवेळी त्यांचे अपेक्षित वजन भरते. वर्षभरात एक बोकड साधारणपणे १०० किलो तर शेळीचे ७० ते ८० किलो वजन भरते.

शेळ्यांची विक्री प्रामुख्याने शेडवरूनच होते. स्थानिक ग्राहकांसह तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ आणि कर्नाटक राज्यातील ग्राहक थेट शेडवर येऊन शेळ्यांची खरेदी करतात. परराज्यातील ग्राहकांना शेळ्यांची विक्री करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो.

साधारण ३ ते ४ महिने वयाच्या लहान पिल्लांची विक्री २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत होते. बकरी ईद सारख्या सणाच्या काळात बोकडांना विशेष मागणी असते. त्यावेळी दरही चांगला मिळतो.

- आनंदराव सिसाळ, ८९५६५४१००६

(शब्दांकन ः अभिजित डाके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT