बाळासाहेब पाटील
Mumbai News : राज्यातील देशी गायी आणि म्हशींच्या संख्येत वाढ करण्यासाठी ‘सरोगेट मदर' ही संकल्पना अमलात आणली जाणार आहे. प्रयोगशाळांमध्ये भ्रूणनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी राज्यात सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील.
त्यामध्ये देशी गाय आणि म्हशींच्या स्त्रीबिजांचे संकलन करून त्याचे वळूंच्या लिंगर्गीकृत वीर्याद्वारे फलन करण्यात येईल. प्रयोगशाळेत तयार भ्रूण शेतकऱ्यांकडील गाई, म्हशींमध्ये प्रत्यारोपीत करण्यात येईल. यातून जातिवंत कालवड आणि पारड्यांचा जन्म शेतकऱ्यांच्या गोठ्यात होऊन जातिवंत दुधाळ पशुधनात वाढ होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ः
- उत्पादकतेत वाढ आणि वंशावळ संवर्धनासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर.
- डांगी, गवळावू, खिलार, लाल कंधारी तसेच गीर, साहिवाल, थारपारकर हे भारतीय गोवंश आणि या जातिवंत म्हशींच्या संख्येत वाढ करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान.
- उच्च तंत्रज्ञान वापरून एका गाईपासून एका वर्षात ८ ते १० वासरे आणि तिच्या संपूर्ण आयुष्यात अंदाजे ५० ते ६० वासरांची ‘सरोगेट मदर'मार्फत पैदास.
- प्रयोगशाळेमध्ये उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानामध्ये द्रवनत्रात गोठीत अवस्थेत अनेक वर्षे भ्रूण साठवण.
...असे आहे तंत्रज्ञान ः
मल्टिपल ओव्हुलेशन अँड एब्रियो ट्रान्स्फर (एमओईटी) आणि ओव्हम पीक अप-इनव्हिट्रो फर्टिलायझेशन (ओपीयू- आयव्हीएफ) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे निवडक जातिवंत प्रजनन केले जाते. म्हणजे गाईला कालवड आणि म्हशीला रेडी जन्माला येईल, असे हे तंत्रज्ञान आहे. ही सेवा शेतकऱ्यांच्या दारात पुरविल्यास उच्च गुणवत्तेच्या जातिवंत दुधाळ देशी गायी आणि म्हशींच्या संख्येत जलद गतीने वाढ होईल, असे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.
महसुली विभागनिहाय प्रयोगशाळा ः
मुंबई : जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र, पेण(जि. रायगड)
नागपूर : पशुपैदास प्रक्षेत्र, हेटिकुंडी(ता. कारंजा, जि.वर्धा)
पुणे : वळूमाता प्रक्षेत्र ताथवडे, जि. पुणे
छत्रपती संभाजीनगर: वळू संगोपन केंद्र, छत्रपती संभाजीनगर
नाशिक : लोणी बुद्रूक (ता. राहता, जि. नगर)
अमरावती : जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र, अकोला
शेतकऱ्यांकडून होणार स्त्रीबीज संकलन
शेतकऱ्यांकडील जातिवंत दुधाळ देशी गाय, म्हशींचे स्त्रीबिजाचे संकलन केले जाईल. प्रयोगशाळेत जातिवंत वळू, रेड्याचे विर्य वापरून संकलित स्त्री बिजाचे फलन करून भ्रूण तयार करण्यात येईल.
हा भ्रूण शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गाय किंवा म्हशीमध्ये शेतकऱ्याच्या खर्चाने प्रत्यारोपित करता येईल. तीन वेळा स्त्रीबीज संकलन केल्यानंतर एक गाय किंवा म्हशीची गर्भधारणा निश्चित करता येईल. स्त्रीबीज संकलनासाठी प्रयोगशाळेपासून १०० किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांकडील गाई, म्हशींतील स्त्रीबीज संकलन करण्यात येईल.
पैदासीसाठी कमी उत्पादन क्षमतेच्या गाई, म्हशींचा वापर
भ्रूण प्रत्यारोपणासाठी शेतकऱ्यांकडील कमी उत्पादन क्षमता असलेल्या गाय किंवा म्हशींचा वापर केला जाईल. संबंधित पशुपालकास भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे जन्मणाऱ्या प्रति वासरासाठी १० हजार रुपये देण्यात येतील. यातील पाच हजार रुपये गर्भधारणा तपासणी केल्यानंतर आणि पाच हजार वासरू जन्मल्यानंतर देण्यात येतील.
भ्रूण प्रत्यारोपणासाठीचा खर्च
उच्च प्रतीच्या वळू, रेड्याचे लिंगनिश्चित वीर्य आणि स्त्रीबिजापासून तयार केलेल्या भ्रूणाच्या प्रत्यारोपणासाठी गाय किंवा म्हशीचे स्त्रीबीज दिलेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये प्रयोगशाळेस द्यावे लागणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे दाता गाय किंवा म्हैस नसेल
अशांना भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमार्फत २१ हजार रुपये सेवाशुल्काच्या मोबदल्यात एक भ्रूण प्रत्यारोपण निश्चित करून दिले जाणार आहे.
चांगल्या दुधाळ गोवंश आणि म्हशींचे संवर्धन व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवीत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे पशुधन उपलब्ध होईल. याचा विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- राधाकृष्ण विखे-पाटील, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.