Rural Story Agrowon
ॲग्रो गाईड

Rural Story : गावातली लोकं विहिरीच्या शेजारी का घुटमळतात?

सकाळी जाग आली तेव्हा दिवस चांगलाच वर आलेला. रात्री पिक्चर पाहून येताना चार मैल चाललेलेचा परिणाम होता. पण मी सोडून माडीवर कोणीच नव्हतं. सगळ्यांना कामं होती आणि त्याची जाण होती म्हणून सगळे लवकर उठून आपापल्या कामावर पळाले होते.

Team Agrowon

जयंत खाडे

Rural Story : सुट्टीचे दिवस चालू आहेत. सगळी पोरं पलूसकराच्या माडीवर जमतात. त्यात आज संध्याकाळी आष्ट्याला ‘गंमत जंमत’ पिक्चर पाहायला जायचं ठरलं. चार, पाच सायकली गोळा करून आठ-दहा पोरं मिळून डबल- ट्रिपलशीट सायकलने पिक्चरला गेलो.

त्यात आभाळ भरून आलेलं. कधी पाऊस झोडपंल, हे सांगता येत नाही. पाऊस उतरू दे, भिजू दे, पण तिकीट काढल्यानंतर पिक्चर पूर्ण बघायला मिळाला पाहिजे... हाच विचार सगळ्यांच्या मनात.

सगळी चुंगत सायकली चालवत फाट्यावर पोहोचली. पोलिस स्टेशनपुढून सगळी इमानदारीने चालत गेली आणि मधल्या वाटेने टुरिंग टॉकीजजवळ पोहोचली. पिक्चर तर दाखवला जाणार होता. तिकिटं काढून तंबूत सगळी बसली. पिक्चर भारीच होता.

रात्री एक वाजता पिक्चर सुटला. बाहेर पडलो तर गार गार वारे वाहायला लागले आणि थेंब पडायला सुरुवात झाली. पोरांनी पटापट सायकली काढल्या आणि गावाकडे दामटल्या. पोलिस स्टेशनपुढं पण पोरं सायकलीवरून उतरली नाहीत आणि नेमका त्याच वेळी अंधारात जोशी पोलिस रस्त्यावर उभा राहिलेला दिसला.

काहींनी पटापट उड्या मारल्या, तर काही जण त्याच्या पुढून पळाले. जोशी पोलिस शिट्टी मारून मागे लागला आणि त्याने दोन सायकली पकडल्याच. त्याने चाकातील हवा सोडून पुंगळ्या फेकून दिल्या. मग पावसात हवा गेलेली सायकल ढकलत चार मैल गावात पोहोचलो.

तोपर्यंत बराच वेळ झाला होता. पुढे आलेली पोरं निवांत झोपली होती. चालत आलेले घावंल त्याजागी पडली आणि घोरायला लागली.

सकाळी जाग आली तेव्हा दिवस चांगलाच वर आलेला. रात्री पिक्चर पाहून येताना चार मैल चाललेलेचा परिणाम होता. पण मी सोडून माडीवर कोणीच नव्हते. सगळ्यांना कामं होती आणि त्याची जाण होती म्हणून सगळे लवकर उठून आपापल्या कामावर पळाले होते.

मला लाजिरवाणे वाटायला लागले. दारातून खाली पाहिलं, तर पलुस्कर दादा पान चघळत बसलेले, कदमांच्या अण्णांचे दूध गोळा करून आष्ट्याला निघायची धांदल सुरू होती,

दाजी सकाळची गिऱ्हाईकं संपवून दुकानाच्या बाहेर टेकलेले, पुतळा आत्तीचा डंक खाट खाट करीत सुरू झालेला, पुणदीकरांची रस्त्यावरची बैलगाडी रानात गेलेली आणि गल्लीतल्या सगळ्या गोठ्यांतील जनावरे चरायला गेलेली.

सकाळचे नऊ वाजून गेलेले आणि उनं तापायला सुरुवात झालेली. आता इथे थांबायचे तरी किती वेळ? मी नुरा भैच्या भिंतीवरून खाली उतरलो आणि कोणी काही विचारायच्या अगोदरच भोसल्याच्या दारातून खालतीकडे गेलो आणि तिथून घरात आलो.

तर आक्का आणि म्हातारी आई दोघीच घरात, बाकीचे सर्व अपेक्षेप्रमाणे रानात गेलेली. आक्काने रात्री कुठे गेला होता? इतका उशीर झोपा कशा लागतात? अशी पट्टी सुरू केली. मी तसाच घरात गेलो, आत रांजण भरून ठेवला होता.

सकाळी सकाळी तळाला गेलेल्या आडाचे पाणी भरून ठेवले होते. आता हेच पाणी अंघोळीला खर्च होणे योग्य नव्हते. तोंड धुऊन, चूळ भरून टॉवेल व कपडे घेतले. आक्काने जेवण माळाला नेल्याचे सांगितले.

तसाच बाहेर पडलो. भरभर चालत तळ्याच्या कोपऱ्यावर आलो. तळ्याच्या बांधावरचा गुलमोहर छान बहरला होता. एक सुद्धा पान हिरवं राहिलं नव्हतं. सगळ्या झाडावर लाल रंगाचे कोंबडे पडलेले. मी दोन तुरे तोडून घेऊन तोंडात टाकले.

अनुशापोटी त्याची तुरट आंबट चव बरी लागत होती. पुढे कोपऱ्यापर्यंत आलो आणि कोणत्या वाटेने माळाला जावे याचा विचार करत जरा वेळ घालवला. वरच्या वाटेने गेलो, तर कैकाड्याच्या विहिरीवर पोरं भेटतील, तिथं अंघोळ करून जावे, असा विचार केला.

कोपऱ्यावर पिसाळाची म्हातारी कडेवर पिशवी घेऊन तरातरा येत होती. उघड्या पायाने तिला फोफाटा भाजत असावा. डोक्यावरचा पदर सरळ करण्यासाठी तिने पिशवी कंबरेवरून खाली घेतली आणि पिशवीचा बंध तटकन तुटला.

पिशवीतला डबा, माळवं, भोपळा आणि काहीबाई सगळीकडे पसरले. मी जाऊन तिचं साहित्य गोळा केले. डब्यात लोणी होतं, पण सुदैवाने डब्याचं टोपण घट्ट होतं म्हणून सांडलं नाही. म्हातारी लेकीकडे चालली होती. मी बसून पिशवीचा बंध गुंतवून कसाबसा ठीक केला.

तोपर्यंत वाड्यातला पंडादादा चालत चालत तिथे आले. त्यांनी म्हातारीला घरी यायला सांगितलं. बंध चांगला वाकळच्या दोऱ्याने शिवून देतो म्हणाले.

खोताच्या वस्तीवर बाहेर हरभरे भिजवून वाळत टाकलेले. अधू डोळ्याची म्हातारी जास्वंदीच्या अपुऱ्या सावलीत बसून राखत बसलेली. कोंबड्या एकेक दाणा टिपून पळत होत्या. त्यांचा पळताना फडफडल्याचा आवाज झाला की म्हातारी शुक शुक करायची. मला मजा वाटली. हळूच मीसुद्धा मूठभर हरभरे घेतले आणि एकेक दाणा चघळत पुढे आलो.

ऊन चांगलंच लागायला लागलं. हायस्कूलपर्यंत आल्यावर वस्तीवर बब्यादादा जरा भेटतो का म्हणून पाहिलं, तर तिथं कोणीच नव्हतं. दादा असता तर मग तासभर त्याला रात्रीच्या पिक्चरची स्टोरी सांगितली असती. मी खरं तर दादाची वाट पाहात बसणार होतो;

पण पुढे जयवंत्या बापूच्या घरात योट उठला होता. त्याची कजाग बायको जोरात भांडत होती. तसा बापू गरीब माणूस. त्याची-माझी चांगली मैत्री आहे. तो मला विमान कसे उडते, लाइट कुठून येते, समुद्र कुठे संपतो असले प्रश्‍व विचारतो.

उत्तर दिल्यावर खूप मोठं गुपित समजल्यासारखा त्याचा चेहरा होतो आणि मला गंमत वाटते. आता सुद्धा बापू माझ्याकडे बघत होता; परंतु त्याचा चेहरा ओशाळल्यासारखा झाला. कदाचित या महामायेला गप्प कसे करावे, याचे उत्तर मी द्यावे असे त्याला वाटत असावे.

तसेच पुढे ओलांडून आलो. रस्त्याकडेला यादवांची विहीर खोदायची चाललेली. गावातील पोरांनी काम घेतलेले. वरून खाली बघितले तर चांगली चाळीस फूट खुदाई झालेली. थोडे थोडे उमाळे दिसत होते.

यारीवरचा पोरगा खालच्या पोरांना शिव्या देउनच बोलत होता. खालची पण तशीच उत्तर देत होती. विहीर खुदाईचे काम म्हणजे फार धोकादायक. मग अशा कामांना कोण भेटणार? अशीच हुबलाक पोरं मिळणार.

तेवढ्यात, पका मळ्यातून पोरांना सरबत घेऊन आला. त्याची डिचकी घेऊन यारीवरील पोराने तोंडाला लावली. तोपर्यंत खालची पोरं जोरात ओरडली, एकाने तर खालून दगड मारला. यारीवाल्याने ‘गप्प बस नाहीतर घोटभर सुद्धा देणार नाही’ असा दम भरला.

मग तब्येतीत ढेकर देऊन त्याने तोंड पुसले. पकु घमीत खाली जायला बसला त्याने मला पण घेतलं. विहिरीत खाली जाताना खोल पाताळात गेल्यासारखं वाटायला लागलं. खालची पोरं एक एक घोट सरबत पिली, त्यात सुद्धा त्यांचे आचकट विचकट शिव्या सुरूच होत्या.

विहिरीत कडेला एक चांगला उमाळा लागला होता. मी ओंजळीने ते जिवंत पाणी पोटभर पिलो. नंतर उमाळ्याच्या शेजारी पारेने आणखी उकरले. पण मग कुठे पार बसली आणि उमाळा एकदमच कमी झाला. मला खजील वाटले आणि मी तयार केलेल्या ओबडधोबड पायऱ्यांवरून वर आलो.

आता कैकाड्याची विहीर जवळ आली होती, पण पोरं आलेली दिसत नव्हती आणि एवढ्या लवकर येण्याची शक्यता पण नव्हती. रस्त्यावर आंब्याची झाडं होती. काही झाडांना आंबे होते, तर काहींना एक पण नव्हता. एक खोबरी आंबा मला चांगला माहीत होता.

पण त्याच्या खाली शुभ्र धोतर, शर्ट घालून बाबा बसलेले. मग मी तसाच पुढे निघालो, तर त्यांनी हाताने बोलून मला एक आंबा दिला. मी वासानेच तो खोबरे आंबा असल्याचे ओळखले. मग तो मी दुपारी माळाला जेवणानंतर मीठ लावून खायला म्हणून खिशात ठेवला आणि विहिरीकडे वळालो.

आत गेल्यावर विहिरीवर लिंबाला पाठ लावून पाय पसरून संज्या बसला होता. शेजारी एखादा खपरी दगड मिळाला की पुढे वाकून, दात-ओठ खाऊन तो समोरच्या बाभळीवर पिवळी फुले खायला येणाऱ्या साळुंख्यांना मारत होता. मला जरा भीतीच वाटली. मला बघून तो म्हणाला,

‘पवायला आलास काय?’

‘होय.’

‘भाकरी घेऊन आलास काय?’

‘नाही.’

परत त्याने दगड मारणे सुरू ठेवले. मला थांबावे की जावे समजेना. तोपर्यंत आदिक पोखरवाटेच्या रानाकडून तिथे आला. आदिक पण रात्री पिक्चर बघायला आला होता, पण सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून दूध गोळा करून तो नांगरलेल्या रानात मोठे मोठे सड वेचायला आला होता. त्याला पण संज्याने भाकरी हाय का म्हणून विचारले.

आदिक भाकरी खाऊन पाणी प्यायला विहिरीवर आला होता. तरीपण संज्याने त्याचं फडकं सोडलं आणि डब्यात शिल्लक राहिलेले थोडे कोरड्यास तो पिला. त्याने मोकळा डबा आदिकला पाणी प्यायला दिला.

आदिकने विहिरीत उतरून पाणी पिले आणि संज्याला पण डबा भरून घेऊन आला. मी आदिकला पोहायला उतरूया का, असे म्हटले तर संज्या तरबत्तर होऊन म्हणाला की पाच पैसे दिल्याशिवाय अजिबात पोहायचे नाही. त्याचं ते तोंड वाकडे करून बोलणे बघून आदिक खो खो हसत परत निघाला आणि मी पण उठलो.

पुढे गवळ्याच्या मळ्याजवळ आलो तर आबा आंब्याच्या झाडाखाली निवांत बसलेले. आबांच्या पायाला प्लास्टर केलेले आहे. त्यांनी मला हाक मारली.

‘एवढ्या उन्हाचं का चाललाय?’

आबा इतके वयस्कर पण मला अहो जाहो करतात. मी त्यांच्या जवळ बसलो. आबा माझ्या अवताराकडे बघून ‘जरा स्वच्छ पाण्याने आंघोळ करा हौदावर, आणि न्याहरी करून पडा निवांत सावलीला’ असे म्हणाले. तर त्यांच्या नाती मक्याची उकडलेली कणसं चापलत माझ्याकडे बघून फिदीफिदी हसत होत्या. मग मी नाही म्हणालो आणि तिथून निघालो.

मधल्या वाटेला डोंगराच्या कडेने गंजीखान्यातील नुकताच लग्न झालेला नामा वाळलेले ढापे तोडायला आला होता‌. त्याच्याबरोबर त्याची बायको जळण गोळा करते. एकदम काडीसारखी काळीसावळी त्याची बायको खूपच लहान दिसते.

तिच्या हातातील हिरवा चुडा तिचं लग्न नुकतच झाल्याचे दाखवत होता, तर तिच्या काळ्याभोर हातावर उठलेले काट्याकुट्याचे ओरखडे, खपरी पाटीवर पोरांनी उभ्याआडव्या रेषा काढाव्यात तसे, तिची चित्तरकथा सांगत होते.

बऱ्यापैकी जळण गोळा करून बांधावर नामा उघड्या अंगाने कमरेला फाटका टॉवेल गुंडाळून गाढ झोपला होता. त्याचं खपाटीला गेलेले पोट थोडेसे वर-खाली होत होते. त्याची बायको शेजारी बारीक डोळे करून बोडक्या डोंगराकडे बघत होती.

कदाचित, नामानं बांधून आणलेली भाकरी खाल्ली असावी. तर ती मात्र तशीच उपाशी असावी. तिला पाहून रात्रीची पिक्चरमधली टोपी घातलेली वर्षा उसगावकरची प्रतिमा माझ्या मनातून झटकन उतरली.

पुढे आलो तर आता डोंगराच्या कडेने पडलेल्या बारक्या घळीतून ऊन चांगलंच लागायला लागलं. त्यात माझ्या चपलेचा अंगठा तुटला आणि त्या रस्त्याच्या बारीक वाळूत अनवाणी पाय पोळायला लागले. मग मी तशीच तुटकी चप्पल घातली आणि पाय ओढत पाटोळ्याच्या वस्तीजवळ आलो.

त्या मोकळ्या रानात मला मांजरं ओरडण्याचा आवाज आला. रुईच्या झाडाखाली नुकतीच जन्मलेली दोन मांजराची पिले होती. मी जवळ जाऊन पाहिले तर भाजणाऱ्या उन्हानं त्रस्त होऊन ती पिले क्षीण आवाजात ओरडत होती.

सकाळी सकाळी मळ्यातील कुणीतरी व्यालेल्या मांजरीची पिले सोडली असावीत. त्यांचे काय करावे मला समजेना. त्यांना तसेच ठेवून पुढे जाऊ वाटेना. मग त्या पिलांना हातात छातीबरोबर लपेटून पाय खरडत खरडत माळाला वस्तीवर पोहोचलो.

दिवस पुरता मध्यावर आला होता. सगळी दुपारची न्याहरी करून मिळेल त्या सावलीत कलांडली होती. पोरींनी काचपाण्याचा खेळ मांडला होता. माझ्याकडे पाहून सगळी ही काय बैदा घेऊन आला, असे विचारायला लागले. ‘‘मी माळावर सापडली,’’ म्हणून सांगितले.

तर ‘‘त्यांना हितं तर कोण सांभाळणार’’ म्हणून काकू विचारायला लागली. शेवटी तात्या म्हणाले ‘‘असू दे, जगंल तेवढं जगंल, सोड त्यांना खाली.’’ मी पिलांना सोडलं तर ती नाजुक पायांवर सगळीकडे आपल्या बापाचं छप्पर असल्यासारखे फिरायला लागली.

गव्हाणीच्या पुढे जाऊन त्यांनी भलेमोठे बैल पाहिले, गळ्यात ओढणं बांधलेल्या म्हशी पाहिल्या, पायमोडकी गरीब गाय पाहिली, शेळीच्या जवळ जाऊन तिला निरखले. सगळ्या गोतावळ्याला हायहॅलो केले. तात्यांनी डब्यात भिजवलेली भाकरीसुद्धा खाल्ली.

माझ्याकडे पाहून तात्यांनी जेवायच्या अगोदर पाटात पाणी भरून ठेवलेल्या बादलीने स्वच्छ आंघोळ करून घ्यायला सांगितले. प्रचंड भूक लागली होती. पण दोन मिनिटात आवरावे म्हणून पाटात दगडावर बसत बदाबदा पाणी अंगावर ओतून घेतले.

तापलेल्या शरीराला बरे वाटले का पोटातली भूक जास्त तडकली, हे मला समजले नाही. कसेबसे अंग पुसून बेटाखालीच जेवायला बसलो. एक घास खाल्ल्यावर जरा बरे वाटले आणि सगळा डब्बा संपवला, त्या वेळी जरा मन शांत झाले.

हळूहळू विचार करता समजले, नामाच्या बायकोला झोप का येत नसावी आणि संज्या साळुंख्याना दगड का मारीत होता, ते.

(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.) ९४२१२९९७७९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT