सुनील चावकेमोदी सरकारला घेरण्यासाठी नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांपुढे अनेक मुद्यांनी भरलेले ताट वाढून ठेवलेले आहे. पण त्याची व्यूहरचना ठरवून ती अंमलात आणण्यासाठी प्रादेशिक पक्षांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, अशी चिन्हे आहेत.संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी मजेत आणि विरोधक त्रस्त, असे चित्र दिसणार आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांपुढे अनेक मुद्यांनी भरलेले ताट वाढून ठेवलेले आहे. बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संपत आलेली मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (एसआयआर) प्रक्रिया, या प्रक्रियेच्या दबावाखाली विविध राज्यांमध्ये ‘बीएलओं’नी केलेली आत्महत्या, चार नव्या कामगार संहितांची अंमलबजावणी, हवेची गुणवत्ता ढासळून राजधानी दिल्लीचे झालेले गॅस चेंबर, बिहारसह विविध भाजपशासित राज्यात सुरु झालेले बुलडोझरपर्व, संसदेत 'वंदे मातरम्’ उच्चारण्यास केलेला मज्जाव, अरुणाचल प्रदेशावर चीनने केलेला दावा.लाल किल्ल्यापाशी झालेला १० नोव्हेंबरचा आत्मघातकी कारबॉम्ब स्फोट, १३१ वी घटनादुरुस्ती करुन केंद्रशासित चंडीगडमध्ये उपराज्यपालांची नियुक्ती करुन प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव, झुंडीकडून होणाऱ्या हत्येच्या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस उपायुक्तांकडून घ्यावी लागणारी परवानगी, असे अनेक चमचमीत मुद्दे विरोधी पक्षांपुढे असतील. विरोधकांनी या मुद्यांवरुन थयथयाट करुन संसदेच्या पंधरा दिवसांच्या कामकाजात व्यत्यय आणावा, गोंधळ घालून सभात्याग करावा आणि संसदेत जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ दिली नाही म्हणून सरकारचे प्रवक्ते आणि माध्यमांची दूषणे ओढवून आपली प्रतिमा आणखी बिघडवून घ्यावी, असा मोदी सरकारचा त्यामागचा उद्देश आहे. अशा सापळ्यात विरोधकांनी स्वतःहून चालत येऊन अडकून पडावे म्हणून सरकार आपल्या रणनीतीमध्ये निरंतर सुधारणा करीत आहे आणि विरोधी पक्षांनीही आजवर त्याबाबतीत अपेक्षाभंग केलेला नाही..Parliament Winter Session: संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरु होणार.संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही हीच मालिका कायम राहिली तर आश्चर्य वाटायला नको. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या राजकारणाचे बीजारोपण होणार आहे. परिणामी, ‘इंडिया आघाडी’तील बहुतांश घटक पक्ष काँग्रेसपासून दूर जात असल्याचे या अधिवेशनात बघायला मिळू शकते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बनर्जी ‘एसआयआर’ तसेच भाजपच्या आव्हानाला सामोरे जाण्याच्या बाबतीत सक्षम आहेत..तिथे तृणमूल काँग्रेसची मते विभाजित करण्याची काँग्रेसने खेळी केली, तरी ती भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी कदाचित पुरेशी ठरणार नाही. काँग्रेस-तृणमूल काँग्रेसदरम्यानचा संसदेतील समन्वय मोहुआ मोईत्रांपुरताच मर्यादित राहू शकतो. बिहारमधील काँग्रेसच्या अपेक्षित अपयशाने तमिळनाडूत सत्ताधारी द्रमुकला पुरते सावध केले आहे. त्यामुळे संसदेतील काँग्रेसच्या डावपेचांना मित्रपक्ष म्हणून द्रमुकची तोंडदेखली साथच अपेक्षित आहे. केरळ विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी भाजप-माकपची छुपी हातमिळवणी या अधिवेशनात बघायला मिळू शकते..Winter Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनास दिली मान्यता.पूर्वतयारीची झलकपाच राज्यांतील निवडणुकांच्या पूर्वतयारीची झलक या अधिवेशनात दिसणार आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला भाजपविरुद्ध लढताना काँग्रेसशीही दोन हात दूर राहावे लागणार आहे. अशा स्थितीत मोदी सरकारने विरोधी पक्षांना अधिवेशनात आक्रमक होण्यासाठी वाढून ठेवलेल्या मुद्यांच्या ताटातील नेमक्या कोणत्या मुद्यांना हात घालायचा हे काँंग्रेसला नव्हे तर एसआयआरच्या संकटाला सामोरे जात आपले अस्तित्व शाबूत राखू पाहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना ठरवावे लागणार आहे..या प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व यावेळी अर्थातच तृणमूल काँग्रेसकडे असेल. द्रमुक, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, पंजाबमधील आम आदमी पार्टी, केरळमधील सत्ताधारी डावी आघाडी, महाराष्ट्रातील शिवसेना-उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षांपुढे लोकसभा-राज्यसभेतील रणनीती ठरविण्याच्या बाबतीत दोन पर्याय असतील. एकतर संसदेतील कामकाजाच्या बाबतीत काँग्रेसला आपल्या अजेंड्यावर झुकण्यास भाग पाडणे किंवा काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेणे. विरोधी पक्षांची व्होटबँक खिळखिळी करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या ‘एसआयआर’च्या प्रक्रियेवरुन भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार जनतेच्या न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये कचाट्यात सापडले आहेत..Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध.त्याचवेळी ‘एसआयआर’ आणि ‘व्होटचोरी’वरुन अंशकालीन राजकारण केल्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही ‘इंडिया आघाडी’मध्ये आपली पत गमावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याऐवजी आता पुन्हा देशपातळीवर ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाचा पर्याय पुढे येऊ लागला आहे. संसदेत ‘एसआयआर’च्या विरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार, त्याला अन्य मित्रपक्षांची साथ मिळणार हे उघड आहे..पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या तीनशे खासदारांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या व्होटचोरी आणि एसआयआरचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरूनही बिहारमध्ये ‘एसआयआर’ची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. भाजप-जदयु-रालोआने २० वर्षांच्या सत्तेनंतरही ८३ टक्क्यांच्या आश्चर्यकारक स्ट्राईक रेटने बिहारच्या विधानसभेत बहुमत संपादन करीत विरोधी पक्षांना डिवचले आहे. ‘एसआयआर’चा विरोध करणाऱ्या काँग्रेसेतर विरोधी पक्षांचे मनोबल खचविण्यासाठी भाजप या विजयाचा हुकमाच्या एक्क्याप्रमाणे वापर करेल..... तर नव्या पर्वाची सुरुवातविरोधी पक्षांमधील मतभेदांचा फायदा उठवून चंडीगडमध्ये प्रशासकपदी उपराज्यपाल नेमण्यासाठी १३१ वी घटनादुरुस्ती, थेट परदेशी गुंतवणूक आणि खासगी क्षेत्राला संधी देणारे महत्त्वाचे अणुऊर्जा विधेयक, कार्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक, विमा कायदे दुरुस्ती विधेयक, कालबाह्य झालेले १२० कायदे रद्द करणाऱ्या विधेयकांसह सरकारी कामकाजाचा कार्यभाग साधून घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल. पण दिल्लीच्या हवेची पार बिघडलेली गुणवत्ता, या राजकारणापलिकडच्या विषयाने मोदी सरकारची कोंडी होऊ शकते..गरज पडेल तेव्हा दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत नाट्यमय सुधारणा कशी होऊ शकते, हे दोन वर्षांपूर्वी झालेल्या जी-२० देशांच्या शिखर परिषदेत दिसले होते. एअर प्युरीफायर ही चैनीची नव्हे तर गरजेची बाब झाली असून, त्यावरील जीएसटी शून्य करण्याची मागणी जोर धरणार आहे. अर्थात, राजधानीतील हवेची गुणवत्ता कितीही सुधारली तरी ‘घुसमट’ संपत नसते, याचा अनुभव दिल्लीकरांपेक्षा जास्त भाजप नेत्यांनाच येत आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे सहकार्य न घेता सत्ताधाऱ्यांना त्रस्त करण्यात इतर विरोधी पक्ष यशस्वी ठरल्यास राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकेल.(लेखक ‘सकाळ’च्या नवीदिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.