Tomato Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Tomato Disease : टोमॅटोमधील शारीरिक विकृती लक्षणे, उपाय

टोमॅटो पिकामध्ये प्रामुख्याने फळ लागल्यानंतर शारीरिक विकृतींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे फळांवर चट्टे पडणे, फळांचा रंग बदलणे, फळ तडकणे इत्यादी समस्या दिसून येतात. अशावेळी शारीरिक विकृतीची योग्य ओळख पटवून योग्य उपाययोजना अवलंब करावा.

टीम ॲग्रोवन

योगेश भगुरे, डॉ. बबिता खाची, डॉ. विलास घुले

वातावरणातील बदल (Climate Change), अन्नद्रव्यांची कमतरता (Nutrient Deficiency) इ.मुळे भाजीपाला पिकांमध्ये (Vegetable Crop) शारीरिक विकृती अधिक दिसून येते. प्रामुख्याने कमी-जास्त तापमान, जास्त पाऊस किंवा पावसाचा खंड, अन्नद्रव्यांची कमतरता, जमिनीतील कमी- जास्त ओल इत्यादी कारणांमुळे शारीरिक विकृती दिसते. बऱ्याच वेळा कीड-रोगांचा प्रादुर्भाव (Pest Disease Outbreak) आणि शारीरिक विकृती यांची लक्षणे ओळखणे कठीण जाते. अशावेळी कीड-रोगांचा प्रादुर्भाव समजून फवारणीद्वारे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होतो. मात्र योग्य परिणाम मिळत नाहीत. त्यासाठी विविध शारीरिक विकृतीची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे.

फळ तडकणेे (फ्रूट क्रॅकिंग)

ही विकृती टोमॅटो पिकांत जास्त प्रमाणात आढळते. फळे पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त ऊन, अचानक जास्त पाऊस किंवा जास्त सिंचन या कारणांमुळे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे टोमॅटो फळे तडकतात. तसेच बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरता, आनुवंशिक गुणधर्म इत्यादी कारणांमुळेदेखील ही समस्या दिसून येते.

उपाययोजना

लागवडीपूर्वी माती परीक्षण करून त्याआधारे अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.

लागवडीसाठी प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा. उदा. अर्का सौरभ, अर्का विशाल, पुसा केसरी इ.

लागवडीसाठी गादीवाफा आणि ठिबक सिंचनाचा वापर करावा.

सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.

बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ०.५ ते १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

फळांवर चट्टे पडणे

कडक उन्हामुळे टोमॅटो फळांवर पांढरट चट्टे पडतात. नंतर तो भाग सुकतो. अशा फळांना कमी दर मिळतो.

उपाय

लागवडीसाठी जास्त फांद्या व दाट पाने असलेल्या जातींची निवड करावी.

फळे सावलीत राहतील अशाप्रकारे बांधणी करावी.

कीड व रोगांचा वेळीच बंदोबस्त करावा. म्हणजे पानगळ होणार नाही.

फळे आतून पोकळ होणे

या विकृतीमध्ये फळांची बाहेरून वाढ सामान्य असते. परंतु आतमध्ये फळे पोकळ होतात. गर कमी असतो. ती वजनाला हलकी असतात. उत्पादनात घट येते.

जास्त तापमान, योग्य प्रकारे परागीभवन न होणे इत्यादी कारणांमुळे ही विकृती होते.

उपाय ः खतांचा संतुलित वापर करावा.

अतिरिक्त सिंचन टाळावे.

कॅटफेस

यामध्ये फळांचा आकार मांजराच्या तोंडासारखा होतो. पिकाला फुले लागण्याच्या अवस्थेत थंड व ढगाळ वातावरण असेल तर ही समस्या दिसून येते.

उपाय ः स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर या विकृतीचे आपोआपच नियंत्रण होते.

कळीच्या शेवटी सडणे (ब्लोझम एन्ड रॉट)

या विकृतीमध्ये सुरवातीच्या काळात फळाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगाचा ठिपका दिसून येतो. ठिपक्याचा आकार वाढत जाऊन नंतर तो भाग कुजतो.

उपाय ः खतांचा संतुलित वापर करावा

आवश्यकतेनुसार चिलेटेड कॅल्शिअम ०.५ ते १ ग्रॅम किंवा कॅल्शिअम क्लोराइड २ ते २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.

तिरंगा (ब्लॉची रायपनिंग)

फळे परिपक्व होत असताना ती हिरवट पांढरी व लालसर दिसू लागतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या विकृतीला ‘तिरंगा’ या नावाने ओळखले जाते.

ढगाळ हवामान, थंड, धुकेयुक्त वातावरण, रिमझिम पाऊस इत्यादी कारणांमुळे ही विकृती दिसून येते.

उपाय ः लागवडीसाठी पुसा सदाबहार, अर्का वरदान, पुसा रोहिणी इ. वाणांचा वापर करावा. माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.

ग्रीन किंवा यलो शोल्डर

फळाचा वरील भाग न पिकता पिवळा, हिरवा रंग दिसून येतो. फळाच्या आतील भागदेखील पिवळा किंवा हिरवा राहतो.

पालाशची कमतरता, तापमानातील तफावत, मातीमध्ये कॅल्शिअम-मॅग्नेशिअम गुणोत्तर जास्त असणे, अतिरिक्त नत्राचा वापर, जास्त आर्द्रतायुक्त हवामान, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे ही विकृती दिसून येते.

उपाय ः माती व पान, देठ परीक्षण करून अन्नद्रव्यांचा संतुलित विशेषतः पालाशचा योग्य वापर करावा. विषाणूजन्य रोगांचे वेळीच नियंत्रण करावे.

- योगेश भगुरे, ९९२२४१४८७३ (सहायक प्राध्यापक, के.डी.एस.पी. कृषी महाविद्यालय, जि. नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT