Go Palan Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Farming : शेवगाव तालुक्यातील परमेश्वर देशमुख यांचे गोपालन

Team Agrowon

शेतकरी - परमेश्वर एकनाथ देशमुख

गाव - माळेगाव ने, ता. शेवगाव, जि. नगर

एकूण गाई - १३ गाई व ६ वासरे

Nagar Story : नगर जिल्ह्यातील शेवगावपासून जवळ असलेल्या माळेगाव ने येथील परमेश्वर देशमुख १० वर्षांपासून दुग्धव्यवसाय करत आहेत. त्यांची वडिलोपार्जित ८ एकर शेती आहे. त्यापैकी एक एकरमध्ये चाऱ्यासाठी ऊस, तर अर्धा एकरांत गिन्नी गवताची लागवड केलेली आहे.

या भागांत पाण्याची मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे कायम टंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर मात करीत देशमुख यांनी दुग्धपालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी साधली आहे.

सुरवातीला त्यांच्याकडे म्हशी होत्या. मात्र, पाच वर्षांपूर्वी म्हशींची विक्री करून दोन एचएफ गाई खरेदी केल्या. दोन गाईंपासून सुरु केलेला गोपालनाचा व्यवसाय हळूहळू विस्तारत गेला. सध्या त्यांच्याकडे लहान-मोठ्या मिळून १९ गायी आहेत.

सध्या प्रतिदिन १०० लिटर पर्यंत दूध संकलन होत आहे. याशिवाय इतर शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्यासाठी दूध डेअरी सुरु केली आहे. अन्य शेतकऱ्यांचे मिळून दररोज ९०० लिटरपर्यंत दूध संकलन होते.

मुक्त संचार गोठ्याची उभारणी

गाईंसाठी मुक्त संचार आणि बंदिस्त असे दोन गोठे आहेत. त्यातील बंदिस्त गोठा हा जुना आहे. यावर्षी अडीच लाख रुपये खर्च करून मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. त्यात आधुनिक व्यवस्थापनावर भर दिला आहे. जुन्या गोठ्याला लागूनच नवीन मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. जुन्या गोठ्यामध्ये गाई फक्त दूध काढण्यासाठी आणल्या जातात.

व्यवस्थापनातील बाबी

- देशमुख कुटुंबीयांचा दररोज सकाळी साडेचार-पाच वाजता गोठ्यातील कामांचा दिनक्रम सुरु होतो. सकाळी पाच वाजता प्रथम दूध काढणी करून गायींना चारा दिला जातो.

- दिवसभरात एकदा सोयीनुसार गाई धुतल्या जातात.

- गायींना पिण्यासाठी मुक्त संचार गोठ्यात पाण्याची हौदाची सोय केली आहे. त्यातील पाणी आवश्यकतेनुसार गायी पितात.

- मुक्तसंचार गोठ्यामुळे शेण दररोज उचलण्याची गरज भासत नाही. साधारण चार महिन्यातून एकदा शेण उचलले जाते. या शेणाला मागणीही चांगली असते. गाभण गायींचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. गाय व्यायल्यानंतर दोन महिन्यापर्यंत दररोज दोन वेळा पशुखाद्यातून कॅल्शिअम पुरवठा केला जातो.

- रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या गाईंना गरजेनुसार कॅल्शिअम वापर केला जातो.

- उच्च प्रतिच्या कालवड पैदाशीसाठी उच्च दर्जाच्या वळूचे सिमेन्स भरण्यावर भर दिला जातो.

खाद्य व्यवस्थापन

- एका गाईला साधारण सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी १० किलो चारा दिला जातो. त्यात मोठ्या जनावरांना ५ किलो मुरघास, ७ किलो ऊस कुट्टी व ३ किलो गव्हाचा भुस्सा हे सर्व एकत्रित करून दिले जाते. हेच प्रमाण वासरांसाठी निम्मे दिले जाते.

- त्यानंतर प्रत्येक गाईला गोळी पेंड एक किलो, सरकीपेंड एक किलो व खनिज मिश्रण दिले जाते. वासरांना त्यांच्या वयानुसार निम्मा खुराक दिला जातो.

- चाऱ्यासाठी मुरघास निर्मिती केली जाते. त्यासाठी शेतात मका पिकाची लागवड केली जाते. यावर्षी साधारण २५ टन मुरघास तयार केलेला आहे.

लसीकरण

- मागील काही महिन्यापूर्वी राज्यासह जिल्ह्यात लम्पी स्कीन या त्वचा आजाराची साथ पसरली होती. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील ३ महिन्यांपूर्वी सर्व जनावरांना लसीकरण करून घेतले आहे.

- गाई व वासरांसाठी जंत निर्मुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी दर तीन महिन्याला जंतनाशकाची मात्रा दिली जाते.

- दर सहा महिन्यातून एक वेळ लाळ्या खुरकुतचे लसीकरण केले जाते.

- मुक्तसंचार गोठा असल्याने गोचीडाची समस्या फारशी भेडसावत नाही. मात्र, तरीदेखील गरजेनुसार गाईंना गोचीड निर्मूलनासाठी लस

देतात. शिवाय दीड ते दोन महिन्यांतून एक वेळ गोठ्यात गोचीडनाशकाची फवारणी केली जाते.

- गाईंची प्रसूती होताना त्यांना जास्त त्रास होऊ नये तसेच योग्यरीत्या होण्यासाठी जीवनसत्त्वांच्या मात्रा दिल्या जातात.

चाऱ्यासाठी शेणखताचा वापर

गायींना कायम दर्जेदार चारा खाऊ घालण्यावर भर दिला जातो. त्यासाठी शेतामध्ये चारा पिकांची लागवड केलेली आहे. चारा लागवडीमध्ये गोठ्यातील उत्पादित शेणखताचा अधिक वापर करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे चारा पिकांची दर्जेदार वाढ होण्यास मदत मिळते.

चांगला चारा गाईंना मिळाल्यामुळे दुधाची गुणवत्ताही वाढते. शिवाय शेणखताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. आणि रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्यास मदत झाली असल्याचे देशमुख सांगतात.

संपर्क - परमेश्वर देशमुख, ८७६६४९२९२३, (शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT