Sri Lanka Organic Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Sri Lanka Organic Farming : श्रीलंकेची सेंद्रिय शेती : प्रचार आणि वास्तव

नव्वदीतील क्युबाप्रमाणे श्रीलंका या आर्थिक संकटातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. माध्यमांनी बेजबाबदारपणे निर्माण केलेल्या प्रपोगंडानुसार सेंद्रिय शेती हे या आर्थिक संकटाचे कारण मुळीच नाही. श्रीलंका बऱ्याच काळापासून रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरत आहे. त्यामुळे त्यांची माती, पाणी आणि आरोग्य खराब झाले आहे. श्रीलंका रासायनिक शेतीमुळे श्रीमंत झाली नाही; याउलट त्या देशाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. कोविडमुळे श्रीलंकेच्या आर्थिक संकटात आणखी वाढ झाली आणि अर्थव्यवस्था कोसळली. श्रीलंकेने सेंद्रिय शेतीचा निर्णय घेतला कारण त्यांच्याजवळ रासायनिक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर खर्च करायला पैसे नाहीत.

टीम ॲग्रोवन

के. पी. एलियास

श्रीलंकेचा सेंद्रिय शेतीचा (Sri Lanka Organic Farming) निर्णय हा सगळीकडेच ‘हॉट टॉपिक’ झाला आहे. या निर्णयावर होणाऱ्या बऱ्याच चर्चांतून, सेंद्रिय शेतीमुळेच श्रीलंकेची अर्थव्यवस्था (Sri Lanka Economy) डुबली, असा प्रचार होतो आहे. श्रीलंकेच्या सेंद्रिय शेतीच्या निर्णयाची जनमानसात एवढी धास्ती बसवल्या गेली आहे की एखाद्याने धाडसी निर्णय घेतला तर त्याला ‘तुझी श्रीलंका होईल’ असे मस्करीत म्हटले जाते.

श्रीलंकेच्या डुबत्या अर्थव्यवस्थेमुळे रासायनिक खते आणि कीटकाशके उत्पादक कंपन्यांना सेंद्रिय शेतीला बदनाम करण्यासाठी आयते कोलित सापडले आहे. सेंद्रिय शेती विरोधी प्रचार करण्यासाठी श्रीलंकेचे उदाहरण सरसकटपणे सगळीकडे वापरले जात आहे. एखाद्या निर्णयाच्या अनेक बाजू असतात; पण सगळ्या गोष्टींना पांढरे आणि काळे बघण्याची सवय असलेल्या लोकांनी श्रीलंकेच्या निर्णयाची एकच बाजू उचलून धरली आहे. श्रीलंकेची आजची परिस्थिती कशामुळे उद्‍भवली हे समजून घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत.

श्रीलंकेच्या सेंद्रिय शेतीच्या निर्णयावर टीका करताना सेंद्रिय शेती कष्टकरी लोकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आणि अकार्यक्षम आहे, अशी मांडणी करण्याचा प्रयत्न होतो आहे. शेतीसाठी लागणाऱ्या ज्या विषारी निविष्ठांमुळे जैवविविधता नष्ट होते, समाजाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि पिकांच्या जातींमधली विविधता संपुष्टात येते, त्या निविष्ठांना पर्याय उभे करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसताना सरकारने कीटकनाशक आणि खतांच्या आयातबंदीचा घेतलेला निर्णय कठोर आणि मूर्खपणाचा ठरवणारी मांडणी केली जाते आहे.

बऱ्याचदा सेवांचे असमान वितरण, नैसर्गिक संसाधनांचे खासगीकरण आणि अकार्यक्षम एकसुरी पीकपद्धती जबरदस्तीने स्वीकारायला लावणे याला पुष्टी देण्यासाठी ‘संधी’, ‘उपलब्धता’ आणि ‘नावीन्यता’ या मोठमोठ्या उक्तींचा वापर केला जातो; ज्यातून खरे तर कष्टकरी शेतकऱ्यांना धोका आहे. श्रीलंकेतील जमिनीवरील परिस्थिती या गृहीतकांच्या विरोधात आहे आणि या प्रदेशातील अन्न विदेशी आणि कॉर्पोरेट प्रभावापासून कसे मुक्त होऊ शकते याचे आशावादी चित्र रंगवणारी आहे.

श्रीलंकेत कोविडने मार्च २०२० मध्ये शिरकाव केला. सरकारने लावलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधामुळे पर्यटन उद्योग पूर्णपणे ठप्प झाला. श्रीलंकेबाहेरून येणाऱ्या सगळ्या फ्लाइट्स १७ मार्चपासून रद्द करण्यात आल्या. या निर्बंधामुळे श्रीलंकेतील सगळ्या मालाची निर्यात थांबली. यामुळे उद्योग क्षेत्रावर प्रचंड मोठा परिणाम झाला. श्रीलंकन रुपयाची (LKR) मार्चपासून घसरण सुरू आहे. ज्यामुळे जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी काढाव्या लागणाऱ्या कर्जापोटी परकीय चलनाचा बोजा वाढला.

कोविड येण्याआधीसुद्धा श्रीलंका आर्थिक संकटाच्या गर्तेत होता. चीनने श्रीलंकेत केलेल्या प्रचंड मोठ्या आर्थिक गुंतवणुकीतून मोठं संकट निर्माण झालं आहे. याला भरीस भर २१ एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या ईस्टर दहशतवादी हल्ल्यामुळे श्रीलंकेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली होती. जवळपास २५० लोक या हल्ल्यामध्ये मारले गेले. परकीय चलनाची आवक रोडावली होती. या सगळ्यामुळे श्रीलंकन रुपयात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली. २०१८ मध्ये १६२ रुपये असलेली किंमत २०१९ मध्ये १७८ रुपये झाली. कोविडमुळे हे संकट आणखी वाढलं.

२०२० च्या मे महिन्यापर्यंत आणखी घसरण होऊन ही किंमत १९० पर्यंत पोहोचली. श्रीलंकेत पर्यटन उद्योगातून सुमारे ३० लाख लोकांना रोजगार मिळतो आणि या उद्योगाचा देशाच्या जीडीपीमध्ये पाच टक्के वाटा आहे. कोविडमुळे पर्यटन उद्योगाला भयानक फटका बसला. देशातील सुमारे ३१.६ % लोकांनी आपले उत्पन्नाचे साधन गमावल्याची माहिती युनिसेफ आणि यूएनडीपीने मे २०२० मध्ये घेतलेल्या टेलिफोनिक सर्व्हेमधून समोर आली आहे.

सुमारे ६५ % कामगारांनी आपला रोजगार गमावला आहे. याप्रमाणेच वर्ल्ड व्हिजन श्रीलंका यांनी केलेल्या अभ्यासात ९३ % लोकांवर कोविड निर्बंधांचा परिणाम दिसतो आहे. ४४ % लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोविडच्या निर्बंधामुळे अनेकांचे मासिक वेतन २४,४०० श्रीलंकन रुपयांवरून घसरून ६८०० रुपये झाले आहे. लोकांना स्वस्त आणि कमी पोषण-मूल्य असलेले अन्न खाण्यास भाग पाडले गेले ज्यामुळे त्यांची अन्न सुरक्षा धोक्यात आली.

सरकारी हस्तक्षेप

श्रीलंका सरकारने कोविडमुळे रोजगार गमावलेल्या नागरिकांना थेट आर्थिक साह्य करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल २०२० मध्ये श्रीलंका सरकारने ५४ लाख कुटुंबांना प्रत्येकी ५००० श्रीलंकन रुपयांचे आर्थिक साह्य केले, तर मे महिन्यात ५७ लाख कुटुंबांना मदत केली. या अर्थसाह्यासाठी सरकारने ५५० कोटी रुपये खर्च केले. श्रीलंकेतील ६६ % कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचली. या काळात नागरिकांकडून होणारी कर वसुलीसुद्धा थांबवण्यात आली. महसुलात होणारी घट आणि वाढता खर्च यामुळे सरकारवरील कर्जात प्रचंड वाढ झाली.

श्रीलंका सेंद्रिय शेतीकडे वळण्याची कारणे

माध्यमांमध्ये जे चित्र रंगवले गेले, तसे सेंद्रिय शेतीचा निर्णय एका रात्रीत घेण्यात आला नव्हता. या निर्णयामागे अनेक कारणे होती. बऱ्याच काळापासून श्रीलंकेत यासंबंधी वेगवेगळ्या चर्चा घडून येत होत्या. कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे यासंदर्भातील घडामोडींनी वेग घेतला. ‘श्रीलंकेचे भाताचे आगार’ अशी ओळख असलेल्या उत्तर मध्य भागातील शेतकऱ्यांमध्ये १९९० पासून गंभीर स्वरूपाचे किडनी आजार आढळून येत होते.

श्रीलंकेमध्ये मागील २० वर्षांत अंतर्गत संघर्षामुळे जेवढे लोक मारले गेले त्यापेक्षा जास्त लोक किडनीच्या आजारात मृत्युमुखी पडले आहेत. या आजारामुळे जवळपास २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४५ हजार लोक गंभीर अवस्थेत आहेत. उत्तर मध्य भागातील अनुराधापुरा आणि पोलोनारुवा जिल्ह्यांत ३० हजार ५६६ रुग्ण आहेत. हा आजार प्रामुख्याने ४० ते ६० या वयोगटातील लोकांना होतो.

जागतिक आरोग्य संघटना आणि श्रीलंकेच्या आरोग्य मंत्रालयाने २००९ मध्ये या आजाराचे कारण शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला. ज्या भागात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त आहे, तेथील जमीन, पाण्याचे आणि रुग्णांच्या रक्त, लघवीचे नमुने तपासण्यात आले. या अभ्यासाचा निष्कर्ष यायला तब्बल तीन वर्षे लागली. लोकांच्या दबावामुळे जून २०१२ मध्ये श्रीलंकेचे आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने कॅडमियम आणि आर्सेनिक ही विषारी रसायने या आजाराचे कारण असल्याचे घोषित केले. ही रसायने अन्नातून रक्तात प्रवेश करतात असे सांगण्यात आले; पण स्रोताचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही.

त्याच वेळेस केल्या गेलेल्या स्वतंत्र अभ्यासातून रासायनिक खते आणि कीटकनाशकांमधून कॅडमियम आणि आर्सेनिक ही रसायने सापडत असल्याचे समोर आले. (बीबीसी न्यूज, कोलंबो, १३ डिसेंबर २०१३) ही बातमी पसरायला लागल्यावर तिचे दूरगामी परिणाम झाले. श्रीलंकेतील रासायनिक उद्योगांची लॉबी याच्या विरोधात उभी राहिली. कृषी रसायन क्षेत्रातील २६ कंपन्यांनी घेतलेल्या एकत्रित पत्रकार परिषदेत हा अभ्यास शंकास्पद ठरवण्यात आला. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अन्न आणि कृषी संघटना (FAO) यांनी सांगितलेल्या मात्रेतच रसायनांची शिफारस केली आहे, अशी मांडणी करण्यात आली. हा अभ्यास कृषी क्षेत्राला संपवण्यासाठीचा छुपा प्रयत्न असल्याचा आरोप केला गेला.

पण जे खरं आहे ते फार काळ लपवून ठेवता येत नाही. श्रीलंकेच्या राजरत्न विद्यापीठातील वैज्ञानिक चण्णा जयसुमाना यांनी २०१५ मध्ये किडनी आजारांची कारणे आणि निदान यावर एक अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासात रासायनिक कीटकनाशकांसोबत रासायनिक खतेसुद्धा किडनी आजाराला कारणीभूत असल्याचे आढळून आले. (स्फुरदयुक्त खते ही किडनी आजाराने ग्रस्त भागातील आर्सेनिकचा मुख्य स्रोत आहेत.

(Channa Jaysunama et al) या अभ्यासाचा भाग म्हणून, रासायनिक खतांचे २२६ आणि कीटकनाशकांचे २७३ नमुने विद्यापीठाच्या दोन प्रयोगशाळांत पाठवण्यात आले. या अभ्यासात जवळपास सगळ्याच रसायनांमध्ये आर्सेनिकचे अंश आढळले. ट्रिपल सुपरफॉस्फेट या स्फुरदयुक्त खतामध्ये सगळ्यात जास्त (३१ mg/kg) आर्सेनिकचे अंश आढळले. श्रीलंका प्रत्येक वर्षी एक लाख टन ट्रिपल सुपरफॉस्फेट या खताची आयात करत असे, ज्यात २१०० किलो आर्सेनिक असायचं. आणि ते लोकांपर्यंत मुख्यतः पाणी आणि अन्न याद्वारे पोहोचत होतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT