टीम ॲग्रोवन
जळगाव : खानदेशात अतिवृष्टीने पूर्वहंगामी कापूस, उडीद, ज्वारी पिकाची हानी झाली आहे. परंतु ताग, कोरडवाहू कापूस, आदी पिकांची स्थिती बरी आहे.
पिके जोमात असून, त्यांची चांगली वाढ झाली आहे. तागाची लागवड जळगाव जिल्ह्यात जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी काठी केली जाते.
खानदेशात सुमारे दीड हजार हेक्टरवर ताग पीक आहे. त्याची लागवड मागील १० वर्षात कमी झाली आहे. पण चोपडा, अमळनेर, जामनेर, भडगाव आदी भागांतही काही शेतकरी अजूनही तागाची लागवड करतात.
जुलैच्या अखेरीस लागवड झाली होती. पाऊसमान चांगले झाल्याने त्याची वाढही चांगली झाली आहे. कुठलीही फवारणी त्यात करावी लागलेली नाही.
अतिपावसातही त्याची कुठलाही हानी झालेली नाही. अत्यल्प खते व कमी खर्चात पीक वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान आहे.
मागील चार हंगाम पीक चांगले येत आहे. कारण पाऊसमान चांगले असून, मागील तीन हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही पाऊस झाला.
यंदाही सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला. आता फक्त एक वेळेस सिंचन करून पीक हाती येईल.
सध्या ताग पिकात फुले लगडली आहेत. शेंगा ऑक्टोबरच्या सुरवातीला पक्व होतील.
जमिनीत ओलावा असल्याने शेंगाही जोमात वाढतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.