रबी हंगामात (Rabi Season) घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा (Chana) हे महत्त्वाचे कडधान्य पीक (pulse Crop) आहे. हरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार आहेत. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये भरघोस वाढ झाली आहे. सन २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र २५.९४ लाख हेक्टर, उत्पादन २८.६६ लाख टन तर उत्पादकता ११०५ किलो प्रति हेक्टर अशी आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा २२.७३ % आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी हरभरा लागवड तंत्राविषयी पुढील माहिती दिली आहे.
- हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी, काळी, कसदार चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त जमीनीवर हरभऱ्याची लागवड करु नये.
- खरीपाचे पीक घेतल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हरभरा पिकाला कोरडे व थंड हवामान मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची अजिबात सोय नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २० सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावेत.
- बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ टाळल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.
सुधारित वाण कोणते वापरावे ?
- विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे वाढ मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहे.
- काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पिकेव्ही -२, पिकेव्ही - ४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत.
- फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्याचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता प्रसारित केला आहे.
सामान्यतः देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तीफणीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटर व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेऊन टोकन होईल असे ट्रॅक्टर वर चालणारे पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर करणे फायदेशीर आहे. या प्रकारे पेरणी केल्यास विजय व फुले विक्रम हरभऱ्याचे हेक्टरी ६५ ते ७० किलो तर विशाल, विजय, विराट किंवा पीकेव्ही २ या वाणांचे एकरी शंभर किलो बियाणे लागते. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. भारी जमिनीत ९० सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सेंटिमीटर अंतरावर एक एक बियाणे टोकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वाफशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.