Summer Season Agrowon
ॲग्रो गाईड

Summer Sowing Season : नियोजन उन्हाळी हंगामाचे...

उन्हाळी हंगामात पीकवाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडल्यास उत्पादन घट येण्याची शक्यता असते. त्यासाठी कमी कालावधीत येणाऱ्या योग्य जातींची निवड करावी.

डॉ.आदिनाथ ताकटे

Summer Sowing Season : उन्हाळी हंगामात पीकवाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडल्यास उत्पादन (Agriculture Production) घट येण्याची शक्यता असते. त्यासाठी कमी कालावधीत येणाऱ्या योग्य जातींची निवड करावी. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने बाजरी, मूग, भुईमूग (Groundnut), सूर्यफूल (Sunflower), कलिंगड, खरबूज या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

या पिकांच्या लागवडीसाठी जमीन, योग्य पीक पद्धती, पेरणी (Summer Sowing) पद्धती, सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया (Seed Treatment), खत व्यवस्थापन यांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून उन्हाळी हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन मिळेल.

भुईमूग ः

१) लागवडीसाठी मध्यम, भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची १२ ते १५ सेंमी एवढीच खोल नांगरट करावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. त्यामुळे काढणीवेळी झाडे उपटताना किंवा वखराने काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते.

२) पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणी करताना उपट्या जातींसाठी दोन ओळीत ३० सेंमी तर दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे. निम पसऱ्या जातींसाठी ४५ बाय १० सेंमी अंतर ठेवावे.

बियाणे प्रमाण ः (प्रमाण ः प्रति हेक्टर)

१) कमी आकाराचे दाणे असलेल्या जाती ः १०० किलो
२) मध्यम आकाराचे दाणे असलेल्या जाती ः १२५ किलो
३) टपोरे दाणे असलेल्या जाती ः १५० किलो.

जाती ः

१) एसबी ११, टीएजी-२४, टीजी-२६, जेएल-५०१, फुले ६०२१ ः बियाणे प्रति हेक्टरी १०० किलो.

२) फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी-४१, फुले उनप, फुले भारती ः बियाणे प्रति हेक्टरी १२५ किलो.

३) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक २५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत
सुकवावे. नंतर पेरणी करावी

खत व्यवस्थापन ः

१) पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत कुळवणीवेळी मिसळावे.
२) पेरणीवेळी नत्र २५ किलो, स्फुरद ५० किलो अधिक जिप्सम ४०० किलो प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी पेरणीवेळी जिप्समची अर्धी मात्रा (२०० किलो) आणि उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना द्यावी.
३) मध्यम काळ्या जमिनीत अधिक उत्पादन, पाणी व खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी पूर्वमशागतीवेळी व शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे.
४) शिफारस खत मात्रेच्या १०० टक्के खते (हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून नऊ समान हप्त्यात द्यावे.

महत्त्वाच्या पीक अवस्था ः

१) फुले येण्याची अवस्था (पेरणीपासून २२ ते ३० दिवस)
२) आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून (४० ते ४५ दिवस)
३) शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५ ते ७० दिवस)
४) या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

बाजरी ः

१) मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी.जमिनीची १५ सेंमी खोल नांगरणी करावी. कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून कुळवणी करावी.

२) पेरणी १५ फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करावी. दोन चाडाच्या पाभारीने ३० सेंमी बाय १५ सेंमी अंतरावर पेरणी करावी. पेरणी २ ते ३ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये. पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे पुरेसे होते.

जाती ः

संकरित जाती ः आदिशक्ती, फुले महाशक्ती, जेएचबी ५५८.
सुधारित जाती ः धनशक्ती, आयसीएमव्ही-२२१
- अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी, २० टक्के मिठाच्या द्रावणाची (१० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे.)

बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.अझोस्पिरीलम किंवा ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन ः

पेरणी करताना नत्र, स्फुरद आणि पालाश प्रत्येकी ४५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. उर्वरित ४५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी खुरपणी केल्यानंतर द्यावे.

सूर्यफूल ः

१) मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. मध्यम खोल जमिनीत ४५ सेंमी बाय ३० सेंमी तर भारी जमिनीत ६० सेंमी बाय ३० सेंमी पेरणी करावी.
२) संकरित आणि जास्त कालावधीच्या जातींची ६० सेंमी बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.
३) दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. म्हणजे एकाच वेळी बियाणे व खत पेरता येते. बियाणे ५ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर पेरू नये.
४) बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.
५) पेरणीसाठी सुधारित जातीचे हेक्टरी ८ ते १० किलो तर संकरित जातीचे हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे.

जाती ः

१) सुधारित ः फुले भास्कर,भानू, एस एस ५६.
२) संकरित ः केबीएसएच ४४, फुले रविराज, एमएनएफएच १७
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास मर रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम २ ते २.५ ग्रॅम त्यानंतर ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅमची प्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन ः

१) पेरणीवेळी नत्र ३० किलो, स्फुरद ६० किलो व पालाश ६० किलो द्यावे. उर्वरित नत्राची मात्रा खुरपणी झाल्यानंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये हेक्टरी २० किलो गंधक पेरणीवेळी शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

तीळ ः

१) मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, वालुकामय, पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओल असल्यास पीक चांगले येते.
२) पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.३० सेंमी बाय १५ सेंमी किंवा ४५ सेंमी बाय १० सेंमी अंतरावर करावी.
३) पेरणीवेळी २.५ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर बी पडणार नाही याची काळजी घ्यावी. बी आकाराने लहान असल्याने पेरणीवेळी बियाणांमध्ये वाळू, राख, माती किंवा शेणखत मिसळावे. हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे लागते.

जाती ः

जेएलटी ४०८-२ (फुले पूर्णा), एकेटी- १०१ (९० ते ९५ दिवस)

प्रति किलो बियाणास थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम ची प्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर व पीएसबी प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन ः

१) पूर्वमशागतीवेळी शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
२) पेरणीवेळी २५ किलो नत्र आणि उर्वरित २५ किलो नत्र २१ दिवसांनी द्यावे.
३) अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात असताना आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत २ टक्के युरियाची फवारणी करावी.
४) फुले येण्याच्या आणि बोंडे येण्याच्या काळात सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.

महत्त्वाच्या बाबी ः

१) योग्य वेळी पेरणी करावी.
२) पेरणीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.
३) पेरणीपूर्वी शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
४) एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
५) योग्य वेळी आंतरमशागत करावी.
६) कीड,रोग नियंत्रणासाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.
७) पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

संपर्क ः डॉ.आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, (मृदशास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT