डॉ. आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके
Late Kharif Crop : या वर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. तसेच वितरणात अजूनही तफावत दिसून येत आहे. काही ठिकाणी सुरुवातीच्या पावसानंतर पेरण्या (Sowing) झाल्या, परंतु काही भागात पावसाचा खंड दिसून येत आहे. हे लक्षात घेता पीक पद्धती आणि व्यवस्थापनात बदल आवश्यक आहे.
सध्याच्या काळात पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. अद्याप काही ठिकाणी पाऊस झाला नसल्याने पेरणीयोग्य पाऊस होण्याची (७५ ते १०० मिलिमीटर) वाट पाहावी. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
१) प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. चांगली उगवणक्षमता असलेले दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीन, तूर किंवा सरळ वाण असलेल्या पिकामध्ये घरचे बियाणे वापरू शकतो. यासाठी घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी (कमीत कमी ७० टक्के असावी). बीजप्रकिया करूनच पेरणी करावी. रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.
२) योग्य अंतर आणि खोलीवर पेरणी करावी. सोयाबीनची ५ ते ६ सेंमीपेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये. हेक्टरी योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे.
३) खतांची मात्रा ही शिफारशीनुसार किंवा त्यापेक्षा २५ टक्क्यांनी कमी द्यावी. नत्राचा वापर कमी करावा. सेंद्रिय खते उदा. चांगले कुजलेले शेणखत, गांडूळ खत, निंबोळी पेंड, कंपोस्ट खताचा वापर करावा. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.
४) रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रिय खताचा वापर करावा जेणेकरून जमिनीचे जैविक, भौतिक व जैविक गुणधर्म राखण्यास मदत होईल, आवश्यक जिवाणूंची संख्या वाढेल, सेंद्रिय कर्ब वाढेल.
५) कीड, रोग नियंत्रणासाठी नियमित सर्व्हेक्षण करावे. कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर करावा. यामध्ये सापळा पिके, जैविक कीटकनाशक, आंतर पीक पद्धती, पक्षिथांबे, विविध प्रकारचे सापळे वापरावे.
६) पावसाचा दीर्घकालीन खंड असल्यास, जमिनीतील ओलावा कमी झाल्यास तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा पिकानुसार वापर करावा.
कोरडवाहू शेतीमधील व्यवस्थापन ः
१) आज ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे परंतु पावसाने ओढ दिली आहे अशा ठिकाणी त्वरित तुषार सिंचन, ठिबक सिंचनाद्वारे किंवा एक आड एक सरी पाणी द्यावे.
२) पीक १५ ते २१ दिवसांचे झाले असल्यास परिस्थितीनुसार हलकी कोळपणी करावी, मातीची भर द्यावी.
आंतरमशागतीमुळे पिकांना मातीची भर दिल्यास ओलावा टिकून राहतो, हवा खेळती राहते, तणांचे नियंत्रण होते, पिकांना वाढीसाठी फायदा होतो.
३) पिकांना फवारणीतून अन्नद्रव्ये देता येतात. ओलावा कमी असल्यास किंवा इतर परिस्थितीमुळे पिकांची वाढ समाधानकारक नसल्यास पिके ३० दिवसांच्या आत असल्यास पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) ०.५ टक्के (५० ग्रॅम दहा लिटर पाणी), ३० ते ६० दिवसांच्या पिकांवर पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) १ टक्का (१०० ग्रॅम दहा लिटर पाणी) आणि ६० दिवसांच्या पुढे पावसाचा खंड आल्यास पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) २ टक्के (२०० ग्रॅम दहा लिटर पाणी) फवारावे.
४) केओलीन या बाष्परोधकाची (६ ते ७ टक्के) फवारणी करावी.
५) जलसंधारणासाठी पिकामध्ये ठराविक अंतरावर सऱ्या काढाव्यात. कपाशी, तूरसारख्या पिकांमध्ये एक किंवा दोन ओळींनंतर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीनसारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळींनंतर सुरुवातीची खुरपणी/कोळपणी झाल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी बळिराम नांगराने १५ सेंमी खोल सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी
मुरते. त्याचा लाभ पिकाला पुढील कालावधीसाठी किंवा पुढील रब्बी पिकासाठी होतो. अधिक पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सरी वाटे सुरक्षितपणे शेताबाहेर काढून देता येते.
६) फळबागेमध्ये बोर्डो पेस्टचा वापर करावा. फळबागेमध्ये वाळलेले गवत, सोयाबीन भुसा, भात भुस्सा किंवा गिरिपुष्प, सुबाभूळ पाल्याचे आच्छादन करावे. वेळेवर तण, कीड व रोग व्यवस्थापन करावे. सततचे ढगाळ हवामान असल्यास शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी.
आंतरपीक पद्धतीवर भर ः
आंतरपीक पद्धतीमुळे वेळेवर पेरणी व उशिरा पेरणी अशा दोन्ही परिस्थितीत शाश्वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच मृद् व जलसंवर्धन होण्यासही मदत होते. उदा. कापूस + मूग/ उडीद /सोयाबीन (१:१), ज्वारी + तूर (४:२ किंवा ३:३), सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३).
आंतरपीक पद्धतीचे फायदे :
१) एकरी उत्पादन वाढते (२५ टक्के), जमिनीच्या गुणधर्मात सुधारणा.
२) अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृद् व जलसंधारणाचा फायदा.
३) एका पिकाची जोखीम कमी होते.
उशिरा झालेला पाऊस, उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम उपयोग ः
जलसंधारण सरी:
जमिनीची मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी खोल सरी काढल्यास जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते. बैलाच्या सरीच्या नांगराने किंवा कोळप्याने उतारानुसार ५ ते १० मीटर अंतरावर ४५ ते ६० सेंमी (१.५ ते २ फूट रुंद) आणि ३० सेंमी खोल सरी काढावी. सरीला ०.२ ते ०.४ टक्का उतार दिल्याने अतिरिक्त पावसाचे पाणी शेताबाहेर जाते.
जलसंवर्धन चर :
काळ्या खोल व भारी जमिनीमध्ये समपातळी किंवा ढाळीच्या बांधास काटछेदाचे चर घेऊन त्यातील माती काठावर टाकून बांध निर्माण करावा. चर सलग न ठेवता, ठरावीक अंतरावर खोदलेला भाग राखावा. या चरामध्ये साठवलेले पाणी गरजेच्या काळात संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात येते.
उभ्या पिकांत ठरावीक अंतरानंतर सरी :
खरीप पिकांच्या पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीची कामे पूर्ण झाल्यानंतर बळिराम किंवा लाकडी नांगराने पिकांच्या ओळीमध्ये (ठरावीक अंतरावर किंवा ठरावीक ओळीनंतर) उदा. कापूस, तूर यांसारख्या जास्त अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक एक ते दोन ओळींनंतर आणि तूर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, सारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळींनंतर सऱ्या काढाव्यात. १५ ते २० सेंमी खोलीच्या अरुंद सऱ्यांमुळे पावसाच्या पाण्याचे संधारण होण्यास तसेच अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
सरी वरंबा व बंदिस्त सरीचा उपयोग :
१) हलक्या व मध्यम उताराच्या जमिनीवर ही पद्धत उपयुक्त ठरते. बळिराम किंवा सरीचा नांगर किंवा कोळप्याच्या साह्याने पेरणीपूर्वी पिकानुसार ५० ते ६० सेंमी अंतरावर सरी वरंबा तयार करून वरंब्यावर लागवड करता येते.
२) कोरडवाहू शेतीमध्ये आंतरमशागतीची सुरवातीची कामे झाल्यानंतर सरी वरंबे तयार करून उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यामध्ये आडवे वरंबे तयार केल्यास सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत तेथेच मुरण्यास मदत होते.
रुंद वरंबा सरी पद्धत :
१) रुंद वरंबा सरी पद्धत भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. जास्त अंतरावरील पिकाच्या एक ते दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर घेता येतात. उदा. सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी घेता येतात.
२) केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राचा किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राचा उपयोग करावा. याद्वारे वरंबे म्हणजे बेड तयार करणे, पेरणी करणे, खते देणे अशी कामे एकाच वेळी करता येतात. याद्वारे बियाण्यात व खतांमध्ये बचत होते, उत्पादनात वाढ होते.
बंदिस्त वाफे / बंदिस्त बांध ः
१) अल्प उताराच्या तसेच छोट्या आकाराच्या क्षेत्रात परीघावर बांध टाकून मूलस्थानी जलसंधारण करता येते. यासाठी १ मीटर उंचीपर्यंतचा बांध आणि आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याकरिता सांडव्याची व्यवस्था करावी लागते.
हलक्या कोळपण्या :
पावसाचा खंड आढळून आल्यास हलक्या कोळपण्या करून जमिनीच्या भेगा बुजवाव्यात. यामुळे ओलावा टिकवून ठेवता येतो. जमिनीतील ओलावा निघून जाण्याचे प्रमाण कमी होते.
---------------------------------------------------------------------
संपर्क : डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२
(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.