Orange Orchard
Orange Orchard  Agrowon
ॲग्रो गाईड

Orange Orchard Management : अमरावतीच्या योगेश झाडे यांनी केलंय उत्कृष्ठ संत्रा नियोजन

Team Agrowon

शेतकरी ः योगेश वसंतराव झाडे

गाव ः लोणी, ता. वरुड, जि. अमरावती

संत्रा लागवड ः साडेतीन एकर

एकूण झाडे ः ४७५

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या दोन तालुक्‍यांत राज्यातील सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्र आहे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असेही म्हटले जाते. याच भागात योगेश झाडे यांची साडेतीन एकर शेती असून, संपूर्ण क्षेत्रावर २००८ मध्ये संत्र्याची लागवड केली आहे.

त्यात ४७५ संत्रा झाडे असून, संपूर्ण लागवड १८ बाय १८ फूट अंतरावर आहे. सध्या झाडे १५ वर्षे वयाची झाली आहेत. गेल्या १० वर्षांपासून बागेत आंबिया बहराचे नियोजन केले आहे. नांगरट व इतर मशागतीच्या कामांमुळे झाडांच्या मुळांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे बागेत शून्य मशागतीवर भर दिला आहे. बागेतील तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला जातो.

सिंचन व्यवस्थापन

संत्रा बागेत कीड-रोग नियंत्रणामध्ये पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. पाटपाणी पद्धतीमुळे बागेत पाणी साचून राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागतो. त्यामुळे संपूर्ण लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

ठिबक सिंचन पद्धतीमुळे विद्राव्य खतांच्या मात्रा देणेही सोईस्कर ठरते. यामुळे वेळ आणि मजुरीवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होत असल्याचे योगेश झाडे सांगतात.

ठिबक सिंचनासाठी साधारणपणे दीडशे झाडांचे एक सर्किट समजले जाते. त्यानुसार एका सर्किटला एक वेळ ८ तास ठिबकद्वारे पाणी दिल्यानंतर पुन्हा १० दिवसांनी पाणी द्यावे लागते. जमिनीतील ओलावा आणि झाडाची पाण्याची गरज यांचा विचार करून सिंचन करण्यावर भर दिला जातो.

आंबिया बहर व्यवस्थापन ः

आंबिया बहरातील फळे घेण्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत बागेस ताण दिला जातो. डिसेंबर महिन्यात झाडांच्या वाळलेल्या फांद्यांची छाटणी केली जाते. छाटणीसाठी कात्रीचा (कैची) वापर केला जातो. छाटणी करताना झाडांना इजा होण्याची शक्यता असते.

त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा शिरकाव जखमा झालेल्या भागातून होण्याची शक्यता असते. त्यासाठी छाटणीची कामे पूर्ण झाल्यानंतर झाडांवर बोर्डो मिश्रणाचा फवारणीद्वारे वापर केला जातो.

बोर्डो मिश्रण द्रावणाची संपूर्ण झाडावर फवारणी करून झाड ओले केले जाते. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो. बागेत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, ब्ल्यू कॉपर सोबत कीटकनाशक मिसळले जाते. किडीचा प्रादुर्भाव नसल्यास फक्त ब्ल्यू कॉपरची फवारणी घेतली जाते.

साधारणपणे जानेवारी महिन्यात ८ तास ठिबकद्वारे पाणी देत बागेचा ताण तोडला जातो. ताण तोडण्यापूर्वी रासायनिक खतांचा बेसल डोस दिला जातो. जानेवारी महिन्यात ताण तोडल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांत फूट फुटण्यास सुरुवात होते.

या वर्षी वातावरणात सातत्याने मोठे बदल झाले आहेत. त्याचा फुटींवर परिणाम दिसून आला आहे. काही झाडांना जानेवारी अखेर तर काही झाडांना फेब्रुवारी महिन्यात फूट फुटली होती. त्यामुळे सध्या झाडांना लागलेली फळे ही कमी-अधिक आकाराची आहेत.

खत व्यवस्थापन ः

- वेळापत्रकानुसार डीएपी ७०० ग्रॅम, पोटॅश ३०० ग्रॅम आणि सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.

- दर महिन्याला ठिबकद्वारे युरिया २०० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे दिला जातो. याशिवाय आवश्यकतेनुसार मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम मात्रा दिली जाते.

- अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांवर तसेच पाने, फळे निस्तेज दिसून येतात. त्यासाठी १५ः१५ः१५ ठिबकद्वारे दिले जाते.

- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे पाहून सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.

- मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसाची स्थिती होती. पाऊस थांबल्यानंतर लगेच तापमान अचानक वाढल्यामुळे काही झाडांवर फळगळ दिसून आली. त्यासाठी ठिबकद्वारे युरियाचा डोस दिल्यानंतर फळगळ आटोक्यात येण्यास मदत झाली.

कीड-रोग व्यवस्थापन ः

- बागेत फूट निघताना प्रामुख्याने कोळी किडीसह फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. याशिवाय मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसतो. प्रादुर्भाव पाहून नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेण्यात आली.

- मार्च-एप्रिल महिन्यात बागेत कोळशी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या.

मागील आठवड्यातील कामकाज ः

- सध्या बागेत जानेवारी अखेर झालेल्या फुटीची फळे ही लिंबाच्या आकाराची आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ नोंदविण्यात आली. परिणामी, दुबार फूट झालेली आहे. ती फळे सध्या बोराच्या आकाराची आहे.

- वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या आहेत. त्यानुसार युरिया २०० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे मात्रा दिली आहे.

- कोळी किडीसह इतर किडींच्या प्रादुर्भाव दिसून आला. त्याच्या नियंत्रणाकरिता रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली आहे.

- फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बोर्डोपेस्ट वापर केला आहे.

- बागेत वाढलेल्या तणाचे नियंत्रण करण्याकरिता तणनाशकाची फवारणी घेतली आहे.

आगामी नियोजन ः

- पावसाळा सुरू होण्यापूर्वी डीएपी ७०० ग्रॅम, पोटॅश ३०० ग्रॅम आणि सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातील. साधारणपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातही हा डोस दिला जातो.

- सध्या बागेत पाणी व्यवस्थापनावर अधिक भर दिला आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. झाडांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घेतली जाईल.

- तापमान जास्त असल्यामुळे कोणतीही फवारणी केली जाणार नाही.

- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरिक्षण केले जाईल. प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर प्रादुर्भावाचे प्रमाण पाहून शिफारशीप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाईल.

काढणी, उत्पादन ः

साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून फळे काढणीस सुरुवात होते. संपूर्ण लागवडीतून सरासरी ६५ ते ७० टन संत्रा फळांचे उत्पादन मिळते. त्यास प्रतिटन साधारण ३० ते ३५ हजार रुपये दर मिळतो. संपूर्ण बाग व्यापाऱ्यांना देण्याचे नियोजन असते.

- योगेश झाडे, ९५९५१८३९६४ (शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

SCROLL FOR NEXT