Rabi Jowar Agrowon
ॲग्रो गाईड

Rabi Crop Management : कोरडवाहू ज्वारी, हरभरा लागवडीचे नियोजन

रब्बी हंगामात मध्यम ते खोल जमिनीत ज्वारी, करडई, हरभरा आणि सूर्यफूल ही महत्त्वाची पिके जमिनीत साठवून ठेवलेल्या ओलाव्यावर घेतली जातात. सर्वसाधारणपणे कोरडवाहू रब्बी हंगामातील पेरणी १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. कोरडवाहू क्षेत्रात पेरणी वेळेवर होणे अतिशय महत्त्वाचे असते.

डाॅ. आदिनाथ ताकटे

कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे नियोजन (Dry Land Crop Planning) करताना उत्पादनवाढीच्या दृष्टीने विविध सुधारित तंत्रज्ञानाचा (Improve Agriculture Technology) वापर करण गरजेचे आहे. निचरा आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जमिनीत जास्तीत जास्त प्रमाणात कसे मुरवता येईल आणि त्या ओलाव्याचा उपयोग कोरडवाहू पीक उत्पादनवाढीच्या दृष्टीने करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत पडलेल्या पावसावर रब्बी पिकांचे उत्पादन (Rabi Crop Production) अवलंबून आहे. रब्बी हंगामात मध्यम ते खोल जमिनीत ज्वारी, करडई, हरभरा आणि सूर्यफूल (sunflower Crop) ही महत्त्वाची पिके जमिनीत साठवून ठेवलेल्या ओलाव्यावर घेतली जातात.

१) कोरडवाहू क्षेत्रात पिकांची पेरणी वेळेवर होणे अतिशय महत्त्वाचे असते. उशिरा पेरणी झाल्यास (ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात) २५ ते २८ टक्क्यांनी उत्पादन घटते. त्यामुळे जमिनीत योग्य वाफसा येताच १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी पूर्ण करावी. अवर्षण प्रवण भागात अवर्षणाचा कालावधी लहान-मोठा नेहमीच असतो, म्हणूनच अवर्षणाचा ताण सहन करू शकणाऱ्या, कमीत कमी कालावधीत येणाऱ्या जातीची निवड करावी.

रब्बी ज्वारी:

१) हलक्या जमिनीत (खोली ३० सें.मी पर्यंत) फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली या जातींची निवड करावी.

२) मध्यम जमिनीत (खोली ६० सेंमी.पर्यंत) फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माउली, परभणी मोती, मालदांडी ३५-१ या जातींची निवड करावी.

३) भारी जमिनीत (खोली ६० सेंमी.पेक्षा जास्त) फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-२२, पीकेव्ही-क्रांती, परभणी मोती आणि संकरित जाती ः-सीएसएच १५, सीएसएच १९, या जातींचा वापर करावा.

४) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेष) प्रक्रिया करावी. त्यामुळे काणी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

५) पेरणी १५ सप्टेंबरच्या अगोदर किंवा १५ ऑक्टोबरनंतर केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून ज्वारीची पेरणी योग्य वेळी करावी.

६) पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरावी. एकाच वेळी खत व बियाणे पेरावे. कोरडवाहू क्षेत्रात ४५ × १५ - २० सेंमी अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी १० ते १२ बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते.

७) कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या जमिनीत पेरणी करते वेळी हेक्टरी एक गोणी युरिया द्यावा. मध्यम खोल जमिनीमध्ये दीड ते दोन गोणी युरिया आणि अडीच गोणी स्फुरद द्यावे. भारी जमिनीस अडीच गोण्या युरिया आणि साडेतीन गोण्या स्फुरद द्यावे. कोरडवाहू जमिनीमध्ये संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.

८) बागायती क्षेत्रातील मध्यम खोल जमिनीमध्ये तीन गोण्या युरिया, पाच गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट व एक ते सव्वा गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. नत्र दोन हप्त्यांत, पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.

करडई :

१) पिकास मध्यम ते भारी (खोल) जमीन निवडावी. ४५ सेंमी पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. शेतात पाणी साठवून राहिल्यास पीक वाढीवर परिणाम होतो.

२) एसएसएफ- ७०८, फुले करडई-७३३, फुले चंद्रभागा (एसएसएफ-७४८), पीबीएनएस-१२ या जातीची निवड करावी. पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.

३) कोरडवाहू क्षेत्रात पेरणी ४५ × २० सेंमी अंतरावर करावी, त्यासाठी १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर किंवा २५ ग्रॅम ॲझोस्पिरिलम आणि २५ ग्रॅम पीएसबीची प्रक्रिया करावी.

५) पेरणी करते वेळी प्रति हेक्टरी ५० किलो नत्र आणि २५ किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. कोरडवाहू पेरणी करताना प्रति हेक्टरी दोन गोण्या युरिया, तीन गोणी सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. बागायती पिकास अडीच गोणी युरिया व साडेतीन गोणी सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा द्यावी. खते दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत.

हरभरा

१) मध्यम ते भारी काळी कसदार, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडून नये.

२) कोरडवाहू क्षेत्रात जेथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. विजय आणि दिग्विजय जातीची निवड करावी. बागायती पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान करावी.

३) पेरणी ३० × १० सेंमी अंतरावर करावी. विजय, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत या जातींची निवड करावी. या जाती मर रोगास प्रतिकारक्षम आहेत. या जाती जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. प्रति हेक्टरी ६५ ते ७० ते १०० किलो बियाणे पुरेसे होते.

४) पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे तासभर सावलीत वाळवून त्यानंतर पेरणी करावी.

५) पेरणीपूर्वी कुळवाच्या शेवटच्या पाळीच्यावेळी हेक्टरी २५ किलो नत्र,५० किलो स्फुरद, ३० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. यासाठी एक गोणी युरिया, सहा गोणी सिंगल सुपर फॉस्फेट, एक गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे किंवा अडीच गोणी डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने द्यावे.

सूर्यफूल :

१) लागवडीसाठी फुले भास्कर, भानू या जातींची निवड करावी.

२) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम आणि ५ ग्रॅम इमिडाक्लोप्रीडची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

२) हलक्या ते मध्यम जमिनीत ४५ × ३० सेंमी आणि भारी जमिनीत ६० × ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी. पेरणीकरिता १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते.

३) पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. बियाणे ५ सेंमीपेक्षा जास्त खोल पेरू नये.

४) कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद,२५ किलो पालाशची मात्रा द्यावी. यासाठी पेरणी करतेवेळी दोन गोण्या युरिया, तीन गोणी सिंगल सुपर फॉस्फेट व एक गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक शेणखतातून द्यावे.

कोळपणी महत्त्वाची...

१) रब्बी हंगामातील पिकांमध्ये कोळपणीचा महत्त्वाची आहे. एक कोळपणी केली म्हणजे पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. कोरडवाहू रब्बी ज्वारीमध्ये तीन वेळेस कोळपणी करावी.

२) पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

३) दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात, त्या कोळपणीमुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते.

४) तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्यांचे झाले असता दातेरी कोळप्याने करावी. दातेरी कोळपे मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. त्या वेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्या वेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.

संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृद्‍ शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT