रेनिफार्म निमॅटोड - In Yellow रॅडोफोलस सुत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे केळी झाड मुळासकट कोलमडून पडते.- At Left रॅडोफिलस सूत्रकृमी - Right Down  Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Protection : सूत्रकृमी प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्या योग्य खबरदारी

मागील भागात मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड) आणि लिंबूवर्गीय पिकावरील सूत्रकृमी (सीट्रस निमॅटोड) बाबत माहिती घेतली. या भागात मूत्रपिंडीय सूत्रकृमी (रेनीफॉर्म निमॅटोड) आणि रॅडोफोलस सूत्रकृमी (बरोयिंग निमॅटोड) बाबत माहिती घेऊयात.

टीम ॲग्रोवन

१) मूत्रपिंडीय सूत्रकृमी (रेनीफॉर्म निमॅटोड) (Reniform Nematode) (Citrus Nematode)

उष्ण तथा समशितोष्ण कटिबंधात या सूत्रकृमी अधिक प्रमाणात आढळून येतात. महाराष्ट्रातही ही सूत्रकृमी विस्तृत प्रमाणात आढळते.

ओळख :- पूर्ण वाढलेली मादी मूत्रपिंडाच्या आकाराची असून ०.३८ ते ०.५२ मिमी लांब असते. शरीराचा भाग अर्धगोलाकार असून, त्यातून लहानसे टोक बाहेर आलेले असते.

- नर धाग्यासारखे लांब असून लांबी ३.३८ ते ०.४३ मिमी असते.

जीवनक्रम ः

- मादी चिकट पदार्थांच्या आवरणात अंडी घालते. अंडी ६ ते ९ दिवसांत उबवून त्यातून दुसऱ्या अवस्थेतील अळी बाहेर पडते.

- अळी साधारणपणे ११ ते १५ दिवसांत तीन वेळा कात टाकते. त्यानंतर तिचे पूर्ण वाढलेल्या मादीत रूपांतर होते. पूर्ण वाढलेली मादी ७-८ दिवस जगते.

- कृमींचा संपूर्ण जीवनक्रम पूर्ण होण्यास २४ ते २९ दिवस लागतात. तथापि, पिकांचा आणि जमिनीचा प्रकार, तापमान, ओलावा इत्यादींमुळे जीवनक्रमाच्या काळाची मर्यादा बदलते. नर १६ ते २० दिवस जगतो.

पिके : प्रामुख्याने कापूस, एरंडी आणि चवळी ही पिके या सूत्रकृमींना मोठ्या प्रमाणात बळी पडतात. याशिवाय द्राक्षे, केळी, पपई, भेंडी, बटाटा, टोमॅटो, वांगी, मूग, हरभरा, तूर इत्यादी पिकांवरही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

नुकसानीचा प्रकार ः

- पूर्ण वाढलेली मादी शरीराचा अर्धा भाग मुळांत खुपसून सुईसारखा अतिसूक्ष्म अवयवाने मुळांतून रस शोषण करते.

- पिकांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. मुळांचा रंग बदलून ती तपकिरी होतात.

- विद्यापीठात घेण्यात आलेल्या प्रयोगावरून या सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्यामध्ये ३२.५९, तूर पिकांत ३२.८४ आणि मूग पिकांत १९.०५ टक्के इतकी घट झाल्याचे आढळून आले. कृमींच्या प्रादुर्भावामुळे एरंडीतील तेलाचे प्रमाण कमी होऊन प्रतही ढासळते.

नियंत्रणाचे उपाय : - जमिनीची खोल नांगरणी व पिकांची फेरपालट करावी.

- निंबोळी पेंड हेक्टरी दीड ते दोन टन प्रमाणे जमिनीत मिसळल्यास प्रभावी नियंत्रण होते.

- तसेच सूत्रकृमीग्रस्त जमिनीत प्रथम फ्रेंच झेंडूची लागवड करावी. त्यानंतर इतर फळझाडे किंवा पिकांची लागवड करावी.

- फळबागेतील वाफ्यांवर झेंडूची लागवड करावी. जेणेकरून सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळला जाईल.

२) रॅडोफोलस सूत्रकृमी (बरोयिंग निमॅटोड) ः

या सूत्रकृमींचा प्रादुर्भाव १९८० मध्ये ठाणे व जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावर प्रथम आढळून आला. या सूत्रकृमींचा प्रादुर्भाव अत्यंत अल्प असल्याने अधिक नुकसानाची नोंद नव्हती. मात्र, मागील काही वर्षांपूर्वी शहादा (जि. धुळे) व अंकलखोप (जि. सांगली) येथे या सूत्रकृमींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला होता.

ओळख :

पूर्ण वाढलेल्या मादीच्या डोक्याचा भाग पसरट किंवा चपटा असतो. मादीची लांबी ०.६ ते ०.७ मिमी इतकी असून, ती दोऱ्यासारखी लांब असते.

जीवनक्रम ः

- अंडी, अळीच्या चार अवस्था व पूर्ण वाढलेला सूत्रकृमी असा सूत्रकृमींचा जीवनक्रम २० ते २५ दिवसांत पूर्ण होतो. जीवनक्रम पूर्ण होण्यास २४ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते.

- मादी प्रतिदिन ४ ते ५ अंडी या प्रमाणे एकूण ६० ते ७० अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या १० ते १३ दिवसांत अंडी घालण्यास योग्य होतात.

- प्रजननासाठी नर व मादी सूत्रकृमीची आवश्क्यता असते.

- जीवनक्रम पूर्ण होण्यास २४-३२ सें. तापमानामध्ये २०-२५ दिवस लागतात.

नुकसानीचा प्रकार ः

- अळी व मादी सूत्रकृमी मुळांमध्ये शिरून नुकसान करते.

- केळी झाडाची पाने पिवळी पडणे, झाडांची वाढ खुंटणे, खोड लहान राहणे आणि पूर्ण वाढ होण्यापूर्वीच झाड कोलमडून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

- मुळांच्या सालीवर गडद तपकिरी रंगाचे चट्टे पडलेले दिसतात. प्रादुर्भाव वाढेल तसे साल काळपट दिसू लागते.

- जास्त प्रादुर्भावामध्ये मुळाच्या सर्व बाजूच्या सालीवर खोलगट काळपट चट्टे पडतात. त्यानंतर मूळ तेथून मोडले जाते. परिणामी, अशी मुळे झाडांना आधार देऊ शकत नाहीत. त्यामुळे हलक्या वाऱ्याने किंवा धक्क्याने झाड मुळासकट कोलमडून पडते.

नियंत्रणाचे उपाय ः

- नियंत्रणासाठी सूत्रकृमी नाशकांचा वापर हा अति खर्चिक व अवघड आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब फायद्याचा ठरतो.

- सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे एकदल पिकांपेक्षा द्विदल पिके जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे केळीच्या पिकानंतर मका, ज्वारी, गहू, ऊस इ. एकदल पिके घ्यावीत.

- सूत्रकृमीग्रस्त जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरट करून दोन तीन महिने जमीन चांगली तापू द्यावी. जमिनीतील सूत्रकृमींच्या अवस्था उष्णतेने नष्ट होतात.

- सूत्रकृमीग्रस्त पिकांमध्ये झेंडूसारखे मिश्रपीक घ्यावे किंवा केळीनंतर संपूर्ण शेतामध्ये झेंडूची लागवड करावी.

- लागवडीसाठी वापरण्यात येणारे मुनवे सूत्रकृमी विरहित असल्याची खात्री करावी. प्रादुर्भावग्रस्त भागांतून लागवडीसाठी मुनवे आणण्याचे टाळावे.

- केळी लागवडीपूर्वी मुनवे खरडून घ्यावेत. त्यानंतर शेण काल्यात बुडवून नंतर लागवड करावी.

- लागवडीवेळी निंबोळी पेंड ३ किलो प्रति मुनवे प्रमाणे द्यावे. त्यानंतर लगेच पिकास पाणी द्यावे.

--------------------

- डॉ. चिदानंद पाटील, ९४२०२९१२५२, ९९२२०६१४७५

(लेखक डॉ. पाटील हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख, तर डॉ. पाळंदे या सहायक प्राध्यापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT