Fish Farming
Fish Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Fish Framing : तंत्र गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाचे...

Team Agrowon

किरण वाघमारे, डॉ.शरद सुरनर

क्षारपड जमिनीत मत्स्य व कोळंबी संवर्धन (Shrimp Farming) तळी तयार करण्यास चांगला वाव आहे. कालवे, तलाव किंवा शेतजमीन यातील पाझर किंवा नैसर्गिक झरे यामुळे पाणथळ बनलेल्या जमिनी आणि पडीक जमिनीमध्ये मत्स्यसंवर्धनास वाव आहे.

गो ड्या पाण्यात वाढणाऱ्या झिंग्यापैकी, मॅक्रोबीनियम, रोझेनबर्गीय व मालकोमसोनी या प्रमुख व जलद वाढणाऱ्या जाती आहे. रोझेनबर्गी झिंग्याला महाझिंगा म्हणून ओळखला जातो. या जातीच्या झिंग्याचे बीज समुद्राच्या खाडीतून तसेच हॅचरीद्वारे डिसेंबर- जानेवारी आणि जुलै-ऑगस्ट या महिन्यात मिळू शकते. शुद्ध झिंगा शेती व मासळी बरोबर मिश्र पद्धतीने करता येते.

गोड्या पाण्यातील संवर्धन

सध्या अस्तित्वात असलेल्या गोड्या पाण्याच्या तलावात कटला व रोहू माशांबरोबर संवर्धन म्हणजे मिश्र संवर्धन.

सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा नवीन तलाव खोदून, गोड्या पाण्याच्या तलावात कोळंबीचे संवर्धन म्हणजे एक जातीय संवर्धन.

मचूळ पाण्यात (क्षारता ४ ते ५ भाग प्रति हजारी) कोळंबी संवर्धन.

तलावासाठी जमीन निवड

कोळंबी शेतीतील यश हे बऱ्याच अंशी सुयोग्य जागेच्या निवडीवर अवलंबून असते. नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव पाटबंधारे तलाव जलाशय यांचे जलक्षेत्र मत्स्यशेतीसाठी उपलब्ध आहे.

पाणी आणि रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि पिकांची फेरपालट न करणे त्यामुळे जमिनी क्षारपड बनतात. त्यात पीक घेता येत नाही. अशा क्षारपड जमिनीत मत्स्यसंवर्धन तळी तयार केल्यास मत्स्योत्पादन तर मिळतेच त्याबरोबरच सभोवतालच्या जमिनीतील क्षार कमी होऊन त्या परत पिकाखाली आणता येतात असा मत्स्यसंवर्धकांचा अनुभव आहे.

क्षारपड जमिनीत मत्स्य व कोळंबी संवर्धन तळी तयार करण्यास चांगला वाव आहे. कालवे, तलाव किंवा शेतजमीन यातील पाझर किंवा नैसर्गिक झरे यामुळे पाणथळ बनलेल्या जमिनी आणि पडीक जमिनीमध्ये मत्स्यसंवर्धनास वाव आहे.

तलाव बशीसारखा उथळ व तळ साफ असलेला असावा. त्यांचे जलविस्तार क्षेत्र अर्धा ते पाच हेक्टरपर्यंत असावे. पाण्याची खोली किमान ६ फूट किमान दहा महिने असावी. यापेक्षा उथळ तळी/गाळाने भरलेली तळी खोदून घ्यावीत, दुरुस्त करावीत.

तळ्यातील पाणी खूप तापत असल्यास काठावर झाडे लावावीत, मात्र त्यामुळे सूर्यकिरणे पाण्यात शिरण्यास अडथळा होणार नाही असे पाहावे.

तळ्याच्या पाण्याचा आम्लता निर्देशांक ७.००पेक्षा कमी आणि ८.५ पेक्षा अधिक नसावा.

तळ्याच्या पाणलोट क्षेत्रातील जमीन अगर बुडीत क्षेत्र शेतीच्या दृष्टीने सुपीक असावे. पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण ४ भाग प्रति दशलक्ष (४ पी.पी.एम) पेक्षा अधिक असावे.

पाणी घेण्याची व सोडण्याची सोय असावी.तळ्यात झाडोरा / जलवनस्पती असू नयेत.

तलावाची जागा शक्यतो सपाट आणि सखल भागातील असावी. पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात व वेगाने येणारे नसावे.

माती

पाणी टिकवून ठेवणारी माती म्हणजे पाझर न होणारी किंवा पाझर कमी असेल अशी असावी. म्हणजे चिकण माती आणि गाळ यांचे एकूण प्रमाण ५० टक्के पेक्षा अधिक असावे.

वाळूचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत चिकणमातीचा थर देऊन धुमसल्यास पाण्याचा निचरा कमी होतो. माती आम्लधर्मी असू नये. मातीत चुनखडीचे प्रमाणदेखील अधिक असू नये. शेतीसाठी उपयुक्त अशी माती असावी.

भूपृष्ठाखाली १० फुटापर्यंत खडक किंवा मुरूम नसावा.

पाणी पुरवठ्याची सुविधा आणि दर्जा

बारमाही पुरेशा पाणी पुरवण्याची सुविधा जागेवर किंवा जवळपास उपलब्ध असावी त्यातून मिळणाऱ्या पाण्याचे गुणधर्म खालील प्रमाणे असावेत.

आम्लता निर्देशांक: ७.५ ते ८.५ इतका असावा.

विद्राव्य प्राणवायू ४ भाग प्रति दशलपेक्षा अधिक असावा.

तापमान १५ अंश ते ३५ अंश सेल्सिअस असावे.

पारदर्शकता : पाण्यात तरंगणाऱ्या कणामुळे सूर्यप्रकाश अडला जाऊन प्राथमिक अन्न उत्पादन कमी होते. म्हणून तरंगणाऱ्या कणामुळे पाण्यास गढूळपणा येत नसावा. तर तो प्लंवगामुळे आलेला असावा.

प्रदूषण ः मत्स्यशेतीसाठी घ्यावयाचे पाणी प्रदूषण मुक्त असावे. म्हणजे त्यात कारखान्याचे सांडपाणी, कीटकनाशके, वनस्पती रोग निवारक द्रव्ये वापरली जात असतील अशा शेतातील पाणी त्यात मिसळत नसावे.

अन्य सुविधा : जागेवर विद्युत पुरवठा, दळणवळण सुविधा, रस्ते, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध असाव्यात.

वरील बाबी विचारात घेऊन केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात जाग मत्स्यशेतीस उपयुक्त ठरल्यास तलाव खोदकामाचे नकाशे व खर्चाचे अंदाजपत्रक सक्षम स्थापत्य अभियंत्याकडून तयार करून घ्यावे. मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली तलाव खोदकाम पूर्ण करावे.

संगोपनासाठी तळ्याचे खोदकाम

मत्स्यशेतीसाठी जागेची निवड झाल्यावर पुढील बाबी विचारात घेऊन मनुष्यबळ, बुलडोझर, पोकलॅनचा (जेसीबी) वापर करून तळ्याचे खोदकाम पूर्ण करावे.

खोदाईपूर्वी जागेवरील झाडे, झुडपे मुळांसह काढून टाकावीत.

सुलभ व्यवस्थापनासाठी तळ्याचा आकार आयताकृती असावा. साधारणपणे लांबी रुंदीच्या दीड ते दुप्पट ठेवावी. त्यातील जलविस्तार ०.४ ते १ हेक्टर इतका मिळत असावा.

तळ्यात किमान ५ ते ६ फूट पाणी सतत राहील अशी खोदाई करावी. खोदाई सोईस्कर व्हावी म्हणून पाऊस संपल्यावर लगेच किंवा हिवाळ्याच्या सुरवातीस खोदकामास सुरुवात करावी. तलावाचे कोपरे अर्ध वर्तुळाकार असावेत.

तळ्याचे बांध

पुराचे पाणी येत असेल तर पुराच्या सर्वोच्च पातळीपेक्षा तळ्याचे बांध दोन फूट उंच असावेत.

बांध टिकविण्यासाठी त्यांना उतार देणे आवश्यक आहे. हा उतार बांधासाठी वापरावयाच्या मातीच्या प्रकारावर अवलंबून असतो. चिकणमाती किंवा गाळाची माती असल्यास उतार १:२ प्रमाणात आणि रेताड असल्यास १:३ प्रमाणात असावा.

तळ्याच्या बांध मध्याची रुंदी किमान १ मीटर ठेवावी. बांध दबून उंची कमी होत असल्यामुळे १५ टक्के उंची अधिक जास्त ठेवावी.

पुराचे पाणी येत असेल तर मजबुतीसाठी दगडी पिचिंग करावे.

बांधाच्या मजबुतीसाठी त्यावर हरळीसारखे गवत उगवू द्यावे. त्यामुळे धूप कमी होते.

बांधाची उंची

पाण्याच्या पातळीपेक्षा अर्धा मीटरने अधिक ठेवावी. बांध घालण्यापूर्वी त्याखालील दीड फूट खोल आकाराचा घेर काढून तो चिकण माती / काळ्या मातीने भरून धुमसून घ्यावा.

बांध बांधताना तळ्यातील निघणारी माती अर्धा फूट उंचीची होताच पाणी शिंपडून धुमसासाठी अर्ध्या अर्ध्या फुटांनी बांधाची उंची कमी करत न्यावी.

पाणी घेण्याची सोय

उन्हाळ्यात पाणी जमिनीतून पाझरण्याचे आणि बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे येणारी तूट भरून काढण्यासाठी नजीक भरपूर पाणी असणारी विहीर, कालवा, धरण, नाला किंवा कूपनलिका इत्यादी सोय असावी.

तळे भरण्यासाठी गुरुत्वाकर्षणाने नेहमी पाणी घेता यावे.

नजीकच्या नदी, विहीर, धरण, नाला किंवा कालवा यातून विद्युत पंप/ इंजिन बसवून पाणी तळ्यात घेता यावे. पाणी पुरवठा करणाऱ्या मार्गावर बारीक आसाची जाळी बसवावी किंवा गाळप कक्ष तयार करावा.

पाणी सोडण्याची सोय

जिथे शक्य आहे तिथे विशेषतः निव्वळ कोळंबी संवर्धनासाठी तळातून तळ्यातील पाणी काढून टाकता येईल अशी व्यवस्था करावी.

किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(किरण वाघमारे हे सहायक आयुक्त (मत्स्य व्यवसाय) पुणे येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत. डॉ. शरद सुरनर हे मत्स्य तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT