Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांचे आरोग्य, आहार व्यवस्थापन

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. अनिल भिकाने

Animal Feed Management : पावसाळ्यामध्ये पावसाची संततधार आणि बहुतांश ठिकाणी पाणी साठून राहिल्यामुळे वातावरणात बदल होतात. त्यातून जनावरांमध्ये विविध आजार होतात. पावसाळा ऋतूमधील वातावरण हे विविध प्रकारच्या कीटकांच्या वाढीसाठी अनुकूल असते. हे कीटक जनावरांमध्ये वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरविण्यास कारणीभूत ठरतात.

आरोग्यावरील परिणाम

उष्ण व दमट हवामानामुळे जनावरांमध्ये शारीरिक ताण येऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशी जनावरे विविध संसर्गजन्य आजारांना बळी पडतात.

कीटकांमार्फत संक्रमित होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.

चरावयास जाणाऱ्या जनावरांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत गोल कृमी, चपट्या कृमी व पर्णकृमी यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. पाणथळ ठिकाणी गोगलगाईंची संख्या जास्त असते, चराऊ जनावरे अशा ठिकाणी चरावयास गेल्यास या गोगलगाय पर्णकृमींच्या प्रसारामध्ये दुवा म्हणून काम करतात. ओर्ब्याटीड माइट्‌सचे प्रमाणही पावसाळा व हिवाळ्यात गवताळ भागात जास्त असते. या ओर्ब्याटीड माइट्‌स जनावरात विविध चपट्या कृमींच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.

जंतांचा प्रादुर्भावामुळे वजन घटते, दुग्ध उत्पादन घटते, प्रजननक्षमता बाधित होते. जास्त तीव्र बाधेमध्ये मरतुक होते.

कुरणामध्ये चरावयास जाणाऱ्या जनावरांना पावसाळ्यात विषारी सर्पदंशाचा धोका असतो.

पावसाळ्यातील व्यवस्थापन

पावसाळ्यात गोठा व परिसराची स्वच्छता, खाद्याची योग्य साठवण व आहार व्यवस्थापन, जंतनिर्मूलन, कीटक निर्मूलन व पावसाळा सुरू होण्यापूर्वी संसर्गजन्य रोगप्रतिबंधात्मक लसीकरण इत्यादी व्यवस्थापन बाबींवर लक्ष देऊन वेळेत पूर्तता केल्यास संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यास मदत होते.

गोठा स्वच्छता

जनावरे जास्त वेळ थंड वातावरणात राहिल्यास किंवा पावसात भिजल्यास घटसर्प, फुफ्फ्सदाहासारख्या आजारांना बळी पडू शकतात. गोठ्यातील चिखल व ओलाव्यामुळे कासदाह आजार दिसतो.

गोठ्यातील जमीन ही नेहमी ओलसर राहिल्यास किंवा चिखल झाल्यास जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढतो. वासरे व करडांना कोक्सिडिओसिस आजाराचा प्रादुर्भाव होतो.

गोठ्यातील जमीन कोरडी व स्वच्छ ठेवावी. जेणेकरून हगवण, कोक्सिडिओसिस तसेच दुधाळ जनावरांत कासदाह यांसारख्या आजारांना आळा घालता येईल.

गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. गोठ्यामध्ये जनावरांना आराम वाटेल एवढी जागा दिली पाहिजे. जनावरांची गर्दी टाळावी.

आहार

पावसाळ्यात मुबलक उपलब्ध आहे म्हणून बहुतांश पशुपालक जनावरांना फक्त हिरवा चारा देत असतात. चराऊ शेळ्या-मेंढ्यामध्ये कोवळा व लुसलुशीत चारा जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास आंत्रविषारसारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होतो. हगवण लागणे किंवा पोटफुगीसारखे आजार दिसून येतात.

पावसाळ्यात फक्त हिरवा चारा न देता त्यांच्या उत्पादकतेच्या गरजेनुसार संतुलित आहार देण्यात यावा. यामध्ये हिरवा चारा, सुका चारा, खुराक तसेच खनिजक्षार मिश्रण यांचा समावेश करावा. जेणेकरून आंत्रविषार, हगवण, पोटफुगी आजारावर मात करता येईल.

पावसाळ्याच्या दिवसांत खाद्यास ओलसरपणा येणार नाही किंवा बुरशी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.

जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नियमितपणे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी.

पावसाळ्याच्या दिवसांत दाट गवतामध्ये बऱ्याच वेळा जनावरांना सर्पदंश होतो. गोठ्याशेजारी स्वच्छता नसेल, अडगळीची जागा असेल तर निवाऱ्यासाठी गोठ्यात बांधलेली जनावरे सर्पदंशास बळी पडू शकतात.

