Indian Agriculture: कॅफे पार्क ही तशी शहरातील संकल्पना! शहरात किंवा शहरापासून जवळच शांत निसर्गरम्य ठिकाणचे छोटे टुमदार रेस्टॉरंट म्हणजे कॅफे पार्क. शहरांतील धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून अशा ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात चहा, कॉफी, नाश्ता, जेवणाचा आनंद कॅफेमध्ये घेता येतो. त्यामुळे वेगवेगळ्या संकल्पनेवरच्या कॅफेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील कृषी पदवीधर शुभांकर पिंगळे या युवा शेतकऱ्याने ‘फार्म टू फोर्क’ या संकल्पनेतून ‘हायड्रोपोनिक कॅफे पार्क’ साकारला आहे. .प्रगत देशांतील अनेक शहरांमध्ये हॉटेल अथवा रेस्टॉरंट परिसरातच पिकविलेल्या ताज्या, रसायन अवशेषमुक्त फळे-भाजीपाल्यापासून विविध रेसिपी करून त्या ग्राहकांना खायला दिल्या जातात. आपल्या देशातही या संकल्पनेवर आधारित काही रेस्टॉरंट आहेत. याच धर्तीवर पिंगळे यांचा कॅफे फार्म आहे. पिंगळे मातीविना शेती तंत्रज्ञानातून विदेशी भाजीपाला पिकवून त्यापासून सलाड, सूप ते पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ तयार करून ग्राहकांना सर्व्ह करतात. त्यांच्या स्टार्ट अपमध्ये नव संकल्पना आहे, तंत्रज्ञान वापर आहे आणि मुख्य म्हणजे व्यावसायिकता देखील आहे..Maharashtra Startup Policy: पन्नास हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट.आज आपण पाहतोय शेती तोट्याची ठरत असल्याने अनेक तरुण शेतीकडे पाठ फिरवीत आहेत. गावात हाताला काम नसल्याने तरुणांचे लोंढे शहरांकडे वाहत आहेत. त्यामुळे गावे ओस पडत असून शहरांवर देखील ताण येत आहे. अशावेळी स्टार्ट अपच्या माध्यमातून शेतीवर आधारीत काही उद्योग-व्यवसाय सुरू करता येतो का, यावर गावांतील तरुणांनी विचार करायला हवा. अनेक सेवांबरोबर शेतीसाठी बॅकवर्ड-फॉरवर्ड लिंकेजेस मध्ये व्यवसायाच्या अनेक संधी दडल्या आहेत, त्याचा शोध तरुणांनी घ्यायला हवा..सेवा क्षेत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर शेतीचे यांत्रिकीकरण वाढत असताना ट्रॅक्टरसह यंत्रे-अवजारे दुरुस्तीपासून ते आधुनिक शेती तसेच बाजार सल्ला केंद्रे गावांत उभे राहू शकतात. शिवाय शेतीमालाचे ट्रेडिंग-मार्केटिंग, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री-निर्यात यामध्ये स्टार्ट अप सुरू केले जाऊ शकतात. आपल्या भागातील उपलब्ध संसाधने, सेवासुविधा आणि मार्केट पाहून नेमका कोणता उद्योग-व्यवसाय चालू शकतो, याचा युवकांनी अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायला हवा. स्टार्ट अपसह इतरही योजनांच्या माध्यमातून अशा उद्योग-व्यवसायाला शासनाची आर्थिक मदत तसेच अनुदान आहे. त्याचा लाभ देखील युवकांना घेता येऊ शकतो..Maharashtra Startup Policy: स्टार्ट अप : संधी अन् आव्हाने.नवीन कोणताही स्टार्ट अप अथवा उद्योग व्यवसाय सुरू करताना त्यातही शेतीप्रमाणेच जोखीम तसेच धोके आहेत, हेही युवकांनी लक्षात घेतले पाहिजे. अनेक उच्चशिक्षित तरुणांनी गावात येऊन मोठी गुंतवणूक करून स्टार्ट अप केले. परंतु ते पुढे फेल गेले आहेत. देशात स्टार्ट अपला शासनामार्फत प्रोत्साहन आणि निधीही दिला जात असताना त्यात आपण फारशी प्रगती करू शकलो नाही, त्याचे एक कारण मोठ्या प्रमाणात बंद पडलेले स्टार्ट अप आहेत..अशावेळी केवळ नव संकल्पनेच्या प्रेमात पडून उद्योग व्यवसाय सुरू करण्याऐवजी आपले मॉडेल हे व्यावसायिकतेच्या पातळीवर कितपत टिकणारे आहे, हे तरुणांनी पाहायला हवे. आपले व्यवसायिक मॉडेल हे टेस्टेड असेल तर अति उत्तम. शुभांकर पिंगळे यांच्या पाठीशी त्यांच्या वडलांनी सुरू केलेल्या ‘ग्रेप ॲम्बेसी’ स्टार्ट अपचा अनुभव होता. त्यातून त्यांनी पुढे कॅफे फार्मचा विस्तार केला हेही लक्षात घेतले पाहिजे. ग्रामीण भागात शेतीवर आधारित नवनव्या व्यवसाय संधी उपलब्ध होत असताना कोणाचेही अंधानुकरण न करता आपला अभ्यास, अनुभवावर आधारीत स्टार्ट अपमध्ये उतरायला हरकत नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.