डॉ. शरद जाधव, डॉ. पंकज मडावी, डॉ. तानाजी वळकुंडे
राज्यामध्ये रब्बी ज्वारी (Rabi Jowar) हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, बहुतांश लागवड (Jowar Sowing) ही पर्जन्यधारित असते. ओलिताची सोयी कमी असलेल्या भागामध्ये जिरायती पद्धतीने ज्वारी घेतली जाते. पुढील पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये ज्वारी व कडब्याचे दुपटीपेक्षा अधिक मिळते.
कोरडवाहू रब्बी ज्वारी लागवडीच्या पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये १०० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे. मूलस्थानी पाणी व्यवस्थापनामुळे ३० टक्के, जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाणांच्या वापरामुळे २५ टक्के, पेरणीनंतरच्या ओलावा व्यवस्थापनामुळे २० टक्के, अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे १५ टक्के आणि वेळीच केलेल्या पीक संरक्षणामुळे १० टक्के इतकी उत्पादनात वाढ होत असल्याचे निष्कर्ष आहेत.
१. मूलस्थानी जल व्यवस्थापन आणि पेरणी
-पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर ३.६० × ३.६० चौ. मी. आकाराचे वाफे तयार करावेत. सारा यंत्राने सारे करून घेतल्यानंतर बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार होतात. ट्रॅक्टरचलित यंत्राने एकावेळी (६.०० × २.०० चौ.मी.) आकाराचे वाफे तयार करता येतात. हे वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस आधी केल्यास परतीच्या पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवून घेता येईल. पेरणीवेळी वाफे मोडून पेरणी करावी. पुन्हा सारा यंत्राने गहू, हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड टाकावेत. यामुळे पेरणीनंतर पडणारा पाऊसही अडवून जिरवता येईल.
ज्वारीची पेरणी ४५ × १५ सें.मी. अंतरावर करावी. प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी काणी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधक (३०० मेश पोताचे) ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी. पेरणीसाठी दोन चाड्यांची पाभर वापरल्यास एकाच वेळी खत व बियाणे पेरता येते. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन तंत्रामुळे रब्बी ज्वारी उत्पादनात ३० टक्के वाढ होते.
२) सुधारित वाणांचा जमिनीच्या प्रकारानुसार वापर
महाराष्ट्रामध्ये ज्वारी हे पीक हलकी जमीन (२३ टक्के), मध्यम जमीन (४८ टक्के) व भारी जमिनीवर (२९ टक्के) अशा वेगवेगळ्या जमिनीवर घेतले जाते. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे सुधारित किंवा संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार शिफारशीत आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाणांचा वापर केल्यास उत्पादनात २५ टक्के वाढ होते.
अ.क्र. --- प्रकार --- वाण
१. --- हलकी जमीन (खोली ३० सें.मी. पर्यंत) --- फुले अनुराधा, फुले माउली
२. --- मध्यम जमीन (खोली ६० सें.मी. पर्यंत) --- फुले सुचित्रा, फुले माउली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी -३५-१
३. --- भारी जमीन (खोली ६० सें.मी. पेक्षा जास्त) --- सुधारित वाण : फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती. संकरित वाण : सी.एस.एच.१५ आणि सी. एस.एच.१९.
४. --- बागायतीसाठी --- फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्हीं.१८, सी. एस.एच १५, सी. एस.एच १९
५. --- हुरड्यासाठी वाण --- फुले उत्तरा, फुले मधुर
६. --- लाह्यांसाठी वाण --- फुले पंचमी
७. --- पापडासाठी वाण --- फुले रोहिणी
३) पेरणीनंतरचे व्यवस्थापन
अ) तण व्यवस्थापन ः पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा होते. त्यामुळे सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत पीक तणविरहित ठेवावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने, तर दुसरी कोळपणी ५ आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने करावी. तिसरी कोळपणी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. शेवटच्या कोळपणीवेळी कोळप्याला दोरी बांधल्यास पिकाच्या मुळांना मातीची भर दिली जाते. तसेच शेतात सऱ्या पडून, पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होते.
ब) संरक्षित पाणी ः कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. पेरणीनंतरचे केलेल्या ओलावा व्यवस्थापनामुळे उत्पादनात २० टक्के वाढ होते.
क) कोरडवाहू क्षेत्रात आच्छादनाचा वापर ः जमिनीतून ६०ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतात उपलब्ध तण, तुरकाट्या यांचे आच्छादन करावे. हे आच्छादन ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत केल्यास उत्पादनात १४ टक्क्यांपर्यंत वाढ होते.
४. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
अ) सेंद्रिय खत ः पूर्वमशागतीवेळी नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ टन (१० ते १२ गाड्या शेणखत) जमिनीत मिसळून द्यावे.
ब) जिवाणू खतांची बीजप्रक्रिया ः पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर व पी. एस. बी. जिवाणूसंवर्धक कल्चर प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे चोळावे.
क) रासायनिक खते ः जमिनीच्या प्रकारानुसार पुढीलप्रमाणे रासायनिक खतांची शिफारस केलेली आहे. कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती नत्र खताचा चांगला प्रतिसाद देतात. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सूत्रामुळे उत्पादनात १५ टक्के वाढ होते.
तक्ता : रब्बी ज्वारीसाठी रासायनिक खतांची मात्रा
जमिनीचा प्रकार --- रासायनिक खतांचे हेक्टरी प्रमाण (किलो/ हेक्टर)
०० --- कोरडवाहू --- बागायती
०० --- नत्र --- स्फुरद --- पालाश --- नत्र --- स्फुरद --- पालाश
हलकी --- २५ --- ०० --- ०० --- ०० --- ०० --- ००
मध्यम --- ४० --- २० --- ०० --- ८०* --- ४० --- ४०
भारी --- ६० --- ३० --- ०० --- १००* --- ५० --- ५०
( * ) बागायती जमिनीत नत्र दोन हप्त्यात (पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे.
५. पीक संरक्षण
अ) एकात्मिक कीडनियंत्रण ः रब्बी ज्वारीमध्ये खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि कणसातील अळ्या या महत्त्वाच्या किडी आहेत. त्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवण्यासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा वापर करावा.
मशागतीय तंत्रामुळे जमिनीतील सुप्तावस्थेत असलेल्या किडी व त्यांची अंडी इ. पक्षी व इतर कीटकभक्षकांकडून आणि वातावरणातील उष्णतेमुळे नाश होतो. कीटकांची संख्या मर्यादित राहते. त्यासाठी उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.
-ज्वारीचा कडबा जनावरांना खाण्यास देतेवेळी बारीक तुकडे (कुट्टी) केल्यास कोशाचा मोठ्या प्रमाणात नाश होतो.
-पुरेसा पाऊस पडल्यावर शक्य तितक्या लवकर (१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर) ज्वारीची पेरणी केल्यास खोडमाशीपासून पीक वाचवता येते. पिकांची फेरपालट हेही महत्त्वाचे ठरते.
-पेरणीपूर्वी बियाण्यास थायामेथोक्झाम (३०% एफ.एस.) १० मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (४८ % एफ.एस.) १० मि.लि. अधिक २० मि.लि. पाणी प्रति १ किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.
-पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी साधारण १० टक्क्यांपर्यंत पोंगे मर आढळून आल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत झाल्याचे समजून खोडकिड नियंत्रणाचे उपाय करावेत. त्यासाठी, क्विनॉलफॉस (२५ % ई.सी.) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात १ किंवा २ फवारण्या कराव्यात.
ब) रोगनियंत्रण
-प्रमुख रोग ः खडखड्या, पानावरील करपा, तांबेरा, चिकटा आणि कणसातील काणी.
-काणी रोगाच्या नियंत्रणासाठी, पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक (८० डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति किलो ही प्रक्रिया करावी.
- खडखड्या रोगाच्या प्रादुर्भावास जमिनीतील पाण्याची कमतरता आणि जास्त उष्णतामान अनुकूल असते. त्यासाठी विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण असल्यास पिकास एखादे पाणी द्यावे. त्याच प्रमाणे पेरणीनंतर चौथ्या आठवड्यात सेंद्रिय आच्छादन (हेक्टरी ५ टन तूरकाड्या) केल्यास खडखड्या रोगामुळे ताटे लोळण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी होते. धान्य उत्पादनात १४ टक्क्यांनी वाढ होते.
-करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी करावी.
-वेळीच केलेल्या पीक संरक्षणामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते.
उत्पादन
या पंचसूत्रीचे काटेकोर पालन केल्यास कोरडवाहू ज्वारीचे हेक्टरी हलक्या जमिनीवर ८ ते १० क्विंटल, मध्यम जमिनीवर २० ते २५ क्विंटल, भारी जमिनीवर २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळू शकते. तर बागायती ज्वारीचे ३० ते ३५ क्विंटल उत्पादन मिळते. कोरडवाहू क्षेत्रात धान्यापेक्षा दुप्पट तर बागायतीत अडीच ते तीन पट कडब्याचे उत्पादन मिळते.
डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०
(विषय विशेषज्ञ -कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर)
टीप- बीजप्रक्रिया करण्यापूर्वी त्यास यापूर्वी कोणत्या रासायनिक घटकांची प्रक्रिया झाली आहे ते तपासावे. त्यानुसार वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.