Paddy Pest Management  Agrowon
ॲग्रो गाईड

Paddy Pest Management : भातावरील लष्करी अळी, खोडकीड, गादमाशीचे नियंत्रण

Paddy Pest Control : भात पिकात प्रादुर्भाव निर्माण करणाऱ्या विविध किडींपैकी लष्करी अळी, खोडकीड व गादमाशी यांचा समावेश होतो. या किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार, आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने उपाय केल्यास किडींचे वेळीच नियंत्रण करणे शक्य होईल.

Team Agrowon

Paddy Crop : भात पिकात प्रादुर्भाव निर्माण करणाऱ्या विविध किडींपैकी लष्करी अळी, खोडकीड व गादमाशी यांचा समावेश होतो. या किडींची ओळख, नुकसानीचा प्रकार, आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने उपाय केल्यास किडींचे वेळीच नियंत्रण करणे शक्य होईल.

डॉ. ए. व्ही. कोल्हे

भाताच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी किडी हे प्रमुख कारण आहे. रोपे तयार करण्यापासून ते कापणीपर्यंत पिकात विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. या पिकाला दुसरा पर्याय नसल्याने फेरपालट होत नाही. तसेच विविध पर्यायी खाद्य वनस्पती उपलब्ध होत असल्यामुळे किडीच्या पिढ्या अखंड उपजीविका करत असतात. भातावर येणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी तीन किडींची माहिती या लेखात घेऊयात.

लष्करी अळी- पतंग मध्यम आकाराचा १-२ सें.मी. लांब असून, समोरील पंख गडद पिंगट असतात. त्यावर काळसर ठिपका आणि कडेवर नागमोडी पट्टे असतात. पूर्ण वाढलेली अळी २.५ ते ४ सेंमी. लांब, लठ्ठ, मऊ हिरवी, काळी असते. शरीरावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात.

मादी २०० ते ३०० अंडी समूहाने, पुंजक्यांच्या स्वरूपात भातावर, गवतावर घालते. अंडी करड्या रंगांची व केसांनी झाकलेली असतात. अंडी अवस्था ५ ते ८ दिवस, अळी अवस्था २०-२५ दिवस व कोषावस्था १०-१५ दिवसांची असते. कोष भाताच्या बुंध्याजवळील बेचक्यात जमिनीत आढळतात. अळीची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात.

नुकसान
या अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करतात व शेत फस्त करतात. त्या रात्री कार्यक्षम असून, दिवसा पिकाच्या बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. पाने कडेकडून कुरतडतात. पीक लोंबी अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास लोंब्या कुरतडल्यामुळे त्यांचा सडा पडलेला आढळतो.

आर्थिक नुकसानीची पातळी ः ४ ते ५ अळ्या प्रति चौमी.

व्यवस्थापन :

-बांध स्वच्छ ठेवावे.
-कोषावस्था नष्ट करण्यासाठी भाताची कापणी झाल्यावर खोलवर नांगरणी करावी. धसकटे जाळून नष्ट करावी.
-देखरेखीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
-प्रादुर्भाव दिसून आल्यास चुडात किंवा जमिनीवर दिसणाऱ्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
-बेडकांचे संवर्धन करावे. कारण ते अळ्या खातात.
-आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. मात्र भातावरील लष्करी अळीसाठी अद्याप कोणते रासायनिक कीटकनाशक लेबल क्लेम प्रमाणे शिफारशीत नाही. त्यामुळे उद्रेकीय स्थितीमध्ये कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

खोड किडा
या किडीचा सर्वांत प्रादुर्भाव सप्टेंबरचा तिसरा आठवडा ते ऑक्टोबरचा दुसरा आठवडा म्हणजे पीक फुलोरा ते ओंबी अवस्थेत असताना जाणवतो. पतंग १ ते २ सेंमी. लांब असतो. समोरील पंख पिवळे असून, मागील पांढऱ्या समोरील पिवळ्या पंखावर प्रत्येकी एक ठळक काळा ठिपका असतो. अंडी पुंजक्याच्या स्वरूपात असतात. पूर्ण वाढ झालेली अळी २० मिमी. लांब पिवळसर व पांढरी असते.
मादी १०० ते २०० अंडी पुंजक्यांनी घालते. अंड्यातून ५ ते ८ दिवसांत अळ्या बाहेर येतात.
मुख्य खोडास पोखरून आतमध्ये त्या उपजीविका करतात. अळी अवस्था १६ ते २७ दिवसांची असते. अळी खोडामध्येच कोषावस्थेत
जाते. सुमारे ९ ते १२ दिवसांत त्यातून पतंग बाहेर येतो. एक
जीवनक्रम पूर्ण करण्यास ३१ ते ४० दिवस लागतात. एका वर्षात ४ ते ६ पिढ्या पूर्ण होतात.