पशुपालकाने जनावराला सर्पाने चावा घेतल्याचे पाहणे किंवा कुरणामध्ये चरताना जनावर एकदम भीतीने ओरडणे, उड्या मारणे किंवा जास्त अस्वस्थ होणे अशी लक्षणे आणि त्यानंतर दंश झालेल्या जागेवर (पायावर किंवा तोंडावर) सूज येणे, दंशाच्या ठिकाणाहून काही प्रमाणात रक्तस्राव होणे इत्यादी माहिती सर्पदंशाच्या प्राथमिक निदानात महत्त्वाची ठरते. रक्त तपासणी व रक्त गोठवण वेळ तपासणी करून त्यामध्ये रक्त गोठवणाऱ्या पेशींची संख्या कमी झाल्यास व रक्त गोठवण्यास जास्त वेळ (> २० मिनिटे) लागल्यास घोणस किंवा फुरसे सर्पदांशाचे निदान करता येते. सर्पदंशाची तीव्रता ठरवून पशुवैद्यकाकडून तत्काळ उपचार करून घ्यावेत.

कीटक निर्मूलन

अतिवृष्टीमुळे साचून राहणारे पाणी, दमट हवामान हे कीटकांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असते. पावसाळ्यात विविध प्रजातींच्या माश्या, डास, चिलटे, गोचीड, पिसवा अशा विविध कीटकांची उत्पत्ती जोमाने होत असते. हे कीटक पशुधनाच्या शरीरावर चावा घेऊन तसेच पशुधनाचे रक्त पितात. त्यांच्या चाव्यातून जनावरांना असह्य वेदना होतात. हे कीटक त्यांच्या चाव्यातून विविध जिवाणूजन्य, विषाणूजन्य तसेच प्रजीवजन्य आजारांचे संक्रमण निरोगी जनावरांत करतात.

गोवंश, म्हशीमध्ये सरा व गोचीड ताप यांसारख्या प्रजीवजन्य आजारांचे तसेच तिवा या विषाणूजन्य आजाराचे कीटकांमार्फत संक्रमण होते.

कीटकांपासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी गोठ्यामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोचीडनाशक फवारणी करावी.

गोठा परिसरात कोठेही पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे सूर्योदय आणि सूर्यास्त कालावधीमध्ये कीटकांचा जास्त त्रास होत असतो. त्यामुळे अशा वेळी गोठ्याच्या परिसरात कडुनिंब पाला आणि गोवऱ्या यांचा

धूर केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

जनावरांच्या अंगावर १ लिटर पाण्यामध्ये १० मिलि निंबोळी तेल, १० मिलि करंज तेल, १० मिलि निलगिरी तेल आणि २ ग्रॅम अंगाचा साबण यांचे मिश्रण फवारल्यास कीटकांचा प्रादुर्भाव टाळता येतो.

नवजात वासरांचे व्यवस्थापन

नवजात वासरे, रेडकू, करडांची बाहेरील वातावरणास समरूप होण्याची क्षमता ही प्रौढ जनावरांच्या तुलनेने कमी असते, त्यामुळे लहान जनावरे पावसात भिजल्यास किंवा थंड वातावरणाच्या जास्त वेळ संपर्कात आल्यास त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊ शकते, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन फुफ्फुसदाह व इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात लहान व नवजात वासरे, करडांना पावसात भिजू देऊ नये.

वातावरण जास्त थंड असल्यास आवश्यक उबदारपणा द्यावा. वासरे, करडे कोरडी ठेवावीत. गरजेप्रमाणे त्यांच्या शरीरावर संरक्षक कपडे घालावेत जेणेकरून थंड वातावरणात त्यांचे तापमान उबदार राखता येईल.

वासरांना एक आठवड्यानंतर जंतनिर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून जंतांचा प्रादुर्भाव टाळता येईल.

वासरे ३ ते ४ महिने वयाची झाल्यानंतर त्यांच्यामध्ये घटसर्प, फऱ्या यांसारख्या संसर्गजन्य आजारांप्रती लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून लहान वयातील पशुधनास प्रतिकूल वातावरण व विविध संसर्गजन्य आजारांपासून वाचवता येईल.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३, (सहायक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर), डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३, (संचालक, विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर मध्यम पावसाची हजेरी

Maharashtra Rain Alert : कोकणात मुसळधारेचा इशारा

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

SCROLL FOR NEXT