नुकसान
अळी खोड पोखरते. त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो. यालाच कीडग्रस्त फुटवा किंवा
‘डेडहार्ट’ म्हणतात. हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या येतात. यालाच पळीज म्हणतात.

आर्थिक नुकसानीची पातळी
१) एक अंडीपुंज प्रति चौमी.
२) पाच टक्के सुकलेले फुटवे किंवा ५ टक्के गाभेमर प्रति चौमी
३) एक पतंग प्रति चौमी.

नियंत्रण
-भात कापणीनंतर वाफसा आल्यावर नांगरणी करून धसकटे गोळा करावी व जाळून टाकावीत.
-रोपवाटिकेत व रोवणी करताना धानाच्या शेंड्यावरील अंडीपुंज शोधून नष्ट करावीत.
-रोवणीपूर्वी रोपांचे शेंडे तोडून बांबूच्या टोपलीत जमा करावेत. ती टोपली खांबावर टांगावी. त्यामुळे शेंड्यांवर असणारी अंडी नष्ट होऊन त्यामधून परजीवी कीटकसुद्धा यथावकाश बाहेर पडतील.
-कीडग्रस्त फुटवे मुळासकट काढून नष्ट करावेत. हे काम हंगामात किमान ३ ते ४ वेळा करावे.
- वेळोवेळी बांधातील पाण्याची पातळी वाढवावी. त्यामुळे खोडाच्या खालील बाजूवरील अंडीपुंज पाण्यात बुडून किडीचा नाश होईल.
-ट्रायकोग्रामा जापोनीक्रम या मित्रकीटकाची ५० हजार अंडी प्रति हेक्टरी म्हणजेच ७ ते ८ ट्रायकोकार्डस् १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा वापरावीत.
- शिफारशीत खालीलपैकी कीटकनाशकांचा वापर करावा.

उदा. फिप्रोनिल (५ टक्के)- २० मिलि किंवा
थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) २ ग्रॅम
फ्लुबेडायअमाइड (३९. ३५ टक्के) १ मिलि
क्विनॉलफॉस (२५ टक्के) २६ मिली

गादमाशी ः
या किडीचा प्रादुर्भाव भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत व मौदा तालुक्यातील का भागात नियमित दिसून येतो. प्रादुर्भाव रोपवाटिकेमधूनच सुरू होतो. सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात अधिक प्रमाणात आढळतो. उशिरा रोवणी केलेले भात, ढगाळलेले वातावरण, रिमझिम पडणारा पाऊस, वातावरणातील ८० ते ९० टक्के आर्द्रता, २६ ते ३० सें. तापमान किडीच्या वाढीस पोषक असते.
किडीचा प्रौढ माशीचा रंग तांबडा व पाय लांब असतात. विश्रांती अवस्थेत पंख पाठीवर पूर्णपणे झाकलेले असतात. मादी १५० ते २०० अंडी एक-एक याप्रमाणे पानाच्या खालील भागाला देते.
अंडी लंबोळकी व कुंकवाच्या रंगासारखी दिसतात. अळी अंड्यातून तीन ते चार दिवसांत बाहेर येते.
अळीचा रंग पिवळसर व पांढरा असतो. वाढत्या अंकुराला १५ ते २० दिवसांपर्यंत अळ्या खात असतात. अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते. त्यातून प्रौढ माशी ५ ते ७ दिवसांत बाहेर येते. एक पिढी पूर्ण करण्यास तीन आठवडे लागतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी भाताच्या मुख्य खोडात शिरून बुंध्याजवळ स्थिरावते. त्यावर उपजीविका करते. त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा चंदेरी पोंगा तयार होतो. अशा पोंग्याना लोंबी धरत नाही. बुंध्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात.


आर्थिक नुकसानीची पातळी :

-एक चंदेरी पोंगा प्रति चौ.मी. नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रात.
-पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त फुटवे नेहमी प्रादुर्भाव नसणाऱ्या क्षेत्रात.

नियंत्रण

-भाताव्यतिरिक्त अन्य पूरक खाद्य वनस्पती काढून टाकाव्यात.
-कापणीनंतर शेतात नांगरणी करून धसकटे नष्ट करावीत.
-किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करावा
उदा.
फिप्रोनिल (५ टक्के)- २० मिलि किंवा
थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) २ ग्रॅम किंवा
क्लोरपायरिफॉस (२० टक्के) २५ मिलि

टीप ः किडींच्या नियंत्रणासाठी दिलेल्या उपायांपैकी काही उपाय भातरोवणीच्या वेळचे आहेत. परंतु अधिक माहितीसाठी ते दिले असून, पुढील हंगामासाठी त्यांचा शेतकऱ्यांना उपयोग करता येईल.

डॉ. . ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४
(प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